छत्रपती संभाजीनगर : पक्ष सोडून जाणाऱ्यांसाठी ‘गद्दार’, ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’, अशी शब्दरचना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विकसित झालेली. पक्षातून बाहेर पडणाऱ्या आपल्याच पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्याची दारूची दुकाने कशी आहेत, कोणता आमदार मुंबईच पत्ते खेळत बसतो, अशी उणीदुणी चव्हाट्यावर आणत व्यक्त होणारी राजकीय कटुता एका बाजूला, पक्षच ताब्यात घेण्याच्या भाजपच्या नव्या राजकीय कार्यपद्धतीतून फुटलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांविषयी व्यक्त होणारी कटुता आणि शरद पवार यांची भाजप विरोधी वक्तव्ये दुसऱ्या बाजूला, या राजकीय पटावर भाजप मात्र मागच्याच बाकावर असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यातील राजकीय सभेपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांनी दिवंगत कवी ना. धों. महानोर आणि प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या श्रद्धांजली सभांना हजेरी लावली. या दोन्ही कार्यक्रमांमधील शोकसभांमध्ये कोणतेही राजकीय संदर्भ येणार नाहीत अशी काळजी आयोजक आणि शरद पवार यांच्याकडून घेण्यात आली. पण या दोन सभांच्या निमित्ताने मराठवाड्यात आलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. जागोजागी तरुणांनी त्यांचे स्वागत केले. ‘शरद पवार अंगार है बाकी सब भंगार है’ ही एवढीच राजकीय कुटुता व्यक्त करणारी घोषणा ऐकू आली. अन्यथा संपूर्ण पक्ष फोडून नेणाऱ्या अजित पवार यांच्याविषयी वा त्यांच्या भाजप प्रेमाविषयी तशी जहाल टीका कोणी केली नाही. पण अजित पवार आणि त्यांचे साथीदार अजूनही शरद पवार यांचे छायाचित्र लावून प्रचार करताहेत असे पत्रकार बैठकीत पवार यांना विचारल्यावर त्यांनी ‘आम्ही त्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत’, अशी प्रतिक्रिया दिली.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
sanjay raut raj thackeray
राज ठाकरे यांना मविआत घेण्याचे प्रयत्न का झाले नाहीत? संजय राऊत म्हणाले, “मनसे अध्यक्षांना वाटायचं…”

हेही वाचा – चव्हाण-शिंदेंच्या मनोमिलनामुळे डोंबिवलीतील विकासकामांना चालना

पुण्यातील ‘गुप्त बैठक’ या माध्यमातील शब्दप्रयोगाचा तिरकसपणे उल्लेख करत पवार म्हणाले, ‘मी काही लपून केलेले नाही. या भेटीनंतर मी पुष्पगुच्छ स्वीकारले. मी काही लपून-छपून आलो – गेलो नाही कुटुंबप्रमुख म्हणून मी भेटलो.’ पूर्वी एन. डी. पाटील यांच्याशी नाते असताना केलेल्या राजकीय संघर्षांचा दाखलाही त्यांनी पत्रकारांसमोर दिला. त्यांच्या या माहितीनंतर भेटींची आवश्यकता अजित पवार यांना होती, हेही पवार यांनी अधोरेखित करून सांगितले. ‘माझे राजकीय निर्णय अन्य कोणी घेईल, अशी परिस्थिती अजून तरी माझ्यावर आली नाही’, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. राजकीय चर्चा करण्यास अजित पवार हे लहान नेते आहेत, असेही ते खोचकपणे म्हणाले. त्याच वेळी ‘ज्या भाजपच्या विरोधात निवडणुका लढवून तुम्ही आला आहात त्याच वळचणीला तुम्ही जाऊन बसला आहात, पण ज्यांच्याकडून काही शिकला आहात त्यांच्याविषयी किमान माणुसकी बाळगा, अशी राजकीय टीका त्यांनी जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि तो कुटुंबातील व्यक्तीकडून फोडला गेला या पेक्षाही तो भाजपने फोडला आणि त्या विरोधात आपण खंबीरपणे लढणार आहोत, असा संदेश देत शरद पवार यांनी पर्यायी बांधणीलाही सुरुवात केली. कटुता पेरणीतून होणाऱ्या कार्यकर्ता बांधणीपेक्षाही आपल्याच जुन्या सहकाऱ्यांच्या पुन्हा नव्याने भेटी घेण्याकडे त्यांचा कल होता.

बीडमधील गेवराई मतदारसंघातील अमरसिंह पंडित अजित पवार यांच्याबरोबर गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार यांनी बदामराव पंडित यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील गीत्ते नावाच्या तरुण पक्षाला आपल्या बाजूला केले. यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात काम केल्यास विधानसभा निवडणुकीत त्याचा वचपा निघू शकतो, असा संदेश अजित पवार गटातील अनेक आमदारांपर्यंत गेला आहे. राजकीय संदेश देण्यासाठी शरद पवार यांनी मराठवाड्यात दिलेला वेळ आणि राजकारणातील संदेश देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवरून राजकीयदृष्ट्या अभिव्यक्त होण्याचा शिवसेना व राष्ट्रवादीतील फरकही या दौऱ्यामुळे स्पष्टपणे पुढे आला आल्याचे दिसून आले.

हेही वाचा – नितीश कुमारांची गुगली; मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधी पोहोचले अटलबिहारी वाजपेयींच्या समाधिस्थळी

उद्धव ठाकरे यांच्यापासून फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसताच सत्ताधारी गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरे केले. सभा घेतल्या, आता ती प्रक्रिया अजित पवार यांच्याकडून होईल असे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या कार्यशैलीवर किंवा त्यांच्यावर कोणतीही व्यक्तीगत टीका शरद पवार व त्यांच्या समर्थकांकडून झाली नाही. फुटून गेलेल्या सदस्यांपेक्षाही पक्षाचा वजनदार नेता अजूनही मैदानात आहे, हे ठसविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. ही बाब शिवसेनेला मात्र पुढे नेता आली नाही कारण उद्धव ठाकरे यांच्या सभा नाहीत. ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणूक तयारीच्या बैठका मुंबईतच होत असल्याने जिल्हास्तरावरच काही उपक्रम राबवून कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांची दमछाक आता दिसू लागली आहे. असे असले तरी शिवसेनेविषयी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील सहानुभुतीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. या सगळ्या राजकीय घडामोडीत आरोग्य शिबिरे, लाभार्थीचे मेळावे असे भाजपचे उपक्रम सुरू आहेत. मात्र, अजित पवार यांना पक्ष प्रवेश कोणत्या कारणासाठी दिला, या प्रश्नाचे उत्तर देताना भाजप समर्थकांना शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. शब्द वेगळे सांगतात आणि चेहरा आपण लंगडे समर्थन करत आहोत, हे सांगणारा असतो.

पक्ष फोडून नेण्याच्या कृतीनंतर भाजप विरोधात आघाडी उघडणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्वकीयांविरोधात व्यक्त होण्याची कटुता मात्र निरनिराळी आहे. राष्ट्रवादीने पर्यायी माणसे उभे करण्यास सुरुवात केली आहे आणि शिवसेना सहा महिन्यांपूर्वीच्या सभांच्या आधारावर सहानुभूती जपत असल्याचे चित्र दिसून येत आहे.