पाचपैकी चार राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाल्याने साऱ्यांच्या नजरा आता तेलंगणामधील अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानावर आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेचा सोपान गाठणार याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
तेलंगणात येत्या गुरुवारी (३० तारीख) मतदान होत आहे. निवडणूक आधी एकतर्फी होईल आणि चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती सत्तेची हॅटट्रिक पूर्ण करेल, असेच एकूण चित्र होते. पण काँग्रेसने कर्नाटकच्या विजयानंतर तेलंगणात जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या फेस आणला आहे. काँग्रेसला आधी फारसे महत्त्व न देणाऱ्या चंद्रशेखर राव यांना अखेरच्या टप्प्यात काँग्रेसवर सातत्याने टीका करावी लागत आहे. इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसवर टीका करीत आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या पराभवावर चंद्रशेखर राव टिप्पणी करीत आहेत.
हेही वाचा : विमानतळ नामकरणानिमीत्त ओबीसी एकत्रिकरणाचा प्रयत्न ? दि.बा. पाटील यांच्या नावाचा लढा आणखी तीव्र
तेलंगणात मधल्या काळात भाजपने जोर लावला होता. चंद्रशेखर राव यांना भाजपचेच आव्हान असेल, अशी वातावरणनिर्मिती दोन पोटनिवडणुकांमधील भाजपच्या विजयाने झाली होती. हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपला हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा झाला होता. पण गेल्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाने तेलंगणातील चित्र बदलले. गलीतगात्र आणि गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसच्या आशा एकदमच पल्लवीत झाल्या. भाजपकडे जाणारा ओघ थांबला आणि अन्य पक्षातील नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागले.
अखेरच्या टप्प्यात भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस अशी चुरशीची लढत होत आहे. मतदानपूर्व चाचण्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. काँग्रेसने भारत राष्ट्र समितीवरच आरोप सुरु केले. या सरकारच्या योजनांमधील त्रुटींवर लक्ष वेधले. मतदारांना कर्नाटकप्रमाणे पाच आश्वासने देत त्याची तात्काळ पूर्तता करण्याची ग्वाही दिली. ग्रामीण भागात चित्र बदलत आहे.
हेही वाचा : सचिन पायलट यांचा प्रचार अन् अशोक गहलोतांचा पाठिंबा, भाजपाच्या टीकेला उत्तर म्हणून काँग्रेसची खास रणनीती!
भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसमधील लढतीत भाजप मागे पडला आहे. दक्षिणेकडील अन्य एका राज्यात काँग्रेस सत्तेत येणे भाजपला नकोच आहे. भारत राष्ट्र समिती पुन्हा सत्तेत आल्यास ते भाजपला फायदेशीरच ठरेल. शेवटच्या तीन-चार दिवसांत मतदारांवर अधिक प्रभाव पाडण्याचा सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करतील. पण आधी एकतर्फी वाटणारी निवडणूक मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना शेवटच्या टप्प्यात जड गेली आहे. नऊ वर्षे सत्तेत असल्याने चंद्रशेखर राव हे अखेरच्या टप्प्यात साम, दाम, दंड, भेद या साऱ्यां अस्त्रांचा वापर करतील अशीच चिन्हे आहेत.