Tamil Nadu BJP AIADMK Alliance : भाजपाच्या दृष्टीने दक्षिण भारत त्यातही तमिळनाडूसारखे मोठे राज्य आव्हानात्मक ठरताना दिसून येत आहे. भाषा व लोकसभा मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरून द्रमुकचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारविरोधात आघाडीच उघडली आहे. पुढील वर्षी तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला शह देण्यासाठी भाजपाने अण्णा द्रमुकबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, निवडणुकीआधीच अण्णा द्रमुकचे प्रमुख इडापल्ली पलानीस्वामी यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली आहे. राज्यात युतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल, असं त्यांनी बुधवारी म्हटलं आहे. इतकंच नाही तर सत्तावाटपात कुठलीही तडजोड होणार नाही, अशा इशाराही पलानीस्वामी यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरही भाजपाचे नेते संयम दाखवत आहेत.

१९६७ पासून तमिळनाडूची सत्ता द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांकडे राहिलेली आहे. त्यामुळेच तिथे काँग्रेस वा भाजपाला प्रादेशिक पक्षांचे हात धरूनच वाटचाल करावी लागत आहे. गेल्या ११ वर्षात भाजपाची देशभरात घौडदौड सुरू असली तरीही तमिळनाडू व केरळ या दोन राज्यांमध्ये पक्षाला फारसं यश मिळालेलं नाही. राज्यात द्रमुकच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-डावे पक्ष तसेच काही दलित संघटना व मुस्लीम लीग अशी सामाजिकदृष्ट्या भक्कम आघाडी आहे. त्याला रोखण्यासाठी भाजपाचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. हीच बाब लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एप्रिलमध्ये अण्णा द्रमुकबरोबर युतीची घोषणा केली. मात्र, पक्षाचे प्रमुख इडापल्ली पलानीस्वामी हे भाजपाला कुठलाही थारा देत नसल्याचं दिसून येत आहे.

भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न अपूर्णच राहणार?

तमिळनाडूत पुढील वर्षी भाजपा व अण्णा द्रमुकच्या युतीचे सरकार स्थापन होईल, असं विधान करीत राज्यात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असा अप्रत्यक्ष इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर माध्यमांनी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “भाजपाबरोबर आमची युती असली तरीही सरकारवर फक्त अण्णा द्रमुक पार्टीचेच नियंत्रण राहील आणि मुख्यमंत्री मीच होईल”, असं इडापल्ली पलानीस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न अपूर्णच राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पलानीस्वामी यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमागे एक सावध रणनीती असू शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे. २०२६ मध्ये जर भाजपा-अण्णा द्रमुकच्या युतीचे सरकार नक्कीच येईल; पण सत्तेच्या वाटपाबाबत सध्या सार्वजनिक घोषणा करणे धोक्याचे आहे, अशी चर्चा पलामीस्वामी यांनी अमित शाहांबरोबर केली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : महाआघाडीतला मोठा भाऊ कोण? जागावाटपाबाबत काय ठरलं? काँग्रेस किती जागा मिळणार?

भाजपा- अण्णा द्रमुकच्या युतीबाबत संभ्रम

तमिळनाडूमध्ये भाजपा व अण्णा द्रमुक यांच्यातील युतीची घोषणा एप्रिलमध्ये झाल्यापासून भाजपाला सत्तेत नेमका किती वाटा मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राज्यातील अनेकांना भाजपा अद्यापही ‘बाहेरील पक्ष’ वाटत असल्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ज्यावेळी युतीची घोषणा करीत होते, त्यावेळी भाजपाचे मावळते प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई मंचावर शांत बसले होते. त्यांची कार्यक्रमातील उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. कारण- अण्णामलाई यांच्यामुळेच भाजप व अण्णा द्रमुकची युती तुटली होती, असं पक्षातील काही नेत्यांना आजही वाटतं.

द्रमुकच्या नेत्यांकडून पलानीस्वामींना चिमटे

भाजपाने अण्णा द्रमुकबरोबर पुन्हा युती केल्यानंतर सत्ताधारी द्रमुकच्या हाती टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे. अमित शाह यांनी के. पलामीस्वामी यांना थेट मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून का जाहीर केलं नाही, असे खोचक प्रश्न द्रमुकचे नेते विचारत आहेत. तसंच भाजपाला पलामीस्वामी यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचे चिमटेही सत्ताधाऱ्यांकडून काढले जात आहे. त्याच मुद्द्यांना कंटाळून पलामीस्वामी यांनी बुधवारी थेट मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलंय. त्यांनी ठामपणे सांगितलं की, युतीचं संपूर्ण नेतृत्व अण्णा द्रमुककडे असेल आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही मीच असणार.

amit shah edappadi palaniswami
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व अण्णा द्रमुक पार्टीचे प्रमुख पलानीस्वामी (छायाचित्र पीटीआय)

आरएसएच्या वरिष्ठ नेत्यांनी काय सांगितलं?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते युतीचे सरकार या चर्चेवरूनच नाराज होत आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतरच सत्तावाटपाचा विचार करता येईल, असं पलामीस्वामी यांनी अमित शाह यांना सांगितलं आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनादेखील त्यांचा विचार पटलेला असून यानंतर सत्तावाटपाबाबत कोणतेही विधान करू नका, असे निर्देश त्यांनी राज्यातील भाजपाच्या नेत्यांना दिले आहेत. अण्णा द्रमुकच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं की, पक्षानं घालून दिलेल्या युतीच्या अटीही भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी समजून घेतल्या असून आता सत्तावाटपाचा विषय संपलेला आहे.

हेही वाचा : मोदी-शाहदेखील त्यांना वाचवू शकणार नाहीत; मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जावं लागणार? राहुल गांधी काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलानीस्वामी यांची द्रमुक सरकारवर टीका

दरम्यान, इतर राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत असली तरी तमिळनाडूमध्ये त्यांची परिस्थिती कमकुवत असल्याचं दिसून येत आहे. कारण- भाजपा व अण्णा द्रमुक या दोन पक्षांशिवाय इतर छोटेमोठे पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्यास नकार देत आहेत. बुधवारी अण्णाद्रमुकचे प्रमुख के. पलानीस्वामी यांनी सत्ताधारी द्रमुकवर टीकेचा भडिमार केला. “मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे एनडीएमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, आमची युती पूर्णपणे मजबूत असून निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापन करेल”, असं पलामीस्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी नुकतीच सुरू केलेली ‘स्टॅलिन जनतेसोबत’ ही मोहीम तमिळनाडूतील जनतेला गोधळात टाकणारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन हे राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्ती करीत आहेत, असा आरोपही पलानीस्वामी यांनी यावेळी केला.