सांगली : गेल्या दहा वर्षाच्या राजकीय वाटचालीत सावलीसारखा ठामपणे उभा असलेल्या मदन पाटील यांचा गट जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने अचंबित आणि अस्वस्थ झाला असला तरी आता तो सावरला असून या गटाचे नेतृत्व आता खासदारांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत. सांगलीत काँग्रेसच्या नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी वसंतदादा घराण्याचे वारसदार खासदार विशाल पाटील पुढे सरसावले आहेत. मदन पाटील गटात निष्ठावंत म्हणून समजली जाणारी अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची फळी पाटील यांच्यासमवेत भाजप प्रवेशाच्या प्रतिकूल होती, आणि या गटाने आता काँग्रेसमध्येच सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे. या अस्वस्थ गटाला आता आमदार विश्वजित कदम आणि खासदार पाटील कसे स्वीकारतात यावर महापालिका निवडणुकीचे राजकारण अवलंबून राहणार आहे.
श्रीमती पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी दाखल केली होती. यावेळी त्यांना खासदार विशाल पाटील साथ मिळाली. खासदारकीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा आदेश डावलून श्रीमती पाटील घरच्या म्हणून खासदारांसोबत राहिल्या होत्या. याची परतफेड करणे भाग म्हणून खासदार पाटील बंडखोरीला पाठबळ देत असल्याचे निदान व्यासपीठावर राहून तरी प्रदर्शित करत होते.
वसंतदादा घराण्यातील भाउबंदकी सांगलीकरांना नवीन नाही. अगदी विष्णुअण्णा पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यामागे आणि संभाजी पवार यांच