संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवर एकहाती सत्ता होती. त्याचबरोबर ते स्वतः गेल्या ४० वर्षांपासून सलगपणे संगमनेर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवून होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा धक्कदायक पराभव झाला. त्यानंतर होणारी संगमनेर पालिकेची ही पहिलीच निवडणूक. म्हणूनच या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव घडवून आणण्यासाठी त्यांचे परंपरागत राजकीय विरोधक, सध्या भाजपमध्ये असलेले मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्वस्व पणाला लावले होते. आताही महायुतीतील शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांना पुन्हा एकदा पाठबळ देत मंत्री विखे यांनी थोरात यांची पालिकेतील सत्ता बदलण्यासाठी लढाई सुरू केली आहे.
संगमनेरमधील सहकारावर थोरात यांची मजबूत पकड आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्यावेळी आमदार खताळ यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना उमेदवारही देता आले नाहीत. परिणामी थोरात यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध घडवत आपली सहकारावरील मांड पक्की असल्याचे दाखवून दिले. आता पालिकेतील त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी मंत्री विखे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. म्हणूनही संगमनेर पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे.
संगमनेर पालिकेच्या निवडणुकीकडे आणखी एका कारणासाठी सर्वांचे लक्ष लागलेले आहे, ते म्हणजे थोरात यांनी भाचे, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या खांद्यावर पालिका निवडणुकीची धुरा सोपवली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने तरुण वर्गाने बदल घडवला. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी प्रथमच आपल्या प्रचार यंत्रणेत हा बदल घडवला आहे. त्यासाठी त्यांनी, पालिका निवडणुकीसाठी संगमनेर सेवा समितीची स्थापना केली आहे. विधान परिषदेत सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा मिळवत, विखे यांची मदत घेत पोहोचले. संगमनेर सेवा समितीमुळे आमदार तांबे यांची अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे. मात्र त्याचा परिणाम असा की, यंदा प्रथमच पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पंजा चिन्ह नसणार आहे.
नव्या पिढीकडे सूत्रे देऊन थोरात मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातात की तांबे यांचा चेहरा पुढे करून पडद्यामागून सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवतात, हेही आगामी दिवसात स्पष्ट होणार आहे. यामुळेही संगमनेर पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. आमदार तांबे यांनी संगमनेर पालिकेच्या निवडणुकीत ‘संगमनेर-२’ ही संकल्पना मांडत निवडणुकीला सामोरे जायचे ठरवले आहे. ‘संगमनेर-२’ म्हणजे पुढील सुधारित आवृत्ती. जुनी संगणक प्रणाली चांगलीच असते, परंतु काळानुसार संगणक प्रणाली अद्ययावत करावी लागते. काळानुसार अनेक बदल झालेले असतात. त्याचा स्वीकार म्हणजेच ‘संगमनेर-२’ असल्याचे सूचक उद्गार आमदार तांबे यांनी काढले आहेत. थोरात यांनी बदल घडवून टाकलेले हे पाऊल संगमनेर पालिकेसाठी किती यशस्वी ठरतात? म्हणूनही या निवडणुकीकडे लक्ष राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर थोरात राज्य पातळीवर सक्रिय असले तरी त्यांच्या जिल्ह्यातील सक्रियतेवर परिणाम झालेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जिल्ह्यात दौरेही झालेले नाहीत. काँग्रेस पक्ष संघटनेतही फारसे बदल न करता त्यांनी जुन्या चेहऱ्यांवरच संघटना पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. एकूणच संगमनेर पालिका निवडणुकीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेले दिसते. पालिका निवडणूक त्यांच्यासाठी कस दाखवणारी ठरणार आहे. म्हणूनही या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेली आहे.
यंदा प्रथमच काँग्रेसचे पंजा चिन्ह नाही
संगमनेर पालिका निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे. या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे निवडणुकीची धुरा त्यांनी सोपवली असली तरी तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. थोरात यांनी एक अपवाद वगळता पालिकेच्या सर्व निवडणुका काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढवल्या. १९९१ पासून त्यांनी पालिका निवडणुकीत पंजावरच उमेदवार उभे केले होते. प्रशासक राज वगळता आजपर्यंत पालिकेत थोरात यांनी एकहाती सत्ता कायम राखली. मात्र यंदा प्रथमच संगमनेर पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पंजा चिन्ह नसणार आहे.
