भाजपाने अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा दिली. अर्थातच उत्तर प्रदेशच्या ८० पैकी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून हा ४०० चा टप्पा भाजपाला सर करायचा होता. मात्र उत्तर प्रदेशमध्येच भाजपाचा सर्वात मोठा भ्रमनिरास झाला. २०१४ आणि २०१९ या सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपा उत्तर प्रदेशमधील प्रथम क्रमाकांचा पक्ष होता, मात्र यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे अयोध्येत राम मंदिराचे घाईघाईत निर्माण करून, त्याआधारे देशभरात मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपाला अयोध्यावासियांनीच जोरदार तडाखा दिल्याचे दिसले. अयोध्यानगरी ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात मोडते, त्याठिकाणी भाजपाच्या लल्लू सिंह यांचा पराभव समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी केला.

काल फैजाबादची मतमोजणी होत असताना भाजपाला पराभव दिसू लागला. भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह यांनी पराभव मान्य करताच, भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. भाजपाचे नेते लक्ष्मीकांत तिवारी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, “आम्ही खूप मेहनत घेतली होती. संघर्षही केला. पण राम मंदिर निर्माणाचे यश आम्हाला मतांमध्ये परावर्तित करता आलेले नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ किंवा ९ जून रोजी शपथ घेणार?

२२ जानेवारी रोजी घाईघाईत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा देश आणि जगभरात कसा पोहोचवता येईल, असा प्रयत्न केला गेला. निवडणुकीतही राम मंदिर बांधल्याचा उल्लेख वारंवार करण्यात येत होता. मात्र राम मंदिराचा विषयातून मते मिळविण्यात भाजपाला पुरेसे यश मिळालेले दिसत नाही. उत्तर प्रदेशमधील पिछेहाट आणि त्यातही फैजाबादमधील पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे.

तिवारी यांनी पुढे म्हटले, “अयोध्येत अनेक स्थानिक मुद्दे आहेत, ज्यावरून लोकांमध्ये नाराजी आहे. मंदिर बांधल्यानंतर विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी जमीन अधिग्रहीत करण्यात आली. अधिग्रहणाच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. त्यातच समाजवादी पक्षाने अवधेश प्रसाद या दलित समाजातील नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे बहुजन समाज पक्षाची मते त्यांच्याकडे वळली.”

कोण आहेत अवधेश प्रसाद?

अवधेश प्रसाद हे नऊ वेळा आमदार राहिले असून उत्तर प्रदेश आणि समाजवादी पक्षातील एक प्रमुख दलित नेता म्हणून त्यांची ओळख आहे. तिसऱ्यांदा खासदार बनू पाहणाऱ्या लल्लू सिंह यांचा तब्बल ५४,५६७ हजारांच्या मताधिक्याने अवधेश प्रसाद यांनी पराभव केला.

विजयानंतर अवधेश प्रसाद यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, हा ऐतिहासिक विजय आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मला एका खुल्या प्रवर्गातील जागेवर उमेदवारी दिली आणि मतदारांनीही जात, समाज बाजूला ठेवून मला मतदान केले.

भाजपाच्या पराभवामागे बेरोजगारी, महागाई, जमीन अधिग्रहण आणि संविधान बदलाची चर्चा कारणीभूत असल्याचे बोलले जाते. पराभूत उमेदवार लल्लू सिंह यांनीदेखील ४०० जागा मिळाल्यानंतर संविधानात बदल करू, असे विधान मागे केले होते.

मतमोजणी केंद्राबाहेर विजय यादव नामक २७ वर्षीय युवकाशी इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधिंनी संवाद साधला. यावेळी युवक म्हणाला की, लल्लू सिंह यांनी संविधानात बदल करण्याचे विधान करायला नको होते. अवधेश प्रसाद यांनी या मुद्द्याला हात घालून प्रचार केला. तसेच उत्तर प्रदेशमध्ये घडलेले पेपरफुटी प्रकरणही महत्त्वाचे ठरले. मीदेखील पेपरफुटी घोटाळ्याचा बळी आहे. माझ्याकडे नोकरी नाही, त्यामुळे मी वडिलांबरोबर शेती करतो. लोकांना बदल हवा होता, त्यामुळेच विद्यमान खासदारांच्या विरोधात मतदान करण्यात आले आहे.

अवधेश प्रसाद पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर निर्माणानंतर रस्ते आणि इतर कामांसाठी अनेकांचे विस्थापन करण्यात आले. त्या सर्वांचे पुनर्वसन करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तसेच ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत, त्यांना मनासारखा मोबदला मिळवून देण्यासाठीही माझे प्रयत्न असणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नेते अयोध्या वासियांनाच विसरले

मोहम्मद घोसी नामक एका सामान्य दुकानदारानेही आपला संताप व्यक्त केला. तो म्हणाला की, विद्यमान खासदार लल्लू सिंह यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. त्यांनी अयोध्येतील लोकांसाठी काम केले नाही. त्यांनी सर्वकाही बाहेरच्या लोकांसाठी केले. अयोध्येतील मूळ लोकांचे प्रश्न सोडविले पाहीजेत, हे भाजपाचे नेते विसरूनच गेले. तसेच लल्लू सिंह यांनी संविधान बदलाची भाषा वापरल्यामुळे अनेकांमध्ये नाराजी पसरली होती. सिंह यांना वाटले की, ते अपराजित आहेत. पण लोकशाहीमध्ये चमत्कार घडविण्याची ताकद आहे, हे ते विसरले होते.