Mahadevapura Assembly Constituency : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १,००,२५० मतांची चोरी केली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं. मागील दोन दशकांत या मतदारसंघाचा झपाट्यानं विकास झाला आहे. एकेकाळी बेलंदूर, वारथूर व मराठाहल्ली यांसारख्या शांत गावांचा समूह असलेला हा भाग आता प्रचंड वाहतूक, काचेच्या इमारती असलेली मोठी टेक पार्क्स व मोठमोठ्या अपार्टमेंट संकुलांनी व्यापलेला आहे. मात्र, असं असलं तरीही या भागातील मुख्य रस्त्यांच्या मागील गल्लीबोळांत अजूनही जुन्या गावाच्या आठवणी दिसून येतात, जिथे पक्क्या घरांपासून टिनच्या झोपड्यांपर्यंत अनेक निवासस्थानं आहेत, ज्यामध्ये फूड डिलिव्हरी बॉय, हॉटेलचे कर्मचारी, घरकाम करणारे, कचरा व्यवस्थापन कर्मचारी व बांधकाम कामगार राहतात.

राहुल गांधी यांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा मतदारसंघातील मतदार यादीत एक लाखाहून अधिक नावं संशयास्पद होती. त्यापैकी अनेकांची नावं वेगवेगळ्या मतदारसंघात आहेत. त्याचबरोबर काहींचे पत्ते खोटे असून, त्यांनी मतदार नोंदणीच्या वेळी चुकीची छायाचित्रे दिलेली आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या सर्वांत मोठा आरोप म्हणजे एकाच पत्त्यावर मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली आहे. मराठाहल्ली बूथ क्रमांक ३६६ मधील घर क्रमांक ७९१ मध्ये ४६ मतदार, विनायक नगर बूथ क्रमांक २४३ मध्ये १५३ मतदार, बीअर स्ट्रीट परिसरातील घर क्रमांक १५३ मध्ये ६८ मतदार व मुनीरेड्डी गार्डन बूथ क्रमांक ४७० मधील घर क्रमांक ३५ मध्ये ८० मतदार असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

दरम्यान, दी इंडियन एक्स्प्रेसने राहुल गांधी यांनी नमूद केलेल्या या तीन पत्त्यांचा सविस्तर आढावा घेतला असता, तिथे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित राहत असल्याचं दिसून आलं. विशेष बाब म्हणजे राहुल गांधी यांनी नमूद केलेल्या मतदार याद्यांतील १९४ पैकी एकही व्यक्ती या ठिकाणी राहत नसल्याचं तेथील व्यवस्थापकांनी सांगितलं आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं महादेवपुरा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता. याच मतदारसंघानं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या विजयाला हातभार लावला होता.

आणखी वाचा : राहुल गांधी म्हणतात, पिक्चर अभी बाकी है! मतचोरी संदर्भात सादर करणार आणखी पुरावे?

घर क्रमांक ७९१, मराठाहल्ली : ४६ मतदारांचा पत्ता

मराठाहळ्ळी परिसरातील मुख्य रस्त्याजवळ जुन्या तुलसी टॉकीजच्या मागच्या बाजूला घर क्रमांक ७९१ आहे. तेथे स्थलांतरितांसाठी पेईंग गेस्ट सुविधा, फूड कॅन्टीन व कमी दरातील रेस्टॉरंट्स चालवली जातात. या परिसरात आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे खालच्या पदांवरील कर्मचारी राहतात. येथील इमारतींवर घर क्रमांक स्पष्टपणे लिहिलेले नाहीत. गेल्या ३० वर्षांपासून घर क्रमांक ७९१ मध्ये राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्यानं सांगितलं की, याच क्रमांकाच्या दुसऱ्या एका इमारतीत ‘अक्षया पीजी’ नावाची पुरुषांसाठी पेईंग गेस्ट सुविधा असून, त्याला १० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. तेथे २५ खोल्या असून, एकाच वेळी ७५ लोक राहू शकतात. ही जागा फूड डिलिव्हरी सेवेत काम करणाऱ्या तेलुगू कामगारांमध्ये लोकप्रिय आहे. २०२० च्या वीजबिलावरून या इमारतीचा मालक नागराजा रेड्डी असल्याचं समजतंय.

राहुल गांधींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील मतदार यादीत या पत्त्यावर नोंदवलेली ४६ नावं दिली आहेत. मात्र, ‘अक्षया पीजी‘चे केअरटेकर माधव राव यांच्या मते, त्यापैकी कोणीही सध्या या पत्त्यावर राहत नाही. कोविडच्या काळात सर्व कामगार तेथून निघून गेले आहेत. आमच्याकडे पेईंग गेस्ट सातत्यानं बदलत असतात. काही जण दोन-तीन महिने राहतात, तर काही वर्षभर; पण फार कमी लोक दीर्घकाळ राहतात, असं माधवराव यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

“पेईंग गेस्ट सतत ये-जा करत असतात. त्यापैकी काही जण नोकरीसाठी मतदार ओळखपत्र काढतात,” असे ‘अक्षया पीजी‘च्या शेजारी असलेल्या टेलर दुकानाच्या मालकाचं म्हणणं आहे. योगायोगानं राहुल गांधींनी दिलेल्या ४६ मतदारांपैकी बहुतेक जण आंध्र प्रदेशातील आहेत. “माझ्याकडे तीन खोल्यांचं घर आहे, जे एका हॉटेल ग्रुपला भाड्यानं दिलं आहे. तिथे २० लोक राहतात. एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंदलेले असण्याचा अर्थ ते बनावट मतदार आहेत, असा होत नाही,” असं एका स्थानिक दुकानदारानं दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

