एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला लक्ष्य करीत भाजपाने केरळमधील ख्रिश्चन धर्मीयांकडील कल खूप आधीपासूनच वाढवला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच एका घटनेमुळे भाजपाच्या या प्रयत्नांमध्ये खंड पडल्याचे दिसून आले. छत्तीसगडमध्ये जुलै महिन्याअखेर केरळमधील दोन नन्सना अटक करण्यात आली. त्यामुळे भाजपा आणि ख्रिश्चन समुदाय यांच्यातील संबंध काहीसे ताणले गेले. नन्सना अटक केल्यानंतर भाजपाने नुकसान भरून काढण्यासाठी बहुआयामी धोरण स्वीकारले आहे. या प्रकरणामुळे केरळमधील चर्चच्या नेतृत्वाशी असलेला पक्षाचा संवादही कमी झाला आहे. ही परिस्थिती मान्य करीत भाजपाच्या एका नेत्याने याबाबत सांगितले, “हा धक्का तात्पुरता होता. आम्ही चर्चना सांगत आहोत की, नन्सना जामीन मिळवून देण्यासाठी भाजपाने प्रामाणिक प्रयत्न केले. केरळमधील अनेक बिशपांनी या प्रकरणात आमच्या भूमिकेची दखल घेतली आहे.”

डॅमेज कंट्रोलसाठी मोहीम

बळजबरीने धर्मांतर आणि मानवी तस्करीच्या आरोपांखाली नन्सना अटक झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा नेते ख्रिश्चन धर्मगुरूंची भेटही घेत आहेत. भेट घेऊन भाजपा त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की, नन्सना जामीन मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत: लक्ष घातले होते. २५ जुलैला झालेल्या अटकेनंतर या दोन्ही नन्सना नऊ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले गेले. दुसरीकडे, या प्रकरणावर राज्यातील सर्व चर्च आणि त्यांचे नेतृत्व यांचे या मुद्द्यावर एकमत नसल्याने भाजपाला काहीसा दिलासा मिळाला आहे. कॅथलिक चर्चमधील प्रमुख आर्चबिशप जोसेफ पॅम्पलनी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नन्सना जामिनावर सोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे मान्य केले आहे. हे मत मात्र बिशप पॉली कन्नूक्कडन यांच्या भूमिकेच्या पूर्णपणे विरोधी आहे. त्यांनी एका पाद्रींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, केंद्र आणि छत्तीसगडमधील भाजपा सरकारने नन्सच्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत.

नन्सच्या सुटकेनंतर अनेक बिशप आणि बिगर-कॅथॉलिक पंथांच्या पाद्रींनी भाजपाच्या कार्यालयात उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे भाजपाला आता असे वाटत आहे की ,या प्रकरणाने राज्यातील सर्व ख्रिश्चन नेतृत्वाला शत्रुत्वाच्या भूमिकेत ढकललेले नाही. केरळमध्ये वर्षभराच्या आत विधानसभा होणार आहे. या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा ‘विकसित केरळम’ हा नारा तरुणांपर्यंत पोहोचवत आहे. “लोकांना जगणं आणि उपजीविकेशी संबंधित प्रश्न भेडसावत आहेत. बेरोजगारीसारख्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या आणि रोजगारासाठी परदेश गाठणाऱ्या ख्रिश्चन तरुणांशी आम्ही संपर्क साधू शकतो. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. तसेच आम्ही त्यांना या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्याची खात्री पटवून दिली आहे”, असे एका भाजपा नेत्याने सांगितले.

केरळमध्ये पाय रोवण्यासाठी ख्रिश्चन समाजाशी संपर्क मोहीम भाजपाच्या नेतृत्वाकडूनच चालवली जात आहे. एप्रिल २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध पंथांच्या आठ बिशपांची भेट घेतली आणि पक्षासाठी त्यांचा पाठिंबा मागितला. काही महिन्यांनंतर डिसेंबरमध्ये पक्षाने ‘स्नेह यात्रा’ नावाची राज्यव्यापी मोहीम सुरू केली. या प्रयत्नांना निवडणुकीत यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली. कारण- भाजपाने मतांचे प्रमाण तीन टक्क्यांनी वाढवत, ते १६.६८ एवढे केले.

भाजपा चिंतेत का?

भाजपाने ख्रिश्चन मतांचा काही हिस्सा मिळवण्यासाठीची मोहीम जोमाने सुरू ठेवली. मात्र, छत्तीसगडमधील या सर्व प्रकरणामुळे पक्षाच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ख्रिश्चन आणि मुस्लीम एकत्र येण्याची शक्यता टाळण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
“एसडीपीआय आणि जमात-ए-इस्लामी ख्रिश्चनांच्या आंदोलनात आले आहेत. देशभरातील ख्रिश्चन चर्चना राजकीय इस्लामिक गटांपासून धोका आहे. ख्रिश्चन समुदायाने सावध राहिले पाहिजे”, असे केरळ भाजपा उपाध्यक्ष शोन जॉर्ज यांनी म्हटले आहे. नन्सच्या अटकेनंतर विविध मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे अल्पसंख्याक एकत्र येतील, अशी चिंता भाजपाला वाटू लागली आहे. अनेक वर्षांपासून भाजपाने ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये विभागणी करून काँग्रेसच्या मतदारांवर परिणाम घडवून आणला आहे.

या वादानंतर राज्य पातळीवरील पक्षसंघटनेच्या फेरबदलातही भाजपा ‘डॅमेज कंट्रोल’ करीत असल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन, राष्ट्रीय सचिव एल. के. अँटनी, राज्य सरचिटणीस अनुप अँटनी जोसेफ आणि शोन जॉर्ज यांना कोअर कमिटीमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याआधी ख्रिश्चन समाजातून फक्त एकाच उमेदवाराला जागा दिली जात होती. नन्सविरुद्धच्या धर्मांतराच्या आरोपांना आम्ही खरे मानत नाही, या केरळ भाजपा प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्या विधानावर काही संघटनात्मक नेते आणि संघ परिवाराशी संबंधित लोकांनी टीका केली आहे. तरीही अलीकडच्या घडामोडींवरून असे दिसून येते की, ख्रिश्चन समाजाशी असलेल्या भूमिकेविषयी राज्यातील भाजपा नेतृत्व अजिबात विचलित झालेले नाही. त्यामुळे भाजपा करीत असलेले ‘डॅमेज कंट्रोल’ कितपत यशस्वी ठरेल, ते येत्या काळात स्पष्ट होईल.