पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपने पुन्हा ‘मिशन बारामती’ सुरू केले आहे. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे, इंदापूरमधील नेते प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशानंतर आता पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसचा पुणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपममधील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या माध्यमातून बारामती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांमध्ये भाजप पाय रोवले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून भाजपकडून ताकत आजमावून पाहिली जाण्याची शक्यता आहे.
बारामती लोकसभा मतदार संघामध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपने टप्प्याटप्प्याने संबंधित मतदार संघातील स्थानिक प्रभावी नेत्यांना पक्षात घेण्यात यश मिळविले आहे. सहा विधानसभा मतदार संघांपैकी खडकवासल्यात भीमराव तापकीर आणि दौंडमध्ये राहुल कुल हे दोन भाजपचे आमदार आहेत. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. उर्वरित मतदार संघांपैकी भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर हे आहेत. भाजपने या मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना एप्रिल महिन्यात पक्षात घेतले. त्यामुळे भाजपची भोरमधील ताकत वाढली आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार, राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रय भरणे हे आहेत. या मतदार संघातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात गेल्यानंतर या भागात प्रभाव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवीण माने यांना पक्षात घेऊन इंदापूरमध्ये पक्षाची ताकद वाढविली आहे.
पुरंदर या मतदार संघात भाजपला पाय रोवण्यास संधी मिळाली नव्हती. आता या मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या बुधवारी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. पुरंदरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे विजय शिवतारे हे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जगताप यांना फटका बसला होता. आता जगताप यांच्या माध्यमातून भाजपकडून पुरंदरमध्ये पाय रोवले जाणार आहेत.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलच्या माध्यमातून ताकत आजमावून पाहिली होती. भाजपच्या ‘मिशन बारामती’नुसार आता सहाही मतदार संघात भाजपने स्थानिक नेतृत्त्वाला पक्षात घेऊन पक्षवाढीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून भाजपकडून पक्षाच्या स्थितीचा अंदाज घेण्याची शक्यता आहे.
भाजपचे ‘मिशन बारामती’ काय आहे?
भाजपने ‘मिशन बारामती’ची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तयारी सुरू केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बारामती हा बालेकिल्ला भेदून बारामतीत विजय मिळविणे, हा भाजपचा या मिशनचा हेतू आहे. त्याची सुरुवात २०१९ मधील लोकसभा निवडणुकीने झाली. त्या निवडणुकीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बारामतीत सभा घेतली होती. मात्र, भाजपला अपयश आले. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ‘मिशन ४५’ अंतर्गत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. मात्र, पुन्हा भाजपला अपयश आले. विधासभा निवडणुकांत खडकवासला आणि दौंड या दोनच विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळाले होते. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप तयारीला लागले असून, त्यासाठी स्थानिक प्रभावी नेत्यांना पक्षात घेऊन पुन्हा ‘मिशन बारामती’ सुरू केले आहे.