Bihar Election Results Mahagathbandhan Defeat : बिहारमध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी केवळ १२ जागा कमी पडल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वादळाचा सामना करावा लागला. महाआघाडीतील दोन प्रमुख घटकपक्ष असलेल्या राजद आणि काँग्रेसचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. सर्वात मोठा फटका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदला बसला. गेल्या निवडणुकीत राजदने ७५ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा बहुमान पटकावला होता. यावर्षीच्या निवडणुकीत पक्षाला केवळ २५ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला तर दोन अंकी आकडा गाठण्यातही अपयश आले. बिहारमध्ये महाआघाडीच्या पराभवाची कारणे कोणती? त्याविषयीचा हा आढावा…
१० लाख नोकऱ्यांचे आश्वासन कमकुवत
निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्यातील एनडीएचे सरकार कुमकुवत आणि अस्थिर होत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. २०२० मध्ये १० लाख तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन देऊन तेजस्वी यादव यांनी एनडीएला हादरवून टाकले होते. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी नवीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित न करता पुन्हा जुनाच मुद्दा रेटण्याचे काम केले. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनाव्यतिरिक्त तेजस्वींकडे कोणतीही ठोस योजना नव्हती. त्यांचा हा मुद्दा प्रभावी ठरला नसल्याचे निकालातून समोर आले.
‘दशहजारी’ योजनेना फटका
तेजस्वी यादव यांनी ‘माई-बहीन मान’ योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याउलट नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत पात्र महिला उद्योजकांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली. व्यवसायाची कामगिरी समाधानकारक असल्यास सहा महिन्यांच्या आत महिलांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले. ‘दशहजारी’ म्हणून लोकप्रिय झालेल्या या योजनेच्या माध्यमातून नितीश कुमारांनी महिला मतदारांवर मजबूत पकड निर्माण केली आणि तेजस्वी यादव यांच्या आश्वासनांना पूर्णपणे कमकुवत केले.
आणखी वाचा : AIMIM Bihar Performance : बिहारमध्ये ओवैसींचा पक्ष काँग्रेसपेक्षाही शक्तिमान; एमआयएमने कशी केली कामगिरी?
महाआघाडीतील कमकुवत युती
२०२० मध्ये राजद हा बिहारमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला होता. त्यावेळी चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवत नितीश कुमार यांच्या पक्षाचे मोठे नुकसान केले होते. जेडीयूच्या या नुकसानीचा थेट फायदा राजदला झाला होता. यंदा चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होऊन विधानसभेची निवडणूक लढवल्याने जेडीयूला फायदा आणि राजदचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. तेजस्वी यादव यांनी आपला जनाधार वाढवण्यासाठी इतर मित्रपक्षांबरोबर युती केली, पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे दिसून आले.
बिहारमध्ये २००५ मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी विरोधकांनी ‘जंगलराज’चा मुद्दा उपस्थित करीत राजदला सत्तेतून बाहेर हटवले होते. २०१५ आणि २०२० निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी सामाजिक समीकरणावर भर देत विरोधकांचा हा मुद्दा खोडून काढला. यंदा मात्र एनडीएने हा मुद्दा पुन्हा उकरून काढल्याने राजदकडे त्याचे उत्तर नव्हते. परिणामी पक्षाला निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे दिसून आले.
काँग्रेसच्या अपयशाची कारणे कोणती?
काँग्रेसच्या खराब कामगिरीसाठी पक्षातील अनेक नेत्यांनी तीन प्रमुख कारणे सांगितली आहे. त्यातील पहिले कारण म्हणजे काँग्रेसने यावेळच्या निवडणुकीत फक्त सामाजिक न्यायाच्या धोरणावर भर दिल्यामुळे उच्च वर्णीय मतदार पक्षापासून दुरावले गेले. दुसरीकडे इतर मागसवर्गीय समाजाच्या मतदारांनीही काँग्रेसकडे पाठ फिरवून नितीश कुमार यांना समर्थन दिले. महिला मतदारांवरही काँग्रेसला फारसा प्रभाव टाकता आला नाही. या तिन्ही मुद्द्यांमुळे काँग्रेसला निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : Congress Defeat in Bihar : काँग्रेस पक्ष नेमक्या कोणत्या दिशेने? बिहारमधील पराभव मोठ्या संकटाचे संकेत?
राहुल गांधींच्या धोरणात्मक चुका
राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मोठ्या चुका केल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. ते म्हणाले, “राहुल गांधी माझ्या जिल्ह्यात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या एका गावात ब्राह्मण समुदायाच्या मतदारांची संख्या लक्षणीय होती. एका नामांकित विद्यापीठाच्या माजी कुलगुरूसह जवळपास पाच हजार ब्राह्मण मतदार राहुल गांधींना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी या मतदारांना भेट घेण्यास टाळल्याने मोठा गैरसमज निर्माण झाला.” पक्ष नेतृत्वाने समाजातील सर्व घटकांना सोबत घेणे गरजेचे असते; पण राहुल यांना ते जमले नाही, अशी खंतही काँग्रेसच्या नेत्याने व्यक्त केली.
‘मतचोरी’च्या मुद्द्याला प्रतिसाद नाही
विधानसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारांची विशेष फेरतपासणी मोहीम राबवली होती. काँग्रेसने याच मुद्द्याला हाताशी धरून मतदार अधिकार यात्रा काढली. राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रेला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला; पण त्याचे मतांमध्ये रुपांतर झाले नाही. काँग्रेसने वारंवार केलेल्या मतचोरीच्या आरोपांनाही मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्याउटल तेजस्वी यादव यांनी रोजगाराचे मुद्दे आणि लोकांच्या दैनंदिन समस्यांवर भर दिल्याची कबुली काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.
