विश्वास पवार, वाई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर साताऱ्याच्या बालेकिल्लाला तडा गेला आहे. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पक्षाचे निम्मे निम्मे वाटप विभागले गेले आहेत.. पक्ष फुटी नंतर साताऱ्यात परिस्थिती सावरण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. त्यांची पाठ फिरताच सातारा शहरासह कोरेगाव फलटण खटाव आदी अनेक भागात अजित पवारांच्या अभिनंदनाचे फलकलागले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी साताऱ्याची ओळख. मात्र पक्षात फूट पडण्याआधी पासून भाजपाने सातारची तटबंदी खिळखिळी करण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस फारच मजबूत आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्था व सातारा जिल्हा बँकेसह अनेक महत्त्वाच्या संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. दोन गट पडल्याने आता जिल्ह्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे खरा कस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागणार आहे.दोन गट पडल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातही कुठे जायचे असा संभ्रम आहे. साताऱ्यात गावागावांतील कार्यकर्त्यांशी अजितदादा आणि शरद पवार या दोघांचेही व्यक्तिगत संबंध राहिले आहेत. पक्षातील फुटीनंतर त्याचा किती परिणाम संघटनेवर होणार हे पुढील काळ ठरणार आहे.
हेही वाचा >>> पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर
साताऱ्यात राष्ट्रवादीचे विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे दोन आमदार तर एक खासदार आहेत.पक्ष फुटी नंतर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांना समर्थन दिले आहे.आमदार मकरंद पाटील यांनी अजित पवार यांना समर्थन दिल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात त्यांच्याबरोबर होते. त्यांनी शरद पवारांना पाठिंबाही जाहीर केला .मात्र ते अजित पवारांचे नातेवाईक असल्याने व त्यांच्या बरोबर जाण्याचा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. मुंबईतील कोणत्याही गटाच्या बैठकीला ते प्रकृतीचे कारण सांगून उपस्थित राहिले नाहीत. आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांना साथ दिली आहे.
हेही वाचा >>> ‘राज्यपालांनी राजकारणावर बोलू नये’, भाजपा नेत्याचा आरएन रवी यांना घरचा आहेर
साताऱ्याच्या राजकारणावर रामराजे नाईक निंबाळकर आणि मकरंद पाटील यांचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. रामराजे अजित पवार यांच्या बरोबर गेल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम अपेक्षित आहे. साताऱ्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणावर भर असल्याने सर्वांनी एकत्र समन्वय ठेवण्याचा निर्णय घेतला तर तर ठीक राहील अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. रामराजे यांनी अजित पवार यांना साथ दिल्याने उत्तर साताऱ्यातील फलटण खंडाळा कोरेगाव येथील कार्यकर्त्यांमधील फूट अटळ आहे. खटाव कोरेगाव मध्ये तर अजित दादांचे अभिनंदनाचे फलकच लागले आहे. येथील कार्यकर्त्यांनी अजित पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> शिवसेनेनंतर राष्ट्रवादीलाही २५ व्या वर्षात फुटीचा शाप
आज पर्यंत अजित पवार आणि रामराजेंमध्ये फारसे पटत नव्हते. रामराजे शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत होते. मात्र बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये रामराजे अजित पवारांबरोबर गेल्याने जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. ते अनेक मतदार संघावर परिणाम करू शकतात त्यांना विधान परिषदेच्या सभापतीपदाची अपेक्षा आहे. सध्या तरी साताऱ्याचे तीनही राजे खासदार उदयनराजे आमदार शिवेंद्रसिंहराजे व रामराजे हे शरद पवारांच्या विरोधात आहेत. नव्या घडामोडीमुळे रामराजे, उदयनराजे आणि अजित पवार एकत्र आल्यास उदयनराजेंचा लोकसभेचा मार्ग सुकर होऊ शकतो.ते कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या बाळासाहेब पाटील यांनाही अडचणीत आणू शकतात. माढा मतदारसंघात रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना खासदार करण्याचे रामराजे यांनी ठरवून तशी तयारी करत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना तुम्ही निवडणुकीला उभे रहा तुम्हाला पाडणारच असे सांगून आव्हान दिल्याने,नव्या घडामोडीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काहीही होऊ शकते. नव्या जुळण्या होणार हे निश्चित.