महेश सरलष्कर

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली असली तरी, या कारवाईविरोधात विरोधी पक्ष राऊतांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी विरोधकांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीची असल्याची टीका भाजपवर केली आहे.

राऊतांच्या अटकेचे पडसाद सोमवारी राज्यसभेत उमटले. वरिष्ठ सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे खासदार अनिल देसाई व प्रियंका चतुर्वेदी हे दोघेही सभापतींच्या समोरील मोकळ्या हौदात उतरले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कधी नव्हे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खानही हौदात आलेल्या पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार कधीही निषेध व्यक्त करण्यासाठी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदारांना हौदात न उतरण्याची सूचना दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आपल्या आसनावरून विरोध दर्शवतात, असे कौतुकही सभापती व्यंकय्या नायडू यांनी केले होते. सोमवारी मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी सभापतींच्या मोकळ्या जागेत उतरून शिवसेनेच्या खासदारांना पाठिंबा दिला.

हेही वाचा.. औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्रीची संघटन बांधणी

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तपास यंत्रणाच्या गैरवापराबद्दल सभागृहात तातडीने चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी अनुच्छेद २६७ अंतर्गत नोटीस दिली होती. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे दोन्ही खासदार, फौजिया खान तसेच, काँग्रेसचे खासदार शक्तिसिंह गोहील यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आंदोलन करणाऱ्या खासदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. नायडू यांनी अनिल देसाई यांना वारंवार आपल्या आसनाकडे जाण्याची सूचना केली. ‘’देसाई तुम्ही तुमच्या जागेवर बसा, राऊत यांच्या अटकेसंदर्भातील विषय तुम्ही सभागृहात उपस्थित करू शकत नाही. सभागृहाबाहेर घडणाऱ्या घटनांचा मुद्दा घेऊन सभागृहामध्ये त्यावर चर्चा करण्याची मागणी करू शकत नाही’’, असा अर्थ ध्वनीत होणारी सूचना नायडू यांनी देसाई यांना केली.

राज्यसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रियंका चतुर्वेदी संसदेच्या आवारात ‘’ईडी-एक्सटेंडेड डिपार्टमेंट ऑफ बीजेपी’’ असे लिहिलेला फलक घेऊन भाजपचा निषेध करत होत्या. हेच फलक अनिल देसाई व प्रियंका चतुर्वेदी यांनी सभागृहातही आणले होते. शिवसेनेच्या खासदारांच्या सुरात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनीही सूर मिळवला होता. मात्र, खासदारांनी निदर्शने सुरू ठेवल्याने नायडू यांनी दोन-चार मिनिटांमध्ये सभागृहाचे कामकाज तासाभरासाठी तहकूब केले.

हेही वाचा.. काँग्रेस नेत्यांकडून पटोलेंच्या तुलनेत पवारांना झुकते माप, पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यातील चित्र, राजकीय वर्तुळात चर्चा

संजय राऊत यांच्या अटकप्रकरणात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. भाजपला ‘’विरोधकमुक्त भारत’’ करायचा असल्याने संजय राऊत यांना अटक केली आहे. एखाद्या पक्ष चालवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरी ११ लाख रुपये मिळाले म्हणून ‘’ईडी’’ने अटक करावी? मालमत्तेसंदर्भातील प्रकरण असेल तर त्यासाठी कायदे आहेत. राऊतांच्या घरी जाऊन त्यांनी ६ तास चौकशी करून त्रास द्यायचा, ही सगळी कृती म्हणजे विरोधकांचे अस्तित्व संपवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. संजय राऊत कायद्याची लढाई लढतील, असेही खरगे म्हणाले. संजय राऊत हे कणखर व धैर्यशील नेता असल्याचे मत लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी व्यक्त केले. तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनीही भाजपवर टीका केली: ईडीची कारवाई म्हणजे राजकीय सुडबुद्धीने केलेली कृती असल्याचे सेन म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मात्र, संजय राऊत यांच्या अटकेवर उपहासात्मक टिप्पणी केली. आता पत्रकारांचे कसे होणार? रोज सकाळी राऊत पत्रकारांना बोलवून काहीबाही बोलत असतात. राऊतांना अटक झाल्यामुळे कष्ट न करता मिळणाऱ्या बातम्या बंद झाल्या, असे राणे म्हणाले. संजय राऊत यांच्या घरी ‘’ईडी’’च्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि राऊत यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांच्या घराबाहेर गर्दी जमवली होती. तिथे जमून लोक एकप्रकारे चौकशीत अडथळा आणत होते. त्यांच्याविरोधातही कारवाई केली पाहिजे, असे राणे म्हणाले.