तेलंगणामध्ये येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपली सत्ता कायम राखण्यासाठी येथील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. या राज्यात बीआरएस, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बीआरएसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस पक्षानेही येथे कंबर कसली आहे. विजयाचे गणित साधण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय या डाव्या विचारसरणीच्या पक्षाशी युती केली आहे. डाव्यांचे वर्चस्व असलेल्या भागातील मते आपल्याला मिळतील, अशी काँग्रेसला आशा आहे.

काँग्रेसने सीपीआय या पक्षाला कोठागुडेम ही एक जागा दिली आहे. म्हणजेच या निवडणुकीत काँग्रेस आणि सीपीआय यांची युती आहे. कोठागुडेम या जागेवरून सीपीआयचे राज्य सचिव कुनमनेनी सांबासिवा राव हे निवडणूक लढवत आहेत. सीपीआयशी युती झालेली असली तरी काँग्रेसला सीपीआय (एम) शी युती करण्यास अपयश आलेले आहे.

No option to Narendra Modi H D Deve Gowda JDS Karnataka Loksabha Election 2024
“विरोधी पक्षनेतेपदाचीही मान्यता नसलेली काँग्रेस सत्तेत काय येणार?” माजी पंतप्रधान देवेगौडांची टीका
Hitendra Thakur, left, support from the left,
डाव्यांची साथ नसल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार ?
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
raju shetty uddhav thackeray (1)
“…म्हणून मी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही”, राजू शेट्टींनी स्पष्ट केली भूमिका

सीपीआय (एम) काँग्रेसला पाठिंबा देणार?

सीपीआय (एम)ने एकूण १९ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत, तर उर्वरित ११५ जागांबाबत या पक्षाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार हा पक्ष उर्वरित जागांसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. नालागोंडा हा प्रदेश पूर्वी डाव्यांचा बालेकिल्ला मानला जायचा. या भागात नालागोंडा, नाकरेकल, भोंगीर, आलार आणि मिर्यालागुडा या मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रदेशात २०१४ सालच्या निवडणुकीत डावे पक्ष काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात विभागले गेले होते. तर २०१८ साली सर्वच डाव्या पक्षांनी बीआरएस पक्षाला पाठिंबा दिला होता.

२०१८ सालच्या निवडणुकीत बीआरएसची मुसंडी

बीआरएस पक्षाने २०१४ सालच्या निवडणुकीत अविभाजित नालागोंडा जिल्ह्यातील एकूण १२ जागांपैकी सहा जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसने पाच आणि सीपीआयने एका जागेवर बाजी मारली होती. २०१८ सालच्या निवडणुकीत या भागात बीआरएसने मुसंडी मारली होती. या पक्षाने एकूण १२ पैकी ९ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसला फक्त तीन जागांवर जिंकता आले होते. पुढे काही दिवसांनंतर हुजुरनगर आणि मुनुगोडे या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. या दोन्ही जागांवर बीआरएसने विजय मिळवला होता. म्हणजेच डाव्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नालागोंडा जिल्ह्यात १२ पैकी एकूण ११ जागांवर बीआरएसची सत्ता होती.

काँग्रेसची सीपीआयशी युती

गेल्या काही वर्षांत बीआरएसने अनेक योजना राबवलेल्या आहेत. याच कारणांमुळे डाव्यांना मिळणारी मते ही बीआरएसकडे वळली आहेत. सध्याच्या निवडणुकीत काँग्रेसने सीपीआयशी युती केली आहे. त्यामुळे हीच मते बीआरएस ऐवजी आम्हाला मिळतील, अशी काँग्रेसला आशा आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मल्लू भाटी विक्रमार्का यांनी काँग्रेसच्या या रणनीतीवर भाष्य केले आहे. विक्रमार्का हे मधिरा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आमची सीपीआयशी युती झाली आहे. या युतीमुळे आम्हाला राज्यभरात बऱ्याच जागांसाठी फायदा होणार आहे. नालागोंडा आणि खम्मम या भागांत आम्हाला विशेष फायदा होणार आहे, असे ते म्हणाले.

नेमका फटका कोणाला?

काँग्रेस पक्षाला फक्त सीपीआयशी युती करण्यात यश आले आहे. सीपीआय (एम) पक्षाने काँग्रेसपासून दूर राहणेच पसंद केले आहे. गेल्या काही दशकांपासून सीपीआय (एम) या पक्षाचा प्रभाव कमी झालेला आहे. तरीदेखील या पक्षाचा काही जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. तसेच या पक्षाच्या उमेदवारांमुळे बीआरएस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसू शकतो.

सीपीआय (एम) पक्षाची काय स्थिती?

तेलंगणातील ही निवडणूक डाव्यांसाठी महत्त्वाची असणार आहे. गेल्या काही काळात या पक्षाचा तेलंगणातील जनाधार कमी होत आला आहे. मात्र, आपले राजकीय अस्तित्व टिकून राहावे यासाठी डाव्या पक्षांना ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवावी लागणार आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत सीपीआय (एम) या पक्षाने एकूण २६ जागा लढवल्या होत्या. यातील एकाही जागेवर या पक्षाला विजयी कामगिरी करता आली नव्हती. एकूण तीन जागांवर हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता, तर या पक्षाला एकूण ०.४ टक्के मते मिळाली होती. याच पक्षाला २०१४ सालच्या निवडणुकीत १.६ टक्के मते मिळाली होती, तर भद्रचलम या एका जागेवर या पक्षाने विजयही मिळवला होता.

सीपीआय पक्षाची काय स्थिती?

सीपीआय या पक्षाने २०१४ सालच्या निवडणुकीत एकूण सात जागांवर उमेदवार उभे केले होते. यातील देवरकोंडा आणि नालागोंडा या दोन जागांवर या पक्षाचा विजय झाला होता. पुढे आमदार रविंद्र कुमार रामवथ यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. २०१८ सालच्या निवडणुकीत रविंद्र कुमार बीआरएसच्याच तिकिटावर निवडून आले. २०१८ सालच्या निवडणुकीत सीपीआयने तेलुगू देसम पार्टी आणि काँग्रेसशी युती केली होती. या आघाडीला महायुती म्हटले गेले.

मुनुगोडेच्या पोटनिवडणुकीत डाव्यांचा बीआरएसला पाठिंबा

गेल्या वर्षी मुनुगोडे मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत डाव्या पक्षांनी बीआरएसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. याच पाठिंब्याच्या आधारावर बीआरएसने भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता, असे म्हटले जाते. मुनुगोडे या मतदारसंघात डाव्या पक्षांना मिळणारी साधारण २० हजार मते बीआरएस पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती, परिणामी भाजपाचा पराभव झाला होता.

बीआरएस, डाव्या पक्षांत युती होण्याची होती अपेक्षा

मुनुगोडे मतदारसंघात डाव्यांनी बीआरएसला मदत केल्यामुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस आणि डाव्या पक्षांत युती होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. डाव्यांनादेखील अशीच अपेक्षा होती. मात्र, २१ ऑगस्ट २०२३ रोजी केसीआर यांनी ११५ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. ही यादी जाहीर करताना त्यांनी डाव्यांशी चर्चादेखील केली नाही. उरलेल्या चार जागांपैकी काही जागा सीपीआय, सीपीआय (एम) या पक्षांना दिल्या जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, केसीआर यांनी चारही जागांसाठी नंतर आपले उमेदवार जाहीर केले. याच कारणामुळे आता डावे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देत आहेत.