लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महायुतीत तिढा असलेल्या जागांचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांपैकी तीन जागा सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. असे असले तरी ठाण्यातील प्रतिष्ठेच्या जागेवर शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असताना लगतच्या पालघर लोकसभेची जागा नेमकी कोणाला सुटणार याविषयी संभ्रम अजूनही कायम आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असले तरी याठिकाणी शिवसेना-भाजपमध्ये उमेदवाराची अदलाबदल होणार की गावित हे पुन्हा धनुष्यबाण याच चिन्हावर निवडणूक लढणार हे पहाणेही रंजक ठरणार आहे.

मतदार संघाची फेररचना झाल्यानंतर सन २००९ पासून पालघर लोकसभाची जागा भाजपाने २०१८च्या पोटनिवडणुकीपर्यंत लढवली होती. २०१४ व २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळाला असला तरी २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना- भाजपा युती च्या जागा वाटपा दरम्यान ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यावेळी शिवसेनेने भाजपाकडून पोटनिवडणुकीत विजयी झालेले राजेंद्र गावित यांना आयात केले होते. पालघरची जागा भाजपला मिळावी यासाठी पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी शर्थीचे प्रयत्न करत आहे. शिवसेनेतील दुभंगानंतर पालघरमध्ये भाजपची ताकद अधिक असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे. तसेच बदललेल्या राजकीय गणितात पालघर मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवा अशी गणिते पक्षाकडून मांडली जात आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या व्यासपिठांवर विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शक्ती प्रदर्शन, नारेबाजी तसेच मतप्रदर्शनही यापुर्वी केले आहेत. त्यामुळे या जागेसाठी या दोन्ही पक्षांमध्ये कमालिची चुरस आहे.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
Vanchit Bahujan Aghadi
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग

हेही वाचा : राज्यात कोण किती पाण्यात याचा येणार अंदाज, जनतेच्या न्यायालयातील लढाईचा कौल निर्णायक

मुख्यमंत्र्यांचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर ?

पालघरची जागा शिवसेनेकडे राहिली तर विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार का हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गोटातून शिवसेनेत असणाऱ्या इतर संभाव्य उमेदवारांची चाचपणीही केली जात असल्याचे वृत्त आहे. यापैकी काही इच्छुक उमेदवार मुंबईत तळ ठोकून बसल्याचे बोलले जाते. भाजप किंवा वसई-विरारमध्ये राजकीय वर्चस्व गाजविणाऱ्या काही ‘मित्रां’कडून यासाठी शिफारस मिळते का यासाठी देखील अनेकांचे प्रयत्न आहेत. असे असले तरी भाजपाने पालघर जागेवरील दावा कायम ठेवला असून अनेक भाजपा कार्यकर्त्यांना आपल्या पसंतीच्या उमेदवारांची पसंती भ्रमणध्वनी वरून झालेला सर्वेक्षणावरून चाचपणी करून केल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोर आला आहे. भाजपला ही जागा सुटल्यास विद्यमान खासदार कमळ या चिन्हावर लढतील असाही एक अंदाज बांधला जात आहे. याविषयी स्थानिक पातळीवर भाजपचे पदाधिकारी मात्र जाहीरपणे बोलण्यास तयार नाहीत.

हेही वाचा : मोदी ‘चारसो पार’ की, सत्तेपार?

बहुजन विकास आघाडीचा कोणाला फटका

बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. वसई, पालघर व इतर तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांची मेळावे आयोजित करून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. २००९च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बाळाराम जाधव हे निवडून आले होते. पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची चांगली ताकद आहे. जिल्ह्यात पक्षाचे तीन आमदार आहेत. यामुळेच बहुजन विकास आघाडी रिंगणात उतरल्यास महायुतीला फटका बसू शकतो.