Eknath Shinde Shiv Sena faction Conflict : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून दिसून आला. एकसंध शिवसेनेत फूट पडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात शिंदे यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. त्यातील एक महत्वाचा प्रसंग म्हणजे- गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे व त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जातात. गुरुपौर्णिमेनिमित्त ते बाळासाहेबांचे पाय धुऊन त्यांच्याविषयी असलेली निष्ठा दाखविताना दिसून येतात. परतीच्या प्रवासात शिंदे हेदेखील आनंद दिघे यांचे पाय धुतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. या दृश्यांमधून शिंदे यांना केवळ एक निष्ठावान शिवसैनिकच नव्हे, तर दिघे यांच्या वारशाचा खरा उत्तराधिकारी म्हणूनही दाखवण्यात आलं.

एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बुधवारी नवी दिल्लीत गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व सध्याचे राजकीय संरक्षक म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांची भेट घेतली. काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची राजकीय स्थिती अधिकाधिक कमकुवत होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे- मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र आल्याने ‘ठाकरे ब्रॅण्ड’ पुन्हा बळकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर भाजपा व शिंदे गटातील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याचंही समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट अधिकच चर्चेचा विषय ठरली आहे.

२०२२ नंतर शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीला गती

जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या छायेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी गती मिळाली. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रेच शिंदेंच्या हातात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं भाजपा नेत्यांना वाटत होतं; पण पंतप्रधान मोदी व अमित शाह यांच्या हस्तक्षेपानंतर फडणवीसांना अखेर उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी शिवसेनेची मोट बांधून, स्वत:ची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. तरीही उद्धव ठाकरे यांच्याशी लढण्यासाठी भाजपानं शिंदे यांनाच प्राधान्य दिलं.

आणखी वाचा : Maharashtra Politics : ठाकरे बंधूंची युती झाल्यास निवडणुकीत कसं जुळणार मतांचं समीकरण?

२०२४ नंतर महायुतीतील समीकरणे कशी बदलली?

  • २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलली.
  • देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्रिपदावर परतल्यानंतर एकनाथ शिंदेंची राज्यावरील पकड काहीशी कमकुवत झाली.
  • भाजपानं त्यांना महत्त्वाच्या खात्यांपासून दूर ठेवल्यानं शिंदेंची अस्वस्थता वाढतच गेली.
  • आताही शिंदे गटातील काही आमदार त्यांना निधी मिळत नसल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत.
  • अर्थ खाते हे अजित पवार यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्या नाराजीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे.
  • त्यातच ठाकरे बंधूंच्या एकत्रित येणाच्या हालचालींमुळे शिंदे गटातील चलबिचल वाढली आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंना फटका बसणार?

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जर युती झाली, तर एकनाथ शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण- बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणून महाराष्ट्रातील मतदार हे ठाकरे बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात शिंदेंनी व्यासपीठावरूनच ‘जय गुजरात’, अशी घोषणा दिली. याच मुद्द्याला हाताशी धरून ठाकरे गट व मनसैनिकांनी त्यांना लक्ष्य केलं. त्याशिवाय महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या मनामध्येही शिंदे यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय.

Eknath Shinde Amit Shah (PTI Photo)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (छायाचित्र पीटीआय)

शिंदे गटाचे आमदार वादाच्या भोवऱ्यात का सापडताहेत?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री, तसेच आमदारही सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले हे त्यांच्या घरात कथित अघोरी पूजा करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली. हे प्रकरण शांत होताच बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडले. मुंबईतील आमदार निवासातील कँटीनमध्ये आपल्याला शिळे व खराब अन्न दिल्याचा आरोप करीत त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यावरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर आमदार गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. आता मंत्री संजय शिरसाट हेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, त्यांच्या बेडरूममध्ये पैशाने भरलेली बॅग असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, या बॅगेत पैसे असल्याचा दावा शिरसाट यांनी फेटाळून लावला.

हेही वाचा : कंगना रणौत यांच्या ‘त्या’ दौऱ्यामुळे भाजपा अडचणीत? हिमाचलमध्ये काय घडतंय?

खासदार श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस?

२०१९ ते २०२४ काळात मालमत्ता वाढल्याने संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीसही आली आहे. स्वत: शिरसाट यांनी हे मान्य केलं आहे. त्यांनी सुरुवातीला असा सूचक उल्लेख केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाही अशाच प्रकारची नोटीस मिळालेली आहे. मात्र, नंतर त्यांनी हे विधान मागे घेतले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अचानक केलेला दिल्ली दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महायुतीत आपली प्रतिमा व राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिंदे यांनी दिल्लीतील भाजपाच्या नेतृत्वाशी चर्चा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिंदेंची राजकीय प्रतिष्ठा कमी करण्यासाठी विरोधकांकडून असे गैरसमज पसरवले जात असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. “शिंदे यांनी दिल्लीत नेमकी कोणाची भेट घेतली हे माहीत नाही; पण जर भेटीचा हेतू मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल, तर त्यात काहीच गैर नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार म्हणाले- शिंदेंचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न

दरम्यान, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्या दौऱ्याला महायुतीतील अंतर्गत घडामोडींशी जोडलं आहे. “शिंदे गटातील काही नेत्यांना आयकर विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांना त्यांच्या गटातच कुणीतरी डाव खेळत असल्याची शंका वाटते,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. ”अजित पवार यांच्या पार्टीतील लोकांना नोटिसा मिळत नाहीत; पण शिंदे गटाच्या नेत्यांना मिळतात हा संशोधनाचा विषय आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शिंदेंचा प्रभाव कमी केला जात आहे,” असेही रोहित पवार म्हणाले.