Rajiv Pratap reddy Nishikant Dubey conflict भारतीय जनता पक्षाचे (खासदार) राजीव प्रताप रुडी यांनी डिजिटल मिडिया ग्रुप ‘न्यूजलॉन्ड्री’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्याच पक्षातील खासदारावर गंभीर आरोप केले आहेत. या मुलाखतीत ते खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात बोलले आहेत. आक्रमक भाषणातून पक्षाची बाजू मांडणारे निशिकांत दुबे भाजपाचा आक्रमक चेहरा आहेत. मात्र, राजीव प्रताप रुडी यांनी त्यांचा उल्लेख अहंकारी म्हणून केला आहे. राजीव प्रताप रुडी यांनी निशिकांत दुबे यांच्यावर काय आरोप केले? भाजपात पक्षांतर्गत कलह सुरु आहे का? जाणून घेऊयात…

राजीव प्रताप रुडी काय म्हणाले?

डिजिटल मिडिया ग्रुप ‘न्यूजलॉन्ड्री’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्न करण्यात आला की, कॉन्स्टीट्युशन क्लब निवडणुकीदरम्यान तुम्हाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पाठींबा होता, तर गृहमंत्री अमित शाह यांचा पाठींबा माजी खासदार संजीव बालीयान यांना होता. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, ही चुकीची माहिती पसरवली गेली. राजीव रुडी नाव न घेता निशिकांत दुबेवर टीका करत म्हणाले की, “केवळ एक व्यक्ती आहे जो संसदेत आपली स्वतःची सरकार चालवत आहे आणि अहंकारी आहे. त्यांनीच ही खोटी माहिती पसरवली.”

राजीव प्रताप रुडी यांनी निशिकांत दुबे यांचा उल्लेख अहंकारी म्हणून केला आहे.(छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

राजीव प्रताप रुडी म्हणाले, “ही चुकीची माहिती एका व्यक्तीने पसरवली आणि त्या व्यक्तीला वाटते की तो संसद नियंत्रित करतो. संसदेत ते त्यांचा स्वतःचा शो चालवतात. त्यांनी या प्रकरणात गृहमंत्र्यांचे नाव सामील केले.” पत्रकाराने त्यांना विचारले की, तुम्ही निशिकांत दुबे यांच्याविषयी विचारत आहात का? यावर त्यांनी होकार दिला आणि तुमचा अंदाज खरा असल्याचे ते म्हणाले.

“निशिकांत दुबे अहंकारी”

राजीव प्रताप रुडी म्हणाले, “कधीकधी काही लोक अहंकारी होतात, संसदेत स्वतःचा शो चालवतात. त्यांनीच हे ठरवले की मी दिल्ली कॉन्स्टीट्युशन क्लबची निवडणूक जिंकू नये.” ते पुढे म्हणाले, ” त्यांची समस्या ही आहे की त्यांना स्वतःनुसार गोष्टी करायच्या आहेत. सरकारपेक्षा वेगळी त्यांची स्वतःची एक सरकार आहे आणि मी त्यांच्या सरकारचा भाग नाही. ” राजीव प्रताप रुडी यांनी दावा केला की, त्यांना निवडणुकीत अमित शाह, जेपी नड्डा या सर्वांचा पाठींबा होता. परंतु, विरोधात उमेदवार उभा करून त्यांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामागे निशिकांत दुबे असल्याचेही ते म्हणाले.

कॉन्स्टीट्युशन क्लबची निवडणूक चर्चेचा विषय का होती?

प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील सचिव (प्रशासन) पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप सिंह रुडी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार संजीव बालियान यांचा सुमारे १०० मतांनी पराभव केला. यंदाच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या प्रशासकीय निवडणुकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, कारण भाजपाच्या दोन बड्या नेत्यांमध्ये ही लढत होती.

रुडी यांच्या विजयामुळे क्लबमध्ये त्यांची २५ वर्षांची कारकीर्द कायम राहिली. मात्र, काही लोकांनी बालियान यांना पाठिंबा दिला आणि रुडी यांचा कार्यकाळ खूप मोठा झाला असून तो संपायला हवा, असे मत व्यक्त केले. झारखंडमधील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकारांना सांगितले होते की, “डॉ. बालियान जिंकतील, कारण हा क्लब आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वैमानिकांच्या हातात गेला आहे. तो परत खासदारांसाठी मिळवला पाहिजे आणि तो पुन्हा खासदार आणि माजी खासदारांच्या हातात असावा, त्यामुळेच आम्ही डॉ. बालियान यांना विजयी करू.”

विशेष म्हणजे काँग्रेसचे बहुतांश खासदार आणि माजी खासदारांनी बालियान यांच्याऐवजी रुडी यांना पाठिंबा दर्शवला होता. या निवडणुकीत मतदानास पात्र असणार्‍या खासदार आणि माजी खासदारांची संख्या १,२९५ होती, त्यापैकी ७०७ जणांनी मतदान केले. रुडी यांना ३९१, तर बालियान यांना २९१ मते मिळाली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती.