ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता आहे. यात उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने आता ठाण्यातील केदार दिघे यांचे नाव चर्चेत आहे. मतदारसंघांतील अनेक बडे पदाधिकारी निवडणूक लढण्यास नकार देत असल्याने मतदारसंघांबाहेरच्या उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ ठाणे महापालिकेतील कळवा – मुंब्रा शहरापासून सुरू होऊन थेट अंबरनाथ शहरापर्यंत पसरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघापासून मनसेच्या राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीण, भाजपचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली, गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्व, भाजपचे कुमार आयलानी यांचा उल्हासनगर मतदारसंघ आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे बालाजी किणीकर यांचा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला होता. आताही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असेल याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा… जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान तसे कमी होते. त्यामुळे निवडणुका जाहीर होऊन आठवडा लोटला तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही जागा असल्याने त्यांच्याकडून या जागेवर उमेदवार दिला जाणार आहे. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार असले तरी सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचा एक प्रमुख चेहरा आहेत. राज्यभर प्रचारासाठी श्रीकांत शिंदे यांची गरज पक्षाला भासणार. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना आव्हान देणारा उमेदवार उभे करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्यासमोर उमेदवार म्हणून यापूर्वी अनेक नावांची चर्चा रंगली होती. यात वरून सरदेसाई यांच्या नावाची चर्चा सर्वात आधी रंगली. मात्र राजकीय आणि त्यातही निवडणुकीच्या कारकीर्दीची सुरुवात मोठ्या पराभवापासून नको असे सांगत वरून सर्देसाई यांनी कल्याण लोकसभेत लढण्यासाठी स्पष्ट नकार दिला असल्याची चर्चा आहे. डोंबिवली हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे माहेर आहे. त्यामुळे येथून कौटुंबिक पाठिंबा मिळेल. तसेच रश्मी ठाकरे यांना प्रचारात प्रत्यक्ष उतरवता येईल आणि मतांचे ध्रुवीकरण करता येईल, अशी रणनीती ठाकरे गटाच्या वतीने आखण्यात येत होती. मात्र सरदेसाई यांनी यातून माघार घेतल्याचे बोलले जाते आहे.

हेही वाचा… शिरुरमध्ये अमोल कोल्हे – आढळराव पाटील यांच्यात पुन्हा लढत

वरुण सरदेसाई यांच्यासोबतच ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचे नाव कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून पुढे करण्यात आले होते. मात्र सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती आहे. शिवसेनेत आल्यानंतर अंधारे यांची ही पहिलीच निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. अशा वेळीच पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जाणे याचीही भीती अंधारे यांना असल्याने त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना स्पष्ट नकार कळवल्याचे कळते आहे. मात्र त्याच वेळी पक्षाचा नाईलाज झाल्यास पक्षासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असेही अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना कळविण्याचे ठाकरे गटातील सूत्रांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी धनंजय बोडारे यांच्याही नावाची चर्चा रंगली होती. मात्र त्यावरही शिक्कामोर्तब होताना दिसत नाही. वरुण सरदेसाई आणि सुषमा अंधारे यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर आता ठाण्यातून केदार दिघे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवार आयातच करावा लागणार असल्याचे बोलले जाते.