तेलंगणातील हाय-व्होल्टेज मुनुगोडे विधानसभा पोटनिडणुकीला केवळ दोन आठवडे बाकी असताना सत्तेत असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीची (TRS) डोकेदुखी भलत्याच कारणामुळे वाढली आहे. टीआरएसचे निवडणूक चिन्ह असेलल्या चारचाकी गाडीशी साम्य असलेली अनेक चिन्हे छोट्या पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना दिल्याने टीआरएसचे उमेदवार चिंतेत आहेत. वोटिंग मशीनवर इतर उमेदवारांचे चिन्ह टीआरएसच्या चिन्हासारखेच दिसत असल्याने आपल्या मतांवर परिणाम होईल, अशी भीती सध्या टीआरएसच्या उमेदवारांना आहे.
हेही वाचा – काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर असतील ‘ही’ पाच आव्हाने
टीआरएसचा कोणत्या चिन्हांवर आक्षेप
तेलंगणा राष्ट्र समितीने रोड रोलर, कॅमेरा, चपाती रोलर, टेलिव्हिजन, जहाज, शिलाई मशीन आणि साबण डिश या चिन्हांवर आक्षेप घेत ही चिन्हे छोट्या उमेदवारांना आणि अपक्षांना देऊ नये अशी मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. तसेच त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयातही याबाबत याचिका दाखल केली. वरील सात चिन्हे कोणालाही देऊ नये, असे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावे, असे टीआरएसने याचिकेत म्हटले. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळत असे निर्देश निवडणूक आयोगाला देऊ शकत नाही, असेही म्हटले आहे.
हेही वाचा – ‘भारत जोडो’ यात्रेमुळे संघाचीही भाषा बदलू लागली! – काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांचे मत
नेमका काय घेतला आक्षेप?
टीआरएसचे नेते बी विनोद कुमार ‘द इंडियन एक्सप्रेस’ला प्रतिक्रिया देताना म्हणाले.“यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये रोड रोलर, कॅमेरा, चपाती रोलर, टेलिव्हिजन, जहाज, शिलाई मशीन आणि साबण डिश या चिन्हांमुळे आमच्या चार ते पाच उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर काही उमेदवार कमी मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. कारण ही चिन्हं वोटिंग मशीवर आमच्या चारचाकी गाडी सारखी दिसतात. त्यामुळे अनेक मतदारांचा गोंधळ होतो.”
“अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. २०१४ मध्ये नागरकुर्नूल लोकसभा मतदारसंघात आमच्या उमेवाराचा पराभव झाला होता. यावेळी एका अपक्ष आमदाराला ५० हजार मत मिळाली होती. कारण त्याचे निवडणूक चिन्हे ऑटो रिक्षा होते, जे आमच्या चारचाकी गाडीसारखे दिसत होते. असाच प्रकार २०२० मध्ये झालेल्या दुबक्का पोटनिवडणुकीतही झाला होता. याठिकाणी अपक्षाला चपाती रोलर हे चिन्ह देण्यात आले होते. त्याला ३७०० मतं पडली होती. या मतांमुळे आमच्या उमेदवारांचा पराभव झाला होता”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – राज्य सरकार-साखर कारखानदारांविरोधात राजू शेट्टी पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात
निवडणूक आयोगाची काय भूमिका?
निवडणूक आयोगाने टीआरएसची मागणी फेटाळून लावत मंगळवारी अपक्ष उमेदवार आणि छोट्या पक्षांना चिन्हांचे वाटप केले आहे. चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असताना, असा निर्णय घेऊ शकत नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
अपक्ष उमेदवार काय म्हणतात?
मुनुगोडे विधानसभा पोटनिडणुकीला उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी टीआरएसचा आक्षेप मुर्खपणा असल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही कोणाची मत खायला नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा या अपक्ष उमेदवारांचा सूर आहे.