नाशिक – नाशिक मतदारसंघात इच्छुक उमेदवार नाहीत ही अडचण नाही. याठिकाणी भरपूर इच्छुक हीच अडचण आहे. महायुतीतील भाजप आणि मित्रपक्षांकडे ओबीसी, वंजारी समाजातीलही इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये जास्त लक्ष द्यावे, सर्वांना बरोबर घ्यावे, असा सल्ला देत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याविरोधात भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. बुधवारी बीड येथील जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे केले जाईल, असे विधान केल्यामुळे महायुतीच्या स्थानिक गोटात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे महिना होऊनही नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. निर्णयास विलंब होत असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून स्वत:हून माघार घेतली. नाशिक व ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. नाशिकची जागा कुणाच्या पदरात पडणार, उमेदवार ओबीसी की मराठा असणार, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याचवेळी प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून रिंगणात उतरवले जाईल, असे विधान केल्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत आहेत.

हेही वाचा – TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा

नाशिकसाठी महायुतीतील पक्षांकडे ओबीसी आणि वंजारी समाजातील कोण, कोण उमेदवार आहेत, याची यादीच भुजबळांनी कथन केली. बीडची निवडणूक १३ तारखेला असून पंकजा मुंडे यांनी तिकडे लक्ष द्यावे. कुठल्याही परिस्थितीत त्यांनी निवडून येणे ही समाजाची गरज असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटेल, हे वरिष्ठ नेतेच सांगू शकतील. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा या जागेवर दावा कायम आहे. उमेदवारी मिळाली असती तर आपणही विजयी झालो असतो, अशी परिस्थिती असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळांना तिकीट न दिल्याने ओबीसी समाज महायुतीवर नाराज आहे का, या प्रश्नावर त्यांनी आपण ज्योतिषी नसल्याचे सांगितले. निवडणूक काळात काही घटना घडल्यानंतर लोक सकारात्मक-नकारात्मक भावना व्यक्त करतात. हे सर्व मागे ठेऊन पुढे जायला हवे, असे त्यांनी सूचित केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाविषयी उत्तर देताना, विरोधक आपल्या पक्षाची मते मांडतात. कधी प्रेम व्यक्त करतात. कधी पुतना मावशीचे प्रेम व्यक्त करतात, असे आपण म्हणणार नाही, असा टोला त्यांनी हाणला.

हेही वाचा – मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित

शिरुरच्या प्रस्तावास भुजबळांचा नकार

नाशिकचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपणास शिरूर लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि माळी समाजाची संख्या अधिक असल्याने आपण तिकडे लढू शकता का, याबाबत विचारणा केली होती. ओबीसी समाज संपूर्ण महाराष्ट्रात आहे. परंतु, आपले संपूर्ण काम नाशिकमध्ये आहे. आपणास उमेदवारी हवी, हा अट्टाहास नाही. दिल्लीतून सांगितल्याने आपण नाशिकसाठी तयार झालो होतो. तिकीट पाहिजे म्हणून इतरत्र जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी भूमिका आपण मांडल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. महायुतीने शिरूर मतदारसंघात भुजबळांना आपल्या विरोधात मैदानात उतरवण्याची तयारी केली होती, या डॉ. अमोल कोल्हे यांच्या विधानावर भुजबळांनी भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या हेतूने तो प्रस्ताव मांडला होता. परंतु, आपणास नाशिकमध्ये काम करायचे असल्याचे भुजबळांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde should focus on beed instead of nashik advice from chhagan bhujbal print politics news ssb
Show comments