या मतदार संघातील महत्वाच्या समस्या काय आहेत?
ईशान्य मुंबईतील सर्वात गंभीर समस्या आहे ती घनकचऱ्याची. संपूर्ण मुंबईतील हजारो टन कचरा देवनार आणि कांजुरमार्ग येथील क्षेपणभूमीत टाकला जातो. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी आणि कचरा जाळल्यांतरच्या धुराचे लोट उठतात. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून लोकांचे आयुष्यमान कमी होत आहे. या मतदार संघातील आरोग्य व्यवस्थाही कोलमडलेली असून राजावाडी रुग्णालयाची क्षमता संपलेली आहे. आपण खासदार असताना मुलुंड परिसरात मोठ्या रुग्णालाच्या उभारणीचे काम सुरू केले होते. मात्र तेही रखडलेले आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, पाणी टंचाई हे या मतदार संघातील लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत.
धारावी पुनर्वसन प्रकल्पांतील तसेच मुंबईतील प्रकल्पबाधितांच्या मुलुंडमधील पुनर्वसनाबाबत आपली भूमिका काय?
धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यास स्थानिक जनतेला विरोध असून आपलीही तीच भूमिका आहे. तसेच मुंबईतील प्रकल्पबाधितांचेही याच भागात पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे मलुंडच्या नागरी सुविधांचा बोजवारा उडणार आहे. भाजपाने या भागातील लोकांची फसवणूक केली असली तरी आपण सदैव नागरिकांसोबत राहणार. या दोन्ही प्रस्तांवाना आपला ठाम विरोध असून न्यायालय आणि रस्त्यावरही लढाई करु. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकल्प होऊ दिले जाणार नाहीत.
आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा : ईशान्य मुंबई- भाषिक आणि धार्मिक वळणार गेलेली लढत
या मतदार संघातील विविध समस्यांची सोडवणूक कशी करणार?
या मतदार संघातील घनकचऱ्यांचा गंभीर प्रश्न सोडवितांना दोन्ही क्षेपणभूमीवर कंपन्यांना देण्यात आलेली मुदत सन २०२५ पर्यंत असून त्यांनतर दोन्ही क्षेपणभूमी बंद केल्या जातील.आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यातसाठी शिवाजीनगर- मानखुर्द आणि विक्रोळी भागात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा मानस असून मुलुंडमधील रुग्णालयाचे बांधकाम वेळेत पूर्ण करणार, विक्रोळी येथील पूर्व- पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रदिर्घ काळापासून रखडले असून ते पूर्ण करून घेणे, नाहूर आणि मुलुंड दरम्यान रेल्वे टर्मिनस उभारणी, कोकणातील रेल्वेगाडयांना भांडूपला थांबा, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पूर्व मुक्त मार्गाचा मुलुंडपर्यंत विस्तार करणार. तसेच खार जमीनीवर थीम पार्क, शिक्षणसंस्थांची उभारणी आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या जागेवरील झोपड्यांचे त्याच भागात पुनर्वसन करण्याचा मानस आहे.
आणखी वाचा-उमेदवारांची भूमिका : पालघर मतदार संघ, आरोग्यासाठी केलेल्या कामांचा फायदा होईल – भारती कामडी
या निवडणुकीत विरोधकांचे आव्हान किती?
भाजपच्या जुमलेबाजीला जनता वैतागली आहे.सतत खोटी आश्वासने-अमिषे, भपकेबाज प्रचार,दिखाऊपणा, न केलेल्या कामांचे श्रेय लाटणे व खोटी आपुलकी मिळविणे यातील फरक कळण्याएवढे ईशान्य मुंबईतील मतदार सुज्ञ आहेत. लोकांमध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे. याउलट आपण खासदारकीच्या पाच वर्षाच्या काळात अनेक कामे केली. खासदार नसलो तरी जेव्हा जेव्हा लोकांना गरज पडेल, तेव्हा तेव्हा हा भाऊ त्याच्यासोबत असतो याचा अनुभव गेली १० वर्षे या भागातील जनता घेत आहे. मतदारांचा तुफान प्रतिसाद मिळत असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मतदारांनाच आता बदल हवा आहे, हक्काचा भाऊ हवा आहे. त्यामुळे विरोधकांचे आव्हान वाटत नाही.
(मुलाखत : संजय बापट)