सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात सारे काही अलबेल असल्याचे दिसत असले, तरी पक्षांतर्गत वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यापुढे तक्रारी मांडल्याने दादा आणि ताईंमधील वर्चस्ववादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे आगामी पुणे आणि  पिंपरी-चिंचवड महापालिका़; तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पक्षांतर्गत बाब उफाळून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पंक्षांतर्गत हेवेदावे असल्याने फटका बसला. तो राग या तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी थेट पवार यांच्यासमोरच व्यक्त केला. पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे जिल्ह्यातील काही तालुक्यांची सूत्रे देण्याची जाहीरपणे मागणी केली. खासदार सुळे या समजूतदारपणा दाखवितात, हे संबंधित पदाधिकाऱ्यांनी सांगितले;पण अजित पवार हे सगळ्यांना चांगले ‘ओळखून’ असल्याने त्यांच्याकडे काही तालुक्यांची सूत्रे दिल्यास चित्र बदलेल, असे  पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा >>> भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

पक्षातील गटातटामुळे महत्त्वाची पदे मिळत नसल्याचे ग्राऱ्हाणेही त्यांनी मांडले. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस ही उफाळून आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये जिल्ह्याचा बहुतांश ग्रामीण भागाचा समावेश आहे. खडकवासला  विधानसभा मतदार संघातील काही भाग शहरी आहे. या भागावर खासदार सुळे यांचा संपर्क असल्याने कोणत्या पदाधिकाऱ्याला संधी द्यायची, हा निर्णय सुळे या घेत असतात. मात्र, या भागात अजित पवार यांना मानणारा गट सक्रिय आहे. त्यांना महत्त्वाच्यावेळी डावलण्यात येते. ही मनातील खदखद दादागटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांपुढेच मांडल्याने वर्चस्ववादाची ठिणगी पडली आहे.

हेही वाचा >>> सोलापुरात भाजपच्या विरोधात ऐक्याची एक्स्प्रेस

आगामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका; तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवून देण्यासाठी दादा आणि ताई गट सक्रिय झाला आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. पक्षप्रमुखांसमोरच पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या तक्रारींनी या अंतर्गत चढाओढीच्या राजकारणाला तोंड फुटले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गटबाजी रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसपुढे उभे राहिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The battle for supremacy within the party in ncp ajit pawar and mp supriya sule print politics news ysh
First published on: 11-01-2023 at 16:18 IST