घर क्रमांक १५३, विनायक नगर : ६८ मतदार

बंगळुरूच्या व्हाईटफील्ड भागात असलेल्या घर क्रमांक १५३ मध्ये ‘बीअर स्ट्रीट’ नावाचा बीअर तयार करण्याचा कारखाना आहे. जवळपास एक एकराहून अधिक जागेवर हा कारखाना उभा आहे. त्याच परिसरात काही लक्झरी दुकानं असलेलं छोटे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. या पत्त्यावर मतदार यादीत नोंद झालेल्या मतदारांबाबत राहुल गांधी म्हणाले, “१५३ ,बीअर स्ट्रीट या पत्त्यावर ६८ मतदार नोंदवले गेले आहेत. खरंच, एका बीअर तयार करण्याचा कारखान्यात इतके लोक राहू शकतील का?” दरम्यान, या कारखान्याच्या दोन वेगवेगळ्या व्यवस्थापकांनी सांगितलं की, मतदार यादीत नाव असलेल्या या व्यक्ती कदाचित येथे पूर्वी काम करीत असावेत. सध्या या लोकांपैकी कोणीही येथे काम करीत नाही. अलीकडेच व्यवस्थापन बदलले आहे आणि बहुतांश कर्मचारी नवीन आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांच्या ओळख पडताळणीसाठी फक्त आधार आणि पॅन कार्ड घेतो, त्यांना येथील पत्ता असलेलं मतदार ओळखपत्र देत नाही.

Rahul Gandhi vote chori charge election commission
लोकसभेतील विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी

मुनीरेड्डी गार्डन : एका पत्त्यावर ८० मतदारांची नोंद

महादेवपुरा मतदारसंघातील मुनीरेड्डी गार्डन या परिसरातील बहुतेक मालमत्ता आंध्र प्रदेशातील रेड्डी समाजातील स्थानिक जमीनमालकांच्या नावावर आहेत. येथील अनेक जागा ‘पेइंग गेस्ट’साठी किंवा स्थलांतरित मजुरांसाठी भाड्यानं देण्यात आल्या आहेत. घर क्रमांक ३५ हे जयराम रेड्डी यांच्या मालकीचं असून, सध्या येथे दोन महिन्यांपासून पश्चिम बंगालमधील एक स्थलांतरित मजुराचं कुटुंब राहतं. त्यांपैकी एकाचेही महादेवपुरा मतदारसंघातील मतदार यादीत नाही, अशी माहिती केअरटेकर सुरेश कुमार यांनी दिली. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी सादर केलेल्या यादीतील एकही व्यक्ती येथे राहत नाही आणि त्यांच्या नावापुढे या ठिकाणचा पत्ता नेमका कसा आला? हे आम्हालाच माहीत नाही.”

हेही वाचा : भाजपा विरुद्ध भाजपा : दोन दिग्गज एकमेकांविरोधात लढले; निवडणुकीत कुणाचा झाला विजय?

भाजपाच्या स्थानिक नेत्यानं काय सांगितलं?

भाजपाचे स्थानिक नेते व महादेवपुरा मतदारसंघाचे माजी आमदार अरविंद लिम्बावली यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “आमच्या चौकशीत असं आढळलं की, घर क्रमांक ३५ वर नोंद असलेल्या ८० मतदारांपैकी प्रत्यक्षात फक्त सहा जणांनीच मतदान केले.” राहुल गांधी यांनी विनायक नगरमधील घर क्रमांक १५३ संदर्भात केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले, “तिथे ६८ कामगार मतदार म्हणून दाखवले गेले होते. कारण- त्यांची वसतिगृहात एकत्र राहण्याची सोय होती. प्रत्यक्षात ६८ पैकी फक्त दोन जणांनीच २०२४ च्या निवडणुकीत मतदान केले. राहुल गांधींचे सर्व आरोप निराधार आहेत. महादेवपुरामध्ये कोणतीही बेकायदा गोष्ट घडलेली नाही. आम्ही वैध मार्गाने जिंकलो आहोत, हे राहुल गांधींनी लक्षात घ्यावं.”

महादेवपुरातील मतदारांच्या संख्येत १४० टक्के वाढ

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २००८ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत महादेवपुरा मतदारसंघातील मतदारांची संख्या तब्बल १४० टक्क्यांनी वाढली आहे. २००८ मध्ये येथे दोन लाख ७५ हजार मतदार होते. आता २०२४ मध्ये ही संख्या सहा लाख सहा हजारांवर पोहोचली आहे. त्याच्या तुलनेत, बंगळुरू सेंट्रलमधील सर्वज्ञनगर मतदारसंघात केवळ २६.५% वाढ झाली आहे. तर, शांतीनगर २५.२%; सी. व्ही. रमण नगर २३.१%, शिवाजीनगर १९.८%, राजाजी नगर १३.७%, चामराजपेट १२.६% व गांधी नगरमध्ये तीन टक्के मतदार वाढले आहेत. महादेवपुरा विधानसभा व बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघात भाजपानं सलग चार वेळा विजय मिळवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा मतदारसंघात भाजपाचं मताधिक्य ४७ हजार ९०१ ने वाढलं आहे; तर काँग्रेसचं मताधिक्य २१ हजार ७४४ ने कमी झाल्याचं दिसून येत आहे.