समाजमाध्यमांतून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल होत असताना काँग्रेसला चोख उत्तर का देता आलेले नाही?

भाजपचा समाजमाध्यमातून होणारा बदनामीचा ‘खेळ’ खूप आधीपासून काँग्रेसच्या लक्षात आला होता. तरीही, काँग्रेसने खालच्या स्तरावर जाऊन भाजपला प्रत्युत्तर दिले नाही. राहुल गांधींच्या तासाभराच्या भाषणातील सात मिनिटांचा ‘बाइट’ बाजूला काढून भाजपच्या समाजमाध्यम विभागाच्या प्रमुखांनी काँग्रेसवर टीका केली, त्यावरून भाजपचे नेते स्वतःचे डोके किती गहाण ठेवतात हे दिसले. भाजपचे नेते अधिकृत ट्विटर खात्यावरून सातत्याने खोटे बोलतात, आम्ही कधीही अधिकृत ट्विटर खात्यावरून खोटी माहिती पसरवलेली नाही. भाजपचे प्रवक्ता, समाजमाध्यम प्रमुख यांच्या ट्वीटर खात्यावर वारंवार ‘फेरफार केलेला मजकूर’ असे ट्वीटरकडून लिहिले जात असेल तर, ही नामुष्की ठरते. माझ्याबाबतीत असे झाले तर मी काँग्रेसच्या समाजमाध्यम प्रमुखपदाचा राजीनामा दिला असता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असतील तर, त्यांचे नेतेही बोलणारच. चिनी घुसखोरीवर मोदींनी देशाची दिशाभूल केली हे पाहिलेले आहे.

भाजपइतका काँग्रेसचा समाजमाध्यम विभाग प्रभावी का नाही?

भाजपला नैतिक-अनैतिकतेशी काहीही देणे-घेणे नाही. आम्ही अनैतिक काहीही करणार नाही. त्यामुळे काँग्रेस कधीही ‘भाजप’ होणार नाही. खोटी माहिती पसरवण्यासाठी भाजपचे नेते अनेक क्लृप्त्या करतात, काँग्रेस तसे कधीही करणार नाही. भाजपकडून एखाद्या मुद्द्याला लक्ष्य करून (नॅरेटिव्ह) काँग्रेसवर हल्लाबोल केला जातो. पण, हॅशटॅग करून व्हायरल झालेले ‘नॅरेटिव्ह’ किती वेळ चालवणार? भाजपचे नेते तात्पुरते खूश होत असतील. ‘भारत जोडो’च्या माध्यमातून लोकांना काय हवे हे समजू लागले आहे. बेरोजगारी, महागाई, संपत्तीचे एकीकरण याविरोधात ते बोलू लागले आहेत. देशाचे खरे ‘नॅरिटिव्ह’ हेच आहे.

हेही वाचा… सुरजागड लोहखनिज प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले

काँग्रेस ‘नॅरेटिव्ह’ तयार करू शकत नाही का?

आम्ही ‘भारत जोडो’तून ‘नॅरेटिव्ह’ तयार केलेले आहे. या यात्रेवर भाजपला प्रतिक्रिया द्यावी लागते, त्यातच सगळे आले! ते राहुल गांधींच्या टी शर्टवर टिप्पणी करत आहेत. या यात्रेचा प्रभाव वाढू लागला आहे, आता बेरोजगारी, महागाईवर भाजपला बोलावे लागेल. मोदींना काही हजार नोकरीपत्रांचे वाटप तरुणांना करावे लागले, तेव्हा भाजप आम्ही तयार केलेल्या ‘नॅरेटिव्ह’च्या मागे धावला जगाला कळले. भाजपकडून गरिबांचे सरकार असल्याचे सांगितले जाते तेव्हा आमच्याच ‘नॅरेटिव्ह’वर ते बोलत असतात. देशात आयात केलेले चित्ते हरिणाची शिकार करणार का, याची चर्चा करणे किंवा मोराला दाणे चारणे यातून भाजप कोणते ‘नॅरेटिव्ह’ तयार करते? अशा वायफळ चर्चांचा लोकांना कंटाळा येऊ लागला आहे, त्याचा राजकीय लाभ कमी होऊ लागला आहे.

हेही वाचा… “मी राहुल गांधीला मारून टाकलं, फक्त…”, हरियाणातील राहुल गांधींचं विधान चर्चेत

काँग्रेसला भाजपविरोधात आक्रमकपणे प्रत्युत्तर देता येईल का?

भाजपचा खोटेपणाला आम्ही आक्रमकपणे प्रत्युत्तर देतो. निवृत्त लष्कर अधिकारी वा ‘रॉ’चे माजी प्रमुख वा निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या ‘भारत जोडो’तील सहभागाविरोधात भाजपचे नेते बोलतात, तेव्हा ते संरक्षण दल वा पोलीस दलांविरोधात बोलत असतात, हा युक्तिवाद करून काँग्रेसने जशास तसे उत्तर दिले. समाजमाध्यम आणि वास्तव परिस्थिती यांचा मेळ घातला गेला पाहिजे, हवेतील गप्पा मारून फायदा होणार नाही. कुठल्याही गोष्टीचे ‘मार्केटिंग’ करण्यावर काँग्रेसचा विश्वास नाही. आम्ही न बोलता काम केले, भाजप मात्र दहा पैशांचे काम हजार रुपयांचे असल्याचे सांगत मिरवत आहे! समाजमाध्यम महत्त्वाचे असून आपण काय करत आहोत, हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, हे आता काँग्रेसच्या नेत्यांना समजू लागले आहे. भाजप आणि केंद्र सरकारच्या त्रुटीही लोकांना दाखवून दिल्या पाहिजेत हेही काँग्रेसला समजले आहे.

हेही वाचा… “आधुनिक काळातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत जातात” राहुल गांधींचा संघावर निशाणा

काँग्रेस कुठे कमी पडतो?

समाजमाध्यम नव्हे तर, अन्य बाबींमध्येही काँग्रेसपेक्षा भाजप आघाडीवर असल्याचे दिसेल. ‘इलेक्टोरल बॉण्ड’द्वारे दिल्या जाणाऱ्या देणग्यांपैकी ९५ टक्के रक्कम भाजपला मिळते आणि उर्वरित ५ टक्के देणग्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना मिळतात. भाजप आणि अन्य पक्षांच्या आर्थिक ताकदीतील हा फरक लक्षात घेतला पाहिजे! सर्व समाजमाध्यम व्यासपीठे (प्लॅटफॉर्म) निष्पक्ष आहेत का? फेसबुककडून लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप कसा होतो, हे समोर आलेले आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांची प्रक्षोभक भाषणे फेसबुक पेजवरून काढून टाकली जात नाहीत. भाजपकडे प्रचंड पैसा आहे, राजकीय ताकद आहे. निवडणूक काळात सर्व संकेतस्थळांवर, डिजिटल व्यासपीठांवर भाजपची जाहिरात दिसते. ‘भारत जोडो’ यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने ३०० जणांचा चमू बनवलेला आहे. भाजपविरोधात असा चमू उभा करण्याएवढे पैसे आमच्याकडे नाहीत. ट्रोल सेनाही नाही. ही लढाई समान स्तरावर लढली जात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(मुलाखत – महेश सरलष्कर)