एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या जुलै महिन्यात मोठी फूट पडून अजित पवार गटाने स्वतंत्र घरोबा केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये अनेक बडे नेते, आमदार, माजी आमदार, साखर सम्राट पक्षाध्यक्ष शरद पवारांपासून दुरावले आहेत. यापैकी माढा आणि करमाळ्याचे शिंदे बंधू आमदारांच्या विरोधात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे दोघे शरद पवारांचे खंदे समर्थक असूनही राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी एका रात्रीत थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार गटात जाणे पसंत केले. त्यामुळे शरद पवार हे शिंदे बंधुंच्या बाबतीत नाराज असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात पहिल्यापासूनच सुरू होती. शरद पवार यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्.याच्या वेळी कापसेवाडीत शेतकरी मेळाव्याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले. मात्र पवार यांनी त्यांची दखल घेतली नाही. याचवेळी आमदार शिंदे विरोधक आणि संजय पाटील-घाटणेकर यांनी आमदार शिंदे बंधुंचा थेट नामोल्लेख न करता, माढा तालुक्यातील बड्या साखर सम्राटांनी शेतक-यांच्या नावावर परस्पर बँकांतून कर्ज काढून त्यांची फसवणूक केली. अशा शेतक-यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. दुसरीकडे या शेतक-यांचे बँकांकडील ‘सिबिल ‘ खराब झाल्यामुळे त्यांची आर्थिक पत घसरली. पहिल्या कर्जमाफीत साखर सम्राटांनी दोनशे कोटींची कर्जमाफी मिळविल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे केली. दोनशे कोटी कर्जमाफी मिळविल्याचा प्रश्न सध्या केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा गौप्यस्फोटही घाटणेकर यांनी केला.

आणखी वाचा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजस्थानातील ‘शिलेदार’ अजूनही चर्चेत

शरद पवार यांनी त्याची लगेचच दखल घेतली. आपले सहकारी संजय घाटणेकर यांनी सांगितलं की, भलत्याच्या नावावर कर्ज काढलं आणि ते पैसे तिसऱ्यानेच उचलले त्याचा परिणाम आज अनेक शेतकरी कर्जमाफीपासून बाजूला राहिलेले आहेत. आता हे काम कोणी केलं असेल, हे मला माहिती नाही, पण माझी माहिती तुम्हाला एकच आहे, हे जर कोणी केलं असेल तर, तुम्ही संजय यांच्याकडे ती माहिती द्या. ती सगळी माहिती एकत्रित करून माझ्याकडे द्या, मी त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते बघतो. तुम्ही त्याची काही चिंता करू नका. शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे काम जर नेत्यांकडून होत असेल तर त्याला नेता म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. त्याबद्दलचा निकाल आपल्या सर्वांना घ्यावा लागेल, असे पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. काही ठिकाणी राजकारणामध्ये एखाद्याच्या मनासारखे काम केले नाही तर दबाव आणतात. दबावाने आज चांगले काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करायचं काम करतात. मी एवढेच सांगू इच्छितो की, जसं कर्जमाफीत कुणाला फसवणूक केली असेल किंवा प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत म्हणून दबावाचे राजकारण या ठिकाणी कुणी करीत असेल तर तो दबाव सुद्धा संपवायचा कसा ? याचा विचार आम्ही करू. तुम्ही त्याची काळजी करू नका, अशा शब्दात पवार यांनी माढा तालुक्यातील घाटणेकर आणि पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील या नव्या सवंगड्यांना आश्वस्थही केले. त्यांच्या भूमिकेवरून माढा तालुक्यात पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडाणुकांच्या तोंडावर कशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडतात, याची सार्वत्रिक उत्कंठा पसरली आहे.

आणखी वाचा-मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद; येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे अशा प्रकारे माढ्यातील शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आमदार शिंदे बंधू पवार यांच्या रडारवर असल्याचे संकेत मिळाले असताना दुसरीकडे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, सांगोल्याचे माजी विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे व अन्य फुटीर मंडळींबाबत पवार कोणती भूमिका घेणार, हेसुध्दा नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे. एकमात्र निश्चित की, पवार यांना इतरांच्या तुलनेत शिंदे बंधुंनी साथ सोडणे जिव्हारी लागल्याचे मानले जाते.