Uddhav Thackeray Raj Thackeray Maharashtra Politics Impact : गेल्या आठवड्यात मुंबईतल्या वरळी येथील डोम सभागृहात ठाकरे बंधू एकमेकांना मिठी मारताना दिसून आले. जवळपास २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे व त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. महायुती सरकारने राज्यातील त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे व शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी सभा घेण्यात आली. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक भेटीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सहयोगी संपादक नीरजा चौधरी यांनी एक लेख लिहिलाय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? ते जाणून घेऊ…

नीरजा चौधरी लिहितात, उद्धव ठाकरे यांनी आपल्या हेतूबाबत कोणतीही गुंतागूंत ठेवली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याबाबत ठाम संकेत दिले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लगावला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवले”, असं ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे हेदेखील भाजपावर टीका करताना दिसून आले आणि त्यांनी भरसभेत राज यांच्याबरोबर युती करण्याचे संकेत दिले.

मनसेला निवडणुकीत का मिळत नाहीये यश?

  • राज ठाकरे हे एक प्रभावी वक्ते व मजबूत संघटनात्मक क्षमतेसाठी ओळखले जातात.
  • सुरुवातीला त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारीही मानलं जात होतं.
  • मात्र, २००५ मध्ये बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली.
  • त्यानंतर राज हे नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले आणि २००६ मध्ये त्यांनी मनसेची स्थापना केली.
  • आजही राज ठाकरे यांच्या सभेला अलोट गर्दी होते; पण त्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होताना दिसून येत नाही.
  • याच कारणामुळे मनसेला कोणत्याही निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही.
  • गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ एक टक्क्याच्या आसपास मते मिळाली.

आणखी वाचा : कंगना रणौत यांच्या ‘त्या’ दौऱ्यामुळे भाजपा अडचणीत? हिमाचलमध्ये काय घडतंय?

उद्धव ठाकरेंचा पक्ष कमकुवत का झालाय?

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचीही राजकीय स्थिती २०२२ पासून कमकुवत झाल्याचं दिसून येत. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदही गमावावं लागलं. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ २० जागांवरच विजय मिळवता आला आणि पक्षाचे मताधिक्य ९.९८ टक्क्यावर आलं. लागोपाठ निवडणुका गमाविणाऱ्या ठाकरे बंधूंकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे जुने मतभेद विसरून त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला असावा, असं मत नीरजा चौधरी यांनी मांडलं आहे.

मुंबईतील विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकमेकांना मिठी मारत एकत्रित येण्याचे संकेत दिले; पण त्यांची खरी कसोटी आता मुंबई महापालिका निवडणुकीतील जागावाटपात लागू शकते. भविष्यात काय होईल हे या दोघांच्या एकत्र राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. मनसे व शिवसेना ठाकरे गट मतदारांमध्ये किती विश्वास निर्माण करू शकतो, त्यावरून पुढची राजकीय गणितं ठरणार आहेत. एकमेकांबरोबर काम करत राहणं हीच त्यांच्यासाठी खरी आव्हानात्मक गोष्ट ठरणार आहे.

ठाकरे बंधूंचा महायुतीवर काय परिणाम होणार?

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वासाठी तीन दावेदार आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. सध्या शिंदे गटाकडे सर्वाधिक ५१ आमदार आहेत, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या प्रत्येक हालचालीकडे त्यांच्याकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. उद्धव ठाकरे हे जसे मुंबई महापालिकेवर विजय मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत, तसाच भाजपाचाही प्रयत्न राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई महापालिकेवर मजबूत पकड मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्रित आले तर भाजपाला महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याऐवजी युतीचा विचार करावा लागू शकतो.

uddhav thackeray and raj thackeray relation
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय?

राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याने काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत पक्षाचा एकही नेता दिसून आला नाही. काँग्रेसला पक्षापासून अमराठी मतदार दुरावण्याची भीती वाटत आहे. मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या आता फक्त ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. दुसरीकडे, या नव्या समीकरणामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार यांची भूमिकाही आता दुबळी होताना दिसते. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीला नव्याने उभारी मिळू शकते, अशी त्यांना आशा आहे. सध्या शरद पवार यांच्या गोटातील अनेक नेते अजित पवारांच्या पक्षाची कास धरण्याच्या वाटेवर आहेत.

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ‘मराठी-अमराठी’ ध्रुवीकरणाचा धोका?

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती झाल्यास केवळ सत्तेची समीकरणेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेबाबतही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यांच्या युतीमुळे आगामी काळात मुंबईत ‘मराठी विरुद्ध अमराठी’ व ‘मराठी विरुद्ध गुजराती’ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे- हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी ‘मराठी अस्मिता’च्या नावाने भूमिका घेतली. त्यातच मनसे कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदर येथील अमराठी दुकानदाराला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.

“मराठी न बोलणाऱ्यांना विनाकारण मारण्याची गरज नाही; पण कोणीही नाठाळपणा दाखवला, तर त्यांच्या कानाखाली वाजवा,” असं राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. दुसरीकडे, काहीशी सौम्य भूमिका घेणारे उद्धव ठाकरेही या सभेत काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “न्याय मिळवण्यासाठी जर गुंडगिरी करावी लागली, तर आम्ही ती करू,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मात्र, राज्याबाहेरून आलेल्या लोकांना स्थानिक भाषा शिकणे जितकं आवश्यक आहे, तिककंच ते जबरदस्तीने लादणेही अयोग्य आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : भाजपाला मुस्लिमांच्या एका विशिष्ट गटाचा पाठिंबा; केंद्रीय मंत्र्याने नेमका काय दावा केला?

महाराष्ट्राचं स्वरूप कसं बदलतंय?

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून परराज्यातील अनेक तरुण, कामगार व व्यावसायिक इथे स्थलांतरित होत आहेत; पण त्यांच्यासाठी फक्त मराठी येणं पुरेसं नसून इतर महाराष्ट्रातील संस्कृतीचे पालन करणेही गरजेचे आहे. मात्र, तसं होताना दिसून येत नाही, कारण बॉलीवूडमुळे हिंदीचा प्रभाव संपूर्ण देशभरात पसरलेला आहे. आज राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकही बाहेरील जगाशी जोडले जाण्याची स्वप्न पाहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीरजा चौधरी लिहितात, उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील एका दुर्गम गावात काही दिवसांपूर्वी भेट दिली, त्यावेळी झाडाखाली बसलेल्या काही ग्रामस्थांना मी विचारलं की, तुमच्या सगळ्यांची एक इच्छा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली तर ती काय असेल? त्यावर तीन महिलांनी एकत्रितपणे उत्तर दिलं- आमच्या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा हवी आहे. या महिलांसाठी इंग्रजी ही केवळ एक भाषा नव्हे, तर आयुष्यातील नवे दरवाजे उघडणारी संधी आहे, त्यामुळे राजकीय नेत्यांनी केवळ अस्मिता जोपासण्यापुरते भाषण न करता बदलत्या महाराष्ट्राची गरज ओळखून पुढे जाण्याचा मार्ग दाखवायला हवा, अशी अपेक्षा राज्यातील सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.