अलिबाग- रायगड जिल्ह्यातमहायुतीमधील विसंवाद, मतभेद, कुरघोड्यांचे राजकारण थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. पाली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महायुतीत जोरदार संघर्ष पहायला मिळाला, अनेक प्रयत्न करूनही सन्मानजनक तोडगा निघू न शकल्याने, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत शिंदेच्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला.

उच्च न्यायालयाने माजी नगराध्यक्ष प्रणाली पाटील यांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत भाजपचे पराग मेहता निवडून आले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणी दबके यांचा पराभव केला. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपच्या मेहता यांना नऊ तर दबके यांना पाच मतं पडली. एक मतदार तटस्थ राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस कडून नलिनी म्हात्रे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आधी होती. त्यामुळे नगरपंचायतीसाठी महायुती मधील तीन घटक पक्षात चुरस पहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अखेरच्या क्षणी नलिनी म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. भाजपच्या मेहता यांच्या पारड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मतं टाकल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या निवडणूकीत शिवसेना शिंदे गट एकाकी पडल्याचे चित्र पहायला मिळाले. नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या बाजूने वळवण्यात भाजपचे संघटक सतीश धारप आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली. खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याशी संपर्क साधत मेहतांच्या विजयचा मार्ग मोकळा करून घेतला, आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या तोंडावर पहिला मोठा धक्का दिला.

गेल्या काही महिन्यापासून पासून जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील संबध रायगडच्या पालकमंत्री पदावरून कमालीचे ताणले गेले आहेत. या नाराजीचा अचून फायदा उचलत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूने करून घेतले. त्यामुळे शिंदेची शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र या निमित्ताने पहायला मिळाले.

युतीचा पाली पॅटर्न शिवसेना शिंदे गटासाठी आगामी काळतही त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदेगटाचा वाढता प्रभाव हा महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांसाठीही डोईजड ठरणारा आहे. त्यामुळे शिवसेने शिंदे गटाला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

पालकमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना आमदारांची कोंडी करण्याचे धोरण जिल्ह्यात स्विकारले होते. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणीला सुरूवात केली होती. मात्र त्याच वेळी भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघाकडे दूर्लक्ष केले होते. त्यामुळे भाजपशी जळवून घेणे आणि शिवसेना शिंदे गटाला खिंडत गाठणे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यानंतर जिल्ह्यात नगर पालिका, महानगर पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणूका होणार आहे. अशा वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत निवडणूक लढवली, तर जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेची मोठीच कोंडी होण्याची शक्यता आहे.