पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात राजकीय ताकद असतानाही महायुतीतील अजित पवारांकडून शिरूरवर दावा करताना मावळवर कोणतेही भाष्य केले जात नसल्याने शिंदे यांच्या शिवसेनेला मतदारसंघ सुटण्याची चिन्हे आहेत. गेल्या वेळी शरद पवार यांचा विरोध डावलून अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यंदा मात्र अजित पवार गट मावळबाबत फारसा आग्रही दिसत नाही.

महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जात असताना महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील बारणे-वाघेरे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परखड बोलातून सूचक इशारा ?

पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश असलेल्या मावळवर सलग तीनवेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. विद्यमान खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. महायुतीतील भाजप, अजित पवार गटाकडून मावळच्या जागेवर दावा केला जात होता. त्यातील अजितदादांनी शिरूरवर ठामपणे दावा केला. मात्र, मावळवर कोणतेही भाष्य केले नाही. उलट इकडे उमेदवारी मिळणार नसल्याच्या शक्यतेनेच संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगत मावळवरील दावा सोडल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची लढविण्याची इच्छा आहे. परंतु, महायुतीकडून आपली उमेदवारी निश्चित असल्याचा खासदार बारणे यांनी दावा केला असून, चिन्ह कोणते असणार याबाबत साशंकता आहे.

हेही वाचा : पश्चिम बंगाल : लोकसभा निवडणुकीत ३५ जागांसाठी भाजपाची खास रणनीती, निवडणूक नियोजन समितीची स्थापना!

महाविकास आघाडीत मावळ मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. ठाकरे गटानेही उमेदवाराची चाचपणी सुरू केली. पिंपरीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी काही महिन्यांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर दिवाळीत मतदारसंघातील सर्व गावांमध्ये ते पोहोचले होते. वाघेरे यांच्या नावाची चर्चा असतानाच पिंपरीगावातील त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी महापौर, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सोमवारी थेट मातोश्री गाठली. आपण लोकसभेला इच्छुक आहोत. २०१४ आणि २०१९ मध्येही तयारी केली होती. पण, संधी मिळाली नसल्याचे सांगत संजोग वाघेरे यांनी ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. त्यावर ठाकरे यांनी चर्चेसाठी दोन दिवसांचा वेळ घेतला. दोन दिवसानंतर उमेदवारीचा शब्द मिळाल्यास ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले.

हेही वाचा : कर्नाटक भाजपातील नाराजी मिटता मिटेना, ‘केजेपी-२’ म्हणत यत्नल यांची विजयेंद्र यांच्यावर टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीकडून बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळाल्यास पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. वाघेरे आणि बारणे यांची शहरात मोठी नातीगोती आहेत. गाववाले, नात्या- गोत्याच्या मतांची विभागणी होऊ शकते. त्याचा फटका खासदार बारणे यांना बसू शकतो. वाघेरे यांना अजित पवार यांच्या गटाचीही मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गटातील नेत्यांसोबत त्यांचे मधूर संबंध आहेत.