मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पुढील आठवड्यात नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजप व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत येत असून महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीनेही भाजप रणनीती आखत आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे गट हे भाजपचे ‘लक्ष्य’ असून महाविकास आघाडीला भुईसपाट करण्यासाठी जंग जंग पछाडले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या ‘लोकसभा प्रवास’ अभियानाअंतर्गत नड्डा बुधवारी मुंबईत दाखल होत असून राज्यात दोन दिवस असतील. नड्डा हे मुंबई भाजपच्या सुकाणू समितीची बुधवारी रात्री बैठक घेणार आहेत. ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने भाजपला त्यांचा सूड उगवायचा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला हातभार लावून भाजपने त्यांना मुख्यमंत्री करून सत्ताही काबीज केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला भुईसपाट करण्याचे आवाहन नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले होते. त्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या निवडणूक तयारीचा गोषवारा, प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय महापालिका प्रभागांमधील राजकीय परिस्थिती व भाजपची तयारी याचे सादरीकरण नड्डा यांच्यापुढे केले जाणार आहे.

हेही वाचा – अकोल्यातील हिंसाचाराला राजकीय रंग

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचे महाविकास आघाडीने ठरविले असले तरी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा काँग्रेस विचार करीत आहे. कर्नाटक विजयानंतर काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा आणि ती कमजोर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी तीनही पक्षांमधील अनेक नेत्यांना पुढील काही महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
भाजपने देशपातळीवर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने गुरुवारी पुण्यात प्रदेश कार्यकारिणीनंतर राज्यातील आमदार-खासदारांची बैठकही नड्डा घेणार आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या योजना आणि लाभार्थी यांचा तपशील जनसामान्यांपर्यंत व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेऊन पोचविला जाणार आहे. राज्यातील केंद्रीय मंत्र्यांचीही त्यादृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा – कोल्हापूरमध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले

भाजप आणि शिवसेना युतीने निवडणुका लढणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नड्डा यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपला सत्ता गमवावी लागली. त्यातून धडा घेत पुढील निवडणुकांची तयारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group is bjp main target party president jp nadda on maharashtra tour print politics news ssb
First published on: 17-05-2023 at 15:46 IST