जालना – परतूर तालुक्यातील वाटूर गावात आयोजित ‘ घर -घर सोलार ‘ कार्यक्रमात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्र आणि राज्याच्या योजना सांगताना केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेचा भडीमार झाला. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनीही लोणीकर यांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त केली. काही मुलांनी समाजमाध्यमांवर गावातील नऊ-दहा जण आमदारांच्या दावणीला बांधलेले असल्याबद्दल टाकलेल्या मजकुराचा लोणीकर यांना राग आला आणि त्यांनी वादग्रस्त विधाने केली. चपला बुटापासून ते मोबाईलपर्यंत सर्व काही मोदी यांच्यामुळेच मिळाले असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणानंतर लोणीकर एकदा दोनदा नव्हे तर पाच वेळेस आमदार झाले. पाच वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्रीही राहिले. परतूर विधानसभा मतदारसंघात गेली चार दशके राजकारण करताना त्यांनी सातत्याने अनेक प्रश्नांवर संघर्ष केला. राजकीय चळवळीतील आक्रमकतेमुळे कित्येक गुन्हेही त्यांच्यावर दाखल झाले. भाजप पक्षांतर्गत जिल्ह्यात परतूर आणि मंठा तालुक्यात त्यांनी कायम आपला सवतासुभा कायम ठेवला. त्यामुळे जिल्ह्यात भाजप पक्षांतर्गत रावसाहेब दानवे आणि लोणीकर यांच्यातील राजकीय गटबाजीची चर्चा कायमच राहात आलेली आहे.
मतदार संघातील कार्यक्रमांसाठी त्यांना अन्य बाहेरचा नेता नेहमीच लागतो असे नाही. अघळपघळ आणि लांबलचक त्याप्रमाणेच मोदी तसेच फडणवीस यांच्या कामांचा कायम उदोउदो हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य ! मग अनेकदा त्यांची वक्तव्ये वादग्रस्त बनतात. वादग्रस्त विधानांमुळे टीका होण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. पाणी प्रश्नावर मोर्चासाठी एखाद्या नटीला आणणे जमले नाहीत तर आपल्या तहसीलदार मॅडम आहेत. त्या काही नटींपेक्षा कमी नाहीत, असे वक्तव्य त्यांनी यापूर्वी एकदा केले होते. यासंदर्भात टीका झाल्यावर त्यांनी सारवासारव केली होती.
परतूरमधील एका पोलीस अधिकाऱ्यास धमकावल्याची त्यांची ध्वनीफितही चर्चेचा विषय झाली होती. पालकमंत्री असताना अनेक बैठकांत त्यांच्याकडून आधिकाऱ्यांना उद्देशून वापरण्यात येणारी भाषा हाही चर्चेचा विषय झाला होता. लोणीकर यांचे शिक्षण आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची बी. ए. प्रथम वर्षाची दिलेली परीक्षा हा विषयही गाजला होता.
परतूर विधानसभा मतदार संघातील एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर यांनी त्या गावात मराठा समाजाची मते बोटांच्या कांड्यांवर मोजण्याइतकी आणि अन्य मते अधिक असली तरी ती आपल्यासोबत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरूनही लोणीकर यांच्यावर टीका झाली आणि स्पष्टीकरणाची वेळ त्यांच्यावर आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी लोणीकर यांच्या अपेक्षित संचालकास संधी मिळू शकली नव्हती. त्याचा राग लोणीकर समर्थकांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) राजेश टोपे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यावर काढला होता. यावेळी लोणीकर यांनी टोपे यांच्या संदर्भात वापरलेली भाषा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली होती. थोडक्यात लोणीकर यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यानंतर त्यांना करावे लागणारे स्पष्टीकरण ही बाब काही नवीन नाही. सारवासारव ही जणू त्यांची सवयच असल्याचेही त्याचे विरोधक सांगतात.