काही दिवसांपूर्वी केरळमधील काँग्रेसचे आमदार राहुल ममकुटाथिल यांच्यावर एका अभिनेत्रीने अश्लील वर्तनाचा आरोप केला. या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. भाजपाने याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यानंतर आमदार राहुल यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजपाच्या एका दिग्गज नेत्यावर लैंगिक छळाचे आरोप झाला आहे. केरळमधील भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सी. कृष्णकुमार यांच्यावर एका महिलेनं लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. मात्र, कृष्णकुमार यांनी हे आरोप फेटाळून लावले असून यामागे मालमत्तेचा वाद असल्याचं म्हटलं आहे.

तक्रारदार महिलेनं पत्रात काय म्हटलं?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांना एका महिलेनं ईमेलद्वारे पत्र लिहिलं. या पत्रात तिने कृष्णकुमार यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. “काही वर्षांपूर्वी कृष्णकुमार यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी भाजपाचे नेते व्ही. मुरलीधरन, एम. टी. रमेश आणि सुभाष यांच्याकडेही मी तक्रार केली होती; पण त्यांनी कृष्णकुमार यांना पाठिशी घालून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही”, असं तक्रारदार महिलेनं आपल्या पत्रात म्हटलं. काँग्रेसचे आमदार राहुल ममकुटाथिल यांच्याविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा कृष्णकुमार यांना नैतिक अधिकार नाही. भाजपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही तक्रारदार महिलेनं केली.

कृष्णकुमार नेमके काय म्हणाले?

महिलेच्या लैंगिक छळाच्याआरोपानंतर काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर कृष्णकुमार यांनी आपली बाजू मांडत सर्व आरोप फेटाळू लावले. कृष्णकुमार म्हणाले, “माझ्यावर खोटे आरोप करून काहीही साध्य होणार नाही. अशा धमक्यांना घाबरून मी आमदार राहुल ममकुटाथिल यांच्याविरोधातील आंदोलन मागे घेणार नाही. भाजपाचे सर्व नेते तसेच कार्यकर्ते पलक्कडमधील आंदोलन सुरूच ठेवेल. माझ्यावरील या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही हेदेखील जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. हे प्रकरण जुनेच असून विरोधकांकडून त्याचा वापर राजकीय सूड घेण्यासाठी केला जात आहे.”

आणखी वाचा : ‘सर्वात मोठा चोर तूच आहेस’ भाजपा आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांना दमदाटी; प्रकरण काय?

ते पुढे म्हणाले, “तक्रारदार महिला पल्लकडमधील रहिवासी असून माझ्या पत्नीची जवळची नातेवाईक आहे. आमच्या कुटुंबातील मालमत्तेच्या वाटणीवर सुरू असलेल्या वादाशी या प्रकरणाचा संबंध आहे. या संदर्भात न्यायालयात खटलाही सुरू होता, ज्यात माझ्या बाजूने निकाल लागला आहे. आता राजकीय हेतूने आणि मला बदनाम करण्यासाठी संबंधित महिलेकडून पुन्हा हे आरोप केले जात आहेत. मालमत्तेच्या वादामुळे सदरील महिला माझ्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करीत आहेत. यापूर्वीही २०१४ मध्ये याच महिलेनं माझ्यावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. त्यावेळी पोलिसांनी सदरील प्रकरणाचा तपास करून हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं.”

काँग्रेसनं रचलेलं हे षडयंत्र – कृष्णकुमार

कृष्णकुमार यांनी यामागे काँग्रेसचा हात असल्याचाही आरोप केला आहे. आमदार राहुल ममकुटाथिल यांच्यावरील आरोपांवरून लक्ष हटवण्यासाठी काँग्रेसनं रचलेलं हे षडयंत्र आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपाचे माजी नेते आणि केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) प्रवक्ते संदीप जी. वारियर यांनी मंगळवारी (२६ ऑगस्ट) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर काँग्रेसने आपल्या आमदारावर कारवाई केली, तशीच कारवाई आता भाजपाही कृष्णकुमार यांच्यावर करणार का? असा प्रश्न त्यांनी पोस्टमधून उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना, “जेव्हा पहिल्यांदा या महिलेनं माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, तेव्हा संदीप वारियर भाजपामध्येच होते, त्यावेळी ते काहीही बोलले नाहीत. आता त्यांचे आरोप बिनबुडाचे करीत आहेत”, असं कृष्णकुमार यांनी म्हटलं आहे.

kerala-bjp-vice-president
केरळमधील भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सी. कृष्णकुमार

काँग्रेस आमदारावर काय आरोप झाले?

मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्ज यांनी काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्यावर आरोप केले होते. “एक तरुण राजकीय नेता सोशल मीडियाद्वारे माझ्या संपर्कात आला. त्यानंतर त्याची आणि माझी मैत्री झाली. मात्र हा राजकारणी नंतर मला अश्लील संदेश पाठवू लागला. तसेच त्याने तिला हॉटेलातही येण्यास सांगितले. एवढेच नाही तर काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना असेच अनुभव आले आहेत”, असा दावा अभिनेत्री रिनी यांनी केला होता. दरम्यान, रिनी यांनी संबंधित राजकारण्याचे नाव उघड करण्यास नकार दिला. केवळ तो काँग्रेस पक्षाचा युवा राजकारणी असल्याचं म्हटलं. भाजपाच्या नेत्यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार राहुल ममकुटाथिल यांना लक्ष्य केलं.

हेही वाचा : गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात सदाभाऊ खोत यांचा घरचा अहेर; गोरक्षकांनी का केला हल्ला?

केरळमध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप

या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठल्यानंतर आमदार राहुल ममकुटाथिल यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार राहुल म्हणाले, “मी कायद्याचा आदर करणारा व्यक्ती आहे. रिनी माझी जवळची मैत्रिण आहे. तिने आरोपात माझं नाव घेतलं नव्हतं. मला विश्वास आहे की, तिचे आरोप माझ्याविरोधात नव्हते. राज्यातील सीपीआय (एम) सरकार सध्या विविध आरोपांना तोंड देत असतानाच काही माध्यमांनी मला लक्ष्य केलं आहे.” दरम्यान, काँग्रेसच्या आमदारानंतर आता भाजपाच्या राज्य उपाध्यक्षांवर लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर केरळमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात काय सत्य समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.