Gujarat riots 2002 interview Narendra Modi ज्येष्ठ पत्रकार, ‘नई दुनिया’ या उर्दू मासिकाचे संस्थापक व माजी खासदार शाहीद सिद्दीकी यांनी आपल्या आत्मचरित्रावर ‘मोजो स्टोरी’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत केलेले दावे आता राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी मुलाखतीत असा दावा केला आहे की, काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी २००२ च्या दंगलींवर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची २०२१ ची मुलाखत प्रकाशित न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. त्यांच्या या दाव्याने सध्या खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत नक्की काय म्हटले? नरेंद्र मोदींच्या मुलाखतीत काय होते? त्याविषयी जाणून घेऊयात…

शाहीद सिद्दीकी काय म्हणाले?

  • अहमद पटेल यांनी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वावर शाहीद सिद्दीकी यांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी दबाव आणला, असा दावा त्यांनी केला.
  • सिद्दीकी त्यावेळी पक्षाचे सरचिटणीस व राज्यसभा सदस्य होते. ज्या दिवशी मुलाखत छापून आली, त्याच दिवशी पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली.
  • अहमद पटेल हे पक्षाचे एक मोठे व प्रभावशाली नेते होते.
  • सिद्दीकी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी आपल्या मुलाखतीबाबत आणि ‘आय विटनेस इंडिया फ्रॉम नेहरू टू नरेंद्र मोदी’ या त्यांच्या आत्मचरित्राबद्दल संवाद साधला.

नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या त्या मुलाखतीत नक्की काय होते आणि अहमद पटेल यांच्याबरोबर तुमची काय चर्चा झाली?

ती मुलाखत माझ्यासाठी एक मोठी बातमी होती. कारण- मोदीजी त्याआधी २००२ च्या गुजरात दंगलींबद्दल कधीही सविस्तर बोलले नव्हते. गांधीनगरमध्ये मुलाखत रेकॉर्ड केल्याच्या दुसऱ्या दिवशी अहमदभाई पटेल मध्यरात्री मला भेटायला आले. त्यावेळी काँग्रेसमध्ये त्यांचा खूप प्रभाव होता. त्यांनी मला ती मुलाखत प्रकाशित न करण्यास सांगितले. पण मी ती मुलाखत प्रकाशित करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ते म्हणाले की, मला अडचणींना सामोरे जावे लागेल. ते म्हणाले, माझा पक्ष माझ्यावर कारवाई करू शकतो.

त्या मुलाखतीत मोदी म्हणाले होते, ‘”मी दोषी असल्यास मला फाशी द्या.” मी त्यांना मदत शिबिरे आणि दंगलीतील इतर घटनांबद्दल प्रश्न विचारले. ज्या दिवशी मुलाखत छापून आली, त्याच दिवशी मला समाजवादी पक्षातून काढून टाकण्यात आले. नंतर मला कळले की, अहमदभाईंनी मुलायम सिंह यादव (समाजवादी पक्षाचे संस्थापक) व अमर सिंह (ज्येष्ठ समाजवादी नेते) यांना मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी फोन केला होता. कारण- माझ्यामुळे गुजरातमध्ये त्यांच्यासाठी (काँग्रेससाठी) अडचणी निर्माण होत होत्या. परंतु, माझा उद्देश सत्य बाहेर आणणे हा होता. मी मोदीजींच्या समर्थनात ही मुलाखत घेतली नव्हती.

भाजपा या घटनेचा संदर्भ देऊन काँग्रेसवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा आरोप करीत आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल?

दडपशाही प्रत्येक काळात होतेच, आणीबाणीच्या काळातही झाली होती. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’वरही दबाव आणण्याचे अनेक प्रयत्न झाले होते. त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. माझ्याबरोबर जे घडले, त्याचा संदर्भ देऊन, भाजपा सध्या माध्यमांबरोबर जे होत आहे, ते योग्य ठरवू शकत नाही. एक चूक दुसरी चूक योग्य ठरवत नाही. अहमदभाईंनी मला फक्त एक विनंती केली होती. त्यांनी मला तुरुंगात पाठवले नाही. त्यांनी एक विनंती केली आणि मी ती नाकारली. त्यांनी मला राजकीय शिक्षा दिली. तो राजकीय दबाव होता. आणीबाणीनंतर मला वाटते की, आज इतका दबाव माध्यमांवर कधीच नव्हता. संपूर्ण जग हेच म्हणत आहे. आज माध्यमे सामान्य लोकांचा आवाज राहिलेली नाहीत.

हा प्रसंग तुमच्या आत्मचरित्रात आहे का?

मी त्याला जास्त महत्त्व दिले नाही. माध्यमे हा मुद्दा उचलून धरत आहेत. ते पुस्तक माझ्या सर्व पंतप्रधानांबरोबरच्या प्रवासाबाबत आहे. मला वाटते की, प्रत्येक पंतप्रधानाने या देशाच्या उभारणीत योगदान दिले आहे. प्रत्येकाने चुकाही केल्या आहेत. २००८ मध्ये अणु करार झाला तेव्हा मीच समाजवादी पक्षातून राजीनामा दिला होता (समाजवादी पक्षाने या मुद्द्यावर यूपीए सरकारला पाठिंबा दिला होता). मला अणु करार देशाच्या हिताचा वाटला नाही.

तुम्ही काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा व आरएलडीमध्ये होता. तुम्ही त्या पक्षांवर टीका केली आणि पक्ष सोडले. पण, या महिन्यात तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला या पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

अखिलेशजी (समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव), राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी माझे अजूनही चांगले वैयक्तिक संबंध आहेत; पण वैचारिक मतभेद असू शकतात. मी वैयक्तिक आणि वैचारिक संबंध वेगळे ठेवतो. हीच लोकशाही आहे.

बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल परीक्षणावर (एसआयआर) खूप टीका होत आहे. त्यावर तुमचे मत काय?

भाजपाला मुस्लीम मतांची समस्या आहे आणि ते सत्तेत आल्यापासून मुस्लिमांना मतदानाच्या अधिकारातून वंचित ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. एसआयआर हा त्याचाच एक भाग आहे. मी वगळलेल्या नावांचा अभ्यास केलेला नाही. पण जर विरोधक म्हणत आहेत की, मुस्लिमांची नावे वगळली जात आहेत, तर माध्यमांनी त्याचा तपास केला पाहिजे.