प्रबोध देशपांडे

विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच ‘कमिशन’खोरीचा आरोप करण्यात आला आहे. आ. मिटकरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षाच्या सदस्यांना आमदार निधी देत नाहीत, दिला तरी ते त्यासाठी कमिशन मागतात, असा गंभीर आरोप प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यापुढे करण्यात आला. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आ.मिटकरींविरोधात गाऱ्हाणे प्रदेशाध्यक्षांपुढे मांडले. अकोला जिल्हा राष्ट्रवादीतील वाद प्रदेशाध्यक्षांपुढे चव्हाट्यावर आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील रविवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्षाची आढावा बैठक मूर्तिजापूर येथील विश्रामगृहावर घेतली. या बैठकीत पक्षातील मतभेद उघड झाले आहेत. आ. मिटकरी पक्षाच्या पदाधिकारी व जि. प. सदस्यांकडून ‘कमिशन’ घेतात, असा जाहीर आरोप बैठकीत करण्यात आला. याची एक चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे.पक्षाची आढावा बैठक सुरू असताना आ.मिटकरींच्या विरोधातील सूर पदाधिकाऱ्यांनी लावला. पक्षाने अमोल मिटकरींना विधान परिषदेवर पाठविले. मात्र, त्याचा उपयोग पक्षासाठी होत नाही. ते पक्षाच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना निधी देत नाहीत. जिल्हाध्यक्षांना निधी देताना देखील आमदारांनी का कमिशन मागितले? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्षांपुढे केला. त्यावर जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी आमदारांनी कमिशन मागितले नसल्याचे सांगितले. या बैठकीत दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य सुमन भास्कर गावंडे यांचे पूत्र व राष्ट्रवादीचे पदाधिकारी विशाल गावंडे यांनी देखील आ.मिटकरींवर विकास कामांसाठी निधी देत नसल्याचा आरोप केला. त्यांनी १६ कोटीचा निधी एकट्या कुटासा गावात दिला. या गावात पक्षाची वाताहत झाली असून स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सोसायटीत सुद्धा राष्ट्रवादीला यश मिळाले नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तक्रारीचा पाढा ऐकून घेत यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

आ. अमोल मिटकरी यांच्याविषयी पक्षांतर्गत मोठा रोष आहे. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत प्रदेशाध्यक्षांपुढे स्वकीय आमदारांच्या विरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे आगामी काळात अकोला जिल्हा राष्ट्रवादीतील असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आरोप बिनबुडाचे

अमोल मिटकरी, आमदारआरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही, ते बिनबुडाचे आरोप आहेत. कुठल्याही पक्षामध्ये काही प्रमाणात नाराजी असतेच. अवास्तव मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यांना प्रदेशाध्यक्षांपुढे तक्रारी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांपुढे म्हणणे मांडले आहे.

– 

भावना मांडल्या

पक्षाच्या जि.प. सदस्य व नगरसेवकांना निधी मिळाला नसल्याने त्यांच्यात काही प्रमाणात नाराजी होती. प्रदेशाध्यक्षांपुढे त्यांनी आपल्या भावना मांडल्या. त्यावर त्यांची समजूत काढण्यात आली असून भविष्यात असे होणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी बैठकीत सांगितले.- संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अकोला.