बोरिवली ते मालाड पसरलेला लोकसभेचा उत्तर मुंबई हा मतदारसंघ पारंपारिकदृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला. बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आल्याने चित्र बदलण्याची फारशी लक्षणे नाहीत. एकूणच भाजपचे वर्चस्व मोडून काढणे कठीण आहे. फक्त विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी उमेदवार कोण असेल याचीच आता उत्सुकता आहे. उत्तर मुंबई हा पारंपारिकदृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मराठी, गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, मुस्लीम, ख्रिश्चन अशी मिश्र वस्ती असलेला हा मतदारसंघ. बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. उत्तर मुंबई मतदारसंघात आधी वसई आणि पालघरचा समावेश होता. २००९ नंतर फक्त मुंबईचाच भाग या मतदारसंघात समाविष्ट झाला. जनता पक्षाच्या लाटेत मृणाल गोरे, १९८० मध्ये रविंद्र वर्मा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. १९८९पासून २००४पर्यंत भाजपचे राम नाईक या मतदारसंघाचे खासदार होते. २००४ मध्ये चित्रपट अभिनेता गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला. २००९ मध्ये काँग्रेसचे संजय निरुपम या मतदारसंघातून निवडून आले. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे गोपाळ शेट्टी निवडून आले. यामुळे आधी जनता पक्ष व नंतर भाजपचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. एकूणच भाजपला अनुकूल असलेला आणि सुरक्षित असा मुंबईत एकमेव मतदारसंघ मानला जातो. हेही वाचा : ‘राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यास संकोच नको’, जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे नेते करण सिंग यांचा पक्षाला घरचा आहेर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरविले होते. गोविंदाप्रमाणे उर्मिला या चमत्कार करतील, अशी हवा तयार केली गेली. पण सुमारे पाच लाखांच्या मताधिक्याने शेट्टी विजयी झाले होते. भाजपची पक्की मांड या मतदारसंघात आहे. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत असल्याने काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आल्याने चित्र बदलेल का, अशी चर्चा सुरू झाली. पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदासंघात ठाकरे गटाचे प्राबल्य किती राहिले वा शिंदे गटाची ताकद किती यावरही बरेच अवलंबून आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहतो की ठाकरे गटाकडे जातो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मालाड मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे आस्लम शेख करतात. मराठी, मुस्लीम, काही प्रमाणात उत्तर भारतीय मतांचे गणित जुळवून आणण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. गोविंदा, उर्मिता मातोंडकर यांच्याप्रमाणेच एखाद्या चित्रपट अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या नावाचा काँग्रेसकडून विचार होऊ शकतो. हेही वाचा : गुजरात काँग्रेसमध्ये राम मंदिर सोहळ्यावरून मतमतांतर, मोठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत! भाजपचा उमेदवार कोण ? भाजपचे गोपाळ शेट्टी हे दोनदा निवडून आले आहेत. पण या वेळी त्यांना उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे मानले जाते. काहीशा फटकळ स्वभावाच्या शेट्टी यांचे भाजपच्या वरिष्ठांशी फारसे जमत नाही. तसेच ७०च्या वयोगटातील शेट्टी यांच्याऐवजी अन्य नावाबाबत भाजपमध्ये विचार होऊ शकतो. योगेश सागर, अतुल भातखळकर हे भाजपचे दोन आमदारांचे मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात मोडतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत बोरिवलीमधून विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारून पक्षाने शिवडीतील सुनील राणे यांना ऐनवेळी उमेदवारी दिली होती. पक्षाचा बालेकिल्ला असल्याने भाजप नेते एखाद्या नव्या चेहऱयाचा विचार करू शकतात. विनोद तावडे यांचे पक्षात राष्ट्रीय पातळीवर वजन वाढले आहे. त्यांच्याकडे बिहार प्रभारीबरोबरच अन्य काही महत्त्वाच्या जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. कदाचित तावडे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. भाजपचा बालेकिल्ला असल्याने पक्षाचा उमेदवार कोणी असला तरी निवडून येण्यात फारशी अडचण सध्या तरी दिसत नाही. केंद्रीय मंत्री व मुंबईकर पीयूष गोयल हे उत्तर मुंबईतील पक्षाचे उमेदवार असू शकतात, असे संकेत भाजपच्या गोटातून देण्यात येत आहेत. हेही वाचा : खरगेंची ‘इंडिया’च्या अध्यक्षपदी नियुक्ती भाजपसाठी डोकेदुखी प्रश्न कायम उत्तर मुंबईत वाहतूक, रेल्वे, झोपडपट्य्या, जुन्या चाळी असे विविध प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत. संरक्षण खाताच्या जागेवरील बांधकामांचे पुनर्वसन हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. गोपाळ शेट्टी यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. २०१९च्या निवडणुकीती मते : गोपाळ शेट्टी (भाजप ): ७.०६.६७८उर्मिला मातोंडकर (काँग्रेस : २,४१,४३१