काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जीवनावर आधारित बुधवारी (२९ नोव्हेंबर) एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना सोनिया गांधी यांनी खरगे यांच्यासंदर्भात महत्त्वाचे भाष्य केले. २०२४ सालची लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना त्यांनी पक्षाच्या पातळीवर खरगे यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली.
गेल्या वर्षी खरगे काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी
गेल्या वर्षात खरगे यांनी सोनिया गांधी यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. तेव्हापासून खरगे हे काँग्रेसचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळत आहेत. खरगे यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद आल्यानंतर या पक्षाने कर्नाटकची विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे.
“खरगेंकडून पक्षाला सर्वोच्च महत्त्व”
खरगे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोनिया गांधी यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी खरगे यांच्यावर भाष्य केले. भारतीय आत्म्यासाठीच्या लढ्यात खरगे या योग्य व्यक्ती आहेत. खरगे यांनी वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता, पक्षसंघटनेला सर्वोच्च प्राधान्य दिले, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
“मल्लिकार्जुन खरगे हे संघटनेतील खंदे नेते”
“त्यांनी काँग्रेस पक्षाला एका महत्त्वाच्या टप्प्यावर नेले आहे. सध्या सत्तेत असलेले देशातील संस्था, तत्त्वे मोडीत काढत आहेत. ही तत्त्वे भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून जोपासलेली आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे संघटनेतील खंदे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी ते सर्वांत योग्य नेते आहेत,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.
राहुल गांधी यांच्या नावाची होती चर्चा; पण…
आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना सोनिया गांधी यांनी खरगे यांची पहिल्यांदाच अशा प्रकारे स्तुती केली आहे. गेल्या वर्षी खरगे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आल्यानंतर एकत्र आलेल्या विरोधी आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांना समोर आणू शकतो, असे सांगितले जात होते. कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर या चर्चेला बळ मिळाले होते; मात्र अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असतानाच आता सोनिया गांधी यांनी खरगे यांची स्तुती केली आहे.
“आम्ही पंतप्रधान म्हणून कोणाचेही नाव जाहीर करणार नाही”
दरम्यान, सोनिया गांधी यांनी खरगे यांची स्तुती केल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी खरगे यांनीच आमची इंडिया ही आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणाचेही नाव जाहीर करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते.