BJP vs Congress Uttarakhand elections उत्तराखंडमध्ये पंचायत निवडणूक पार पडली. भाजपासह काँग्रेससाठीदेखील ही निवडणूक महत्त्वाची होती. शुक्रवारी उशिरा संध्याकाळी उत्तराखंडमधील पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला. सत्ताधारी भाजपाने दावा केला की, त्यांनी लढवलेल्या ३१५ पैकी १२७ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने सांगितले की त्यांच्या १९८ उमेदवारांपैकी १२८ उमेदवार विजयी झाले. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये (हरिद्वार वगळून) ३५८ जिल्हा पंचायत सदस्य, २९७४ ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिल सदस्य आणि ७४९९ पंचायत प्रमुखांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत ५८ बंडखोर उमेदवारांनाही पाठिंबा असल्याचा भाजपाने दावा केला. त्यांना पक्षाचे तिकीट मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. परंतु, या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा नाराज असल्याची चिन्हे आहेत.

निवडणुकीच्या निकालामुळे भाजपा नाराज का?

  • चमोलीसारख्या जिल्ह्यांमधील पक्षाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. या भागात भाजपाला २६ पैकी केवळ चारच जागा जिंकता आल्या.
  • याव्यतिरिक्त, नैनितालचे आमदार सरिता आर्य यांचा मुलगा रोहित आर्य हे भाजपाच्या तिकिटावर भोवाली गाव जिल्हा पंचायत जागेवरून लढत होते. त्यांचा एका अपक्षाकडून पराभव झाला.
  • लान्सडाउनचे आमदार दिलीप रावत यांच्या पत्नी नीतू रावत यांचाही जिल्हा पंचायत निवडणुकीत पराभव झाला.
  • भाजपा आमदार महेश जीना यांचा मुलगा करण जीनादेखील बुबलिया क्षेत्र पंचायत जागेवरून उभे होते, त्यांचाही निवडणुकीत पराभव झाला. महेश जीना हे अल्मोड़ा जिल्ह्यातील सल्ट येथील आमदार आहेत.

गेल्या वर्षी बद्रीनाथमध्ये तत्कालीन आमदार राजेंद्र भंडारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने पोटनिवडणूक जिंकली होती, तिथेदेखील त्यांच्या पत्नी रजनी यांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालांमुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात, कारण त्यांच्या स्वतःच्या चमोली जिल्ह्यात भाजपाची कामगिरी निराशाजनक राहिली. चमोली भाजपाचे अध्यक्ष गजपाल बर्थवाल यांचादेखील पराभव झालेल्यांमध्ये समावेश आहे.

राज्यातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

भट्ट म्हणाले की, पक्षाच्या कोणत्याही आमदार किंवा पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाच्या पराभवाला थेट त्या व्यक्तीशी जोडणे चुकीचे आहे. “पक्षाने ३१ जागांवर विजय मिळवला. याव्यतिरिक्त, भाजपाच्या विचारसरणीशी जुळणारे ५८ उमेदवारही जिंकले. एकूण मिळून भाजपाने २१६ जागा जिंकल्या आहेत, जिल्ह्यांमध्ये बोर्ड स्थापन करण्यासाठी हा आकडा बहुमताचा आहे,” असे ते म्हणाले. पक्षाच्या कामगिरीचे कौतुक करताना, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन) सूर्यकांत धस्माना म्हणाले, “केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागांमध्येही आम्ही मोठ्या प्रमाणात विजय मिळवला आहे. डेहराडूनमध्ये एकूण ३० पैकी १२ जागा काँग्रेसच्या उमेदवारांनी जिंकल्या,” असे ते म्हणाले.

भाजपाने जिल्ह्यात सात जागा जिंकल्या. काँग्रेसने गढवाल आणि कुमाऊं दोन्ही प्रदेशांमध्ये आघाडी घेतली आहे. आम्ही १२ पैकी आठ ते १० जिल्ह्यांमध्ये जिल्हा पंचायत बोर्ड स्थापन करू. अनेक पक्षाचे नेते आणि त्यांचे नातेवाईक पराभूत झाले आहेत. रजनी भंडारी या जिल्हा पंचायतच्या विद्यमान अध्यक्षा होत्या आणि नैनितालचे विद्यमान अध्यक्षही हरले आहेत, असे धस्माना यांनी सांगितले. पक्षाचे प्रवक्ते शीशपाल बिष्ट म्हणाले की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चांगल्या संधी आहेत असा त्यांना विश्वास आहे. “२०१९ मध्ये काँग्रेसला भाजपाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले होते आणि आता ते आमच्या जागेवर आहेत,” असे ते म्हणाले.