Why Eknath Shinde is Covering Distance Despite Frequent Visits to Delhi : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील भाजपा नेत्यांशी संबंध ताणले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही दिवसांपासून शिंदे सातत्यानं दिल्ली दौरे करीत आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यांमुळे शिवसेनेची राजकीय प्रतिष्ठा कमी होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. शिंदे दिल्लीला गेले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो प्रसिद्ध होतात. त्यांच्या या भेटींकडे ‘दबावतंत्र’ म्हणून पाहिलं जात आहे. मात्र, शिंदे यांच्या या रणनीतीला राज्यातील भाजपाचे नेते जुमानत नसल्याचं दिसून येत आहे.

६ ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासहित दिल्लीला गेले आणि त्यांनी मोदी-शहांची भेट घेतली; पण त्यानंतर काही दिवसांतच शिंदे गटाची रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली. त्यामुळे नाराज होऊन शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले आणि दादासाहेब भुसे यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यांपासून दूर राहणे पसंत केले. रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अदिती तटकरे यांनी, तर नाशिकमध्ये भाजपाचे गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं. विशेष बाब म्हणजे- पालकमंत्रिपदासाठी गोगावले स्वतः दिल्लीला गेले होते; पण त्यांना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट मिळाली नाही.

स्वातंत्र्यदिनी एकनाथ शिंदे कुठे होते?

एकनाथ शिंदे हे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काश्मीरमध्ये गेले होते. त्यांच्या या भूमिकेकडे अनेकांनी नाराजी म्हणून पाहिले. शिंदे यांनी अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलासुद्धा हजेरी लावली नाही. आपल्या दिल्ली दौर्‍यांबाबत शिंदे म्हणाले– “संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं मी अनेकदा दिल्लीला गेलो. आमचा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असल्यानं विविध मुद्द्यांवर चर्चा करावी लागते. तसेच महाराष्ट्रातील काही प्रश्नांबाबतही भाजपाच्या केंद्रीय नेत्यांबरोबर चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

आणखी वाचा : ठाकरे बंधुंची युती झाल्यास भाजपाला बसणार मोठा फटका? निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते?

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची शिंदेंवर टीका

भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मात्र एकनाथ शिंदे यांच्या या रणनीतीवर उघडपणे टीका केली. “जेव्हा शिवसेनेला डावललं जातंय, असं शिंदे यांना वाटतं, तेव्हा ते दिल्लीत जाऊन भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेऊन, स्वतःच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात,” असे ते म्हणाले. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र सांगितलं की, एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यानं त्यांचं दिल्ली दौऱ्यावर जाणं स्वाभाविकच आहे.

मुख्यमंत्रिपदावरून शिंदे नाराज?

दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रं पुन्हा आपल्याच हातात येणार, अशी शिंदेंना अपेक्षा होती. त्यासाठी भाजपाला त्यांनी सत्ता आणून दिल्याचं ठोस कारणही सांगितलं; पण भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांची ही मागणी फेटाळून लावत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. सरतेशेवटी उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागल्यानं शिंदे यांची नाराजी वाढली. त्यादरम्यान अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात समीकरण जुळल्यानं शिंदेंच्या अस्वस्थतेत आणखीच भर पडल्याचं सांगितलं जातं.

eknath shinde devendra fadnavis ajit pawar photo
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार (छायाचित्र पीटीआय)

शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा डोळा?

एकीकडे एकनाथ शिंदे दिल्लीचे दौरे करीत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसही शांत बसले नाहीत. स्वातंत्र्य दिनानंतर लगेचच त्यांनी शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. भाजपाचे मंत्री गणेश नाईक यांनी तर ठाण्यात फक्त कमळ (भाजपाचे चिन्ह) दिसेल, असं जाहीरपणे सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना नाईक म्हणाले, “शिंदेंना मुख्यमंत्रिपद लॉटरी लागल्यासारखं मिळालं होतं. एखादी व्यक्ती पद कसं मिळवते आणि ते टिकवते कसं हे महत्त्वाचं आहे. शिंदे यांच्या बाबतीत ते शक्य झालं नाही.” भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी तर आपण शिवसेनेचा बाप असल्याचं वादग्रस्त विधान केलं, ज्यामुळे शिंदेसमर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी माफीनाम्याची मागणी केली.

हेही वाचा : संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नका; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा, प्रकरण काय?

कोकणात भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये वाद

कोकणातही शिंदे गट आणि भाजपा नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. भाजपाचे मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या नियंत्रणावरून वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की, अजित पवार हे शिंदे यांच्यापेक्षा मजबूत स्थितीत आहेत. कारण- त्यांनी आपल्या पक्षाच्या वाच्याळवीर मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की, एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातील वादग्रस्त नेत्यांवर कारवाई करण्याला घाबरतात. कारण- पक्षात मोठी बंडखोरी होऊ शकते, अशी भीती त्यांना आहे.

शिंदे गटाच्या नेत्यानं काय आरोप केला?

शिवसेनेच्या मंत्र्यांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप शिंदे गटातील काही नेत्यांनी केला आहे. शिवसेनेच्या एका खासदारानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप का होतात? भाजपाच्या मंत्र्यांचे गैरप्रकार विरोधक का उघड करीत नाहीत? आमच्या पक्षातील मंत्र्यांना लक्ष्य करण्यासाठी महायुतीतील काही नेतेच विरोधकांना माहिती पुरवतात, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, भाजपा व शिंदे यांच्या शिवसेनेतील सुरू असलेला हा कथित वाद नेमका कधी शमणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.