सोलापूर : पक्षाच्या विरोधात अखेर बंडखोरी करून अजित पवार व अन्य ज्येष्ठ नेते मंडळी शिंदे मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची उरली सुरली ताकद संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात एकेकाळी मोठा दबदबा राहिलेल्या राष्ट्रवादीचे सध्या एका सहयोगी अपक्षासह तीन आमदार आहेत. या तिन्ही आमदारांनी शरद पवारांना पाठ दाखवून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर माजी आमदार, साखर कारखानदारांसह प्रस्थापित मंडळींनी अजित निष्ठा दाखवायला सुरुवात केल्यामुळे पक्षाचे भवितव्य धोक्यात आले आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे शरद पवार यांच्या पाठीशी होते. सुधाकर परिचारक, दिलीप सोपल, करमाळ्याचे बागल ही जुनी मंडळीही राष्ट्रवादीत होती. परंतु नंतर अजित पवार यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे मोहिते-पाटील शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये गेले. त्यापाठोपाठ परिचारक यांनीही भाजपचा रस्ता धरला. दिलीप सोपल, बागल शिवसेनेत गेले. त्यांची पोकळी भरून निघत नसताना जिल्ह्यात पक्षाचा डोलारा माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू अपक्ष आमदार संजय शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी निवडक मंडळी सांभाळत होती. परंतु शिंदे बंधूंसह आमदार माने व अन्य नेते पक्षाच्या अडचणीच्या काळात शरद पवार यांची साथ सोडून सत्तेचा रतीब घालण्यासाठी अजितनिष्ठ झाले आहेत.

हेही वाचा – काँग्रेसला अजून तरी फुटीचे ग्रहण नाही

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची पक्षात मोठी घुसमट होत होती. तर तिकडे सांगोल्यात दीपक साळुंखे यांची शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी अर्थपूर्ण मैत्री टिकून आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीच्या बांधणीला साहजिकच मर्यादा आहेत. तर करमाळ्यात अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्याकडे पक्षाची सूत्रे असली तरी स्वतःपेक्षा पक्ष मोठा होऊ न देण्याची खबरदारी त्यांनी पूर्वीपासूनच घेतली होती. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, अनेक साखर कारखाने ही महत्त्वाची सत्तास्थाने आता राष्ट्रवादीच्या हातून निसटल्यातच जमा आहे. या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद आणखी भक्कम होणार असली तरी त्यातून नवीन डोकेदुखी वाढणार आहे.

मोहिते-पाटील आणि माढ्याचे शिंदे बंधू एकमेकांना पाण्यात पाहतात. तसेच शिवसेना नेते, आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत व त्यांचे बंधू, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांचे आमदार शिंदे यांचे वैर कायम आहे. आमदार शिंदे व त्यांच्या पुत्राची ईडी चौकशी होण्यासाठी शिवसेनेचे माढा लोकसभा प्रमुख संजय कोकाटे यांनी पाठपुरावा चालविला आहे. परंतु आता सत्तेच्या नव्या समीकरणात मोहिते-पाटील, सावंत बंधू आमदार शिंदे बंधूंशी कसे जुळवून घेणार, याची डोकेदुखी भाजपसह शिवसेना आणि अजित पवार गटाला सतावण्याची शक्यता वर्तविली जाते.

हेही वाचा – पुण्यातील कट्टर प्रतिस्पर्धी आता एकत्र

बार्शीचे दिलीप सोपल हे आपले कट्टर प्रतिस्पर्धी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी दोस्ताना करणार का? करमाळ्यात एरव्ही एकमेकांविरुद्ध लढणारे शिंदेचलित शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार संजय शिंदे या त्रिकुटात समन्वय राहणार का, असे प्रश्न जिल्ह्यातील विविध भागांत उद्भवणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर शहरात राष्ट्रवादीची शक्ती खूपच मर्यादित असताना अलिकडे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, सुधीर खरटमल, तौफिक शेख यांची भूमिका तळ्यात-मळ्यात राहिली आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरेचलित शिवसेनामार्गे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले माजी आमदार दिलीप सोपल यांच्यासमोर कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न उभा राहिला आहे.