छत्रपती संभाजीनगर: हातून गेलेली मुस्लिम, दलित मतपेढी आणि महायुतीमधील मतांचे परिवर्तन घड्याळाच्या बाजूने होण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीत विरली असल्याने अजित पवार यांच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. मराठवाड्यात अजित पवार गटाने उस्मानाबाद लोकसभेची एकमेव जागा लढली होती. त्यात अर्चना पाटील यांचा पराभव झाला. यामुळे आता घड्याळ टिकवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. विधान परिषदेचे तीन सदस्य आहेत. मात्र, भाजपबरोबर गेल्यामुळे ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी भावना राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. असे असले तरी किमान १२ जागांवर विधानसभा निवणुकीत उमेदवार उभे करता येतील का, याची चाचपणी केली जात आहे.

मराठवाड्यात अजित पवार गटाची सर्वाधिक ताकद बीड जिल्ह्यात. परळी येथून धनंजय मुंडे, आष्टी – पाटोदामधून बाळासाहेब आसबे, माजलगावमधून प्रकाश सोळंके हे आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेलेले. लातूर जिल्ह्यातून उदगीरचे आमदार व मंत्री संजय बनसोडे, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील अशी सहा आमदारांची ताकद असणाऱ्या अजित पवार गटातील आमदार आता मतदारसंघातील भाजप नेत्यांशी जुळवून घेत होते. मंत्री बनसोडे तर रा. स्व. संघ परिवारातील सार्वजनिक कार्यातील संस्थांवर आवर्जून हजेरी लावत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची मते अजित पवार यांच्या बाजून वळण्याची शक्यता कमी दिसत असून मुस्लिम व दलित मतपेढीच हातची जात असल्याने आमदारांमध्ये चलबिचल आहे.

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये भाजपच्या ओबीसी जनाधाराला ओहोटी

हेही वाचा – डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा-गोंदिया, काँग्रेस)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे तसेच बाबा जानी हेही अजित पवार यांच्याबरोबर आहेत. विधान परिषदेतील या नेत्यांपैकी सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तशी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. मराठवाड्यातील बीड आणि लातूर वगळता अजित पवार यांच्या पाठिशी तसे ताकदवान नेते नाहीत. नांदेड, संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी या जिल्ह्यात निवडून आलेला एकही लाेकप्रतिनिधी नाही. परभणी जिल्ह्यात राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळाली असती तर जागा जिंकता आली असती, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, हातून निघून गेलेली मतपेढी आणि भाजपच्या मतांचे परिवर्तन घड्याळाच्या बाजूने होण्याची शक्यता कमी असल्याने अजित पवार गटात अस्वस्थता आहे.