Rahul Gandhi vs Election Commission Controversy : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष्य करीत आहेत. मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांनी निवडणूक आयोगावर मंगळवारी (तारीख १२ ऑगस्ट) पुन्हा एकदा टीका केली. ‘पिक्चर अभी बाकी है’ असं म्हणत राहुल यांनी आपल्याजवळ मतचोरीचे आणखी पुरावे असल्याचे संकेत दिले. दरम्यान, काँग्रेसकडे एकूण ४० हून अधिक जागांवर मतचोरी झाल्याची माहिती असून लवकरच पुरावे सादर केले जातील, अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं द इंडियन एक्स्प्रेसला दिली.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करीत राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात जाहीर पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसनं स्थापन केलेल्या एका पथकानं बंगळुरू येथील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचे परीक्षण केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. या मतदारसंघात भाजपा व निवडणूक आयोगानं संगनमत करून मतचोरी केल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

काँग्रेसकडे ४० मतदारसंघातील पुरावे?

द इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या नेत्यांची राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांनी आपल्याकडे जवळपास ४० हून अधिक लोकसभा जागांवर मतचोरीचे पुरावे असल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर हे पुरावे आपण लवकरच सादर करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीआधी मंगळवारी राहुल यांनी निवडणूक आयोगावर ‘वन मॅन, वन वोट’ या तत्त्वाची अंमलबजावणी न केल्याचा आरोप केला. काँग्रेस पार्टी संविधानाचे रक्षण करण्याच्या लढ्यात उतरली असून ही लढाई सुरूच राहणार, असंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात नरमले? भारतावर दबाव नेमका कशासाठी? कारण काय?

पूर्वी आमच्याकडे मतचोरीचे पुरावे नव्हते : राहुल गांधी

“फक्त एका जागेवरच नव्हे तर अनेक जागांवर मतचोरी झाली आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे केले जात आहे. निवडणूक आयोगालाही याची माहिती आहे आणि आम्हालाही,” असे राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, “पूर्वी आमच्याकडे मतचोरीचे पुरावे नव्हते, पण आता ते आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करतो. ‘वन मॅन, वन वोट’ या तत्त्वाची अंमलबजावणी करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; पण आयोगानं ती पार पाडलेली नाही.” बिहारमधील ‘१२४ वर्षांच्या’ मतदार मिंता देवी यांच्याबाबतच्या वादाबद्दल विचारले असता राहुल म्हणाले, “अशा प्रकारची असंख्य प्रकरणे आहेत. अभी पिक्चर बाकी है…”

गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, ‘मतांची फेरफार’ केवळ एका विधानसभा मतदारसंघात (महादेवपुरा) झालेली नाही, तर त्यामागे एक ठराविक पद्धत आहे. आम्ही या पद्धतीचा अभ्यास केला आहे. हा गुन्हा प्रत्येक राज्यांत व देशभरात मोठ्या प्रमाणात केला जात आहे, अशी आम्हाला खात्री आहे. याच कारणामुळे ‘एक्झिट पोल’ आणि पक्षांचे अंतर्गत सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात चुकीचे ठरतात, असंही ते म्हणाले.

Rahul Gandhi vs Election Commission controversy
लोकसभेतील विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी (छायाचित्र पीटीआय)

निवडणूक आयोग पुरावे नष्ट करतंय : राहुल गांधी

“मशीन-रीडेबल मतदार याद्या न देणे आणि कायदा बदलून सीसीटीव्ही फुटेज नाकारणे यामुळे आम्हाला खात्री झाली की, निवडणूक आयोगानं भाजपाशी संगनमत करून निवडणुका चोरल्या आहेत,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाकडून देशभरातील मत चोरीचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, सोमवारी (तारीख ११ ऑगस्ट) बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाविरोधात व कथित मत चोरीच्या आरोपांवरून इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या वाटेतच अडवून ताब्यात घेतलं, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप कोणते?

राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर एकापाठोपाठ एक आरोपांचा भडिमार केला. त्यांचा पहिला आरोप हा निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भातला होता. राहुल म्हणाले, “भारतात एक काळ असा होता की, जेव्हा ‘ईव्हीएम’ नसताना सगळा देश एकाचवेळी मतपत्रिकेवर मतदान करायचा; पण आताच्या काळात अनेक महिने मतदानाची प्रक्रिया चालते. मतदानाचे इतके टप्पे का केले जातात, यावरून साशंकता निर्माण होते. बऱ्याचदा निवडणुकीचं वेळापत्रक बदललं जातं, हे सगळं निवडणूक नियंत्रित करण्यासाठी केलं जातं.”

हेही वाचा : अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? पुन्हा महामंदी येणार? १९२९ मध्ये काय घडलं होतं?

राहुल गांधींनी केलेला हा सगळ्यात मोठा आरोप मतचोरीचा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मतचोरीचा संशय अधिक बळकट झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांत जितके नवे मतदार जोडले गेले नाहीत, तितके पाच महिन्यांत जोडण्यात आले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर अचानकच मताधिक्यात वाढ होणे, बनावट मतदारांनी मतदान करणे, मतदार यादीत मतदारांचे खोटे पत्ते व अवैध फोटो असणे, कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघात एक लाख मतदारांची वाढ होणे, असे असंख्य आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केले आहेत. आगामी काळात ४० मतदारसंघातील मतचोरी उघड केली जाईल, अशी माहिती त्यांनी बैठकीत दिल्यानं यावरून राजकारण आणखीच तापण्याची शक्यता आहे.