यवतमाळ : राज्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान राहिलेल्या पुसद येथील नाईक घराण्यात अखेर राजकीय फूट पडली. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे बंधू, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती नाईक यांनी वडील आणि कुटुंबीयांच्या तीव्र विरोधानंतरही भाजपमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल प्रदेश कार्यकारिणीकडून अद्याप कुठल्याही सूचना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या नसल्याने या प्रवेशाबाबत अनेक चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत.
राज्याच्या राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळपासून नाईक घराण्याचे राजकीय वर्चस्व आहे. वसंतराव आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या घराण्याने महाराष्ट्राला दिले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक त्यांच्यासोबत गेले. आता मनोहरराव नाईक व त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. इंद्रनील नाईक हे लहान असुनही वडिलांनी राजकीय वारसा त्यांच्याकडे सोपविल्याने ययाती नाईक गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असल्याची चर्चा पुसदमध्ये आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ययाती नाईक यांनी घरातच बंडाचे निशाण फडकवून इंद्रनील यांना आव्हान दिले होते. अखेर त्यांची समजूत घालून त्यांना वाशिम जिल्ह्यात निवडणूक लढण्यासाठी राजी केले. मात्र ययाती नाईक आजतागायत नाराज असल्याची चर्चा आहे.
गेल्या वर्षभरापासून ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू होती. त्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांकडे विचारणा केली. मात्र काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या मनोहराराव नाईक यांनी भाजपच्या नेत्यांना घरात राजकीय फूट पाडू नका, अशी विनंती केली होती, अशी विश्वसनीय माहिती आहे. त्यांच्या मतांचा आदर करून प्रदेश भाजपने ययाती यांना भाजपात प्रवेश देण्याचा मुद्दा दुर्लक्षित केला होता. प्रदेश भाजप पक्ष प्रवेश देणार नसल्याचे लक्षात आल्याने ययाती यांनी थेट दिल्ली गाठून तेथील वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश केला. याची माहिती ते प्रवेश करेपर्यंत प्रदेश भाजपला नसल्याचे सांगण्यात येते. ययाती नाईक यांना अचानक पक्षात प्रवेश दिल्याने स्थानिक पातळीवर ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र आहे.
पुसद मतदारसंघातील बंजारा समाज नाईक घराण्याच्या शब्दापलिकडे नाही. त्यामुळे बंजारा सामाजाला आपलासा करणारा चेहरा भाजपला हवाच होता. यापूर्वी भाजपने हा प्रयोग मनोहरराव नाईक यांचे पुतणे ॲड. नीलय नाईक यांना पक्षात घेवून आणि विधान परिषदेची आमदारकी देवून केला. मात्र नीलय नाईक हे बंजारा समाजाला एकसंघपणे भाजपकडे खेचू शकले नसल्याने त्यांच्या कामगिरीवर पक्ष नेतृत्व फारसे समाधानी नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने याच कुटुंबातील तरूण पिढीला पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे गुजरातशी आणि सासरवाडीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेले संबंध बघून निवडणुकीपूर्वी त्यांनाही भाजपमध्ये येण्याची ऑफर मिळाली होती. मात्र त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो फायदेशीरही ठरला. त्यामुळे भाजपने आता इंद्रनील यांचे ज्येष्ठ बंधू ययाती यांनाच भाजपात घेवून एकाचवेळी इंद्रनील नाईक व नीलय नाईक या दोघांनाही शह दिल्याची चर्चा आहे. भाजपच्या या खेळीने राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या नात्यात अंतर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ययाती नाईक यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला पुसदमध्ये ऊर्जितावस्था येईल, असा विश्वास भाजपच्या एका गोटात आहे. ययाती नाईक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यांची कार्यकर्त्यांची फळी मजबूत असल्याने त्याचा फायदा भाजपला होईल, असे मानले जात आहे. तर ययाती यांच्या भाजप प्रवेशाने एक गट नाराज असल्याची चर्चा आहे. खुद्द नीलय नाईक व ययाती नाईक यांच्यात फारसे सख्य नसल्याने भाजपमध्ये हे दोन भाऊ कशी वाटचाल करतील, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात नीलय नाईक यांना विचारण केली असता, एका खासगी बैठकीत असल्याने नंतर बालूया म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. तर दोन दिवसांपूर्वी ययाती यांच्या भाजप प्रवेशानंतर काही माध्यम प्रतिनिधींशी बोलतानाही त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.