कर्नाटकमध्ये २०२३ साली विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि जनता दल ( सेक्यूलर ) पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. तर, दक्षिण भारतात कर्नाटक सोडता एकाही राज्यात भाजपाला आपली सत्ता स्थापन करता आली नाही. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने पुतळ्याचं राजकारण खेळल्याचं दिसत आहे.
बेंगलोरचे संस्थापक केम्पेगौडाच्या १०८ फूट उंचीच्या पुतळ्याचं आज ( ११ नोव्हेंबर ) उद्घाटन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ८५ कोटी रुपयांचा खर्च आणि २३ एकर परिसरात हा पुतळा उभा राहणार आहे. हा कर्नाटकातील सर्वात उंच कांस्य धातूपासून बनलेला पुतळा असेल. येत्या विधानसभा निवडणुकीत वोक्कलिंगा समाजाची मते आपल्या बाजूनं खेचण्यासाठी भाजपाने केम्पेगौडा यांचा पुतळा उभा केल्याचं बोललं जातं आहे.
हेही वाचा : पाच दिवसांत ११ रोड शो, अरविंद केजरिवालांनी सौराष्ट्र, कच्छ पिंजून काढले; गुजरातमध्ये ‘आप’ बाजी मारणार?
यापूर्वी वोक्कलिंगा समाजाने काँग्रेस आणि जेडी(एस) ला पसंती दिली आहे. मात्र, वोक्कलिंगा समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाने पुतळ्याचं राजकारण केलं आहे. उद्घाटनापूर्वी भाजपाने राज्यात ‘पवित्र माती’ ही मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत २२ हजार ठिकणांहून माती गोळा करण्यात आली. ही माती केम्पेगौडा यांच्या पुतळ्याच्या चारही बाजूने टाकण्यात आली होती.
हेही वाचा : पन्ना प्रमुख ते पन्ना समिती : उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा वेगळा प्रयोग झाला यशस्वी
२०१८ साली झालेल्या विधानसभा आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांत दक्षिण कर्नाटकात भाजपाने पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही दोन्ही वेळा भाजपाला सपाटून मार खावा लागला आहे. तर, केम्पेगौडा यांच्या पुतळ्यावरून जेडी (एस) नेते कुमारस्वामी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “केम्पेगौडा यांचा पुतळा उभा केल्याने वोक्कालिंगा समाजातील लोक मतदान करतील हा भाजपाचा भ्रम आहे. विधानसभा निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील,” अशी टीका जेडी (एसचे) नेते कुमारस्वामी यांनी भाजपावर केली आहे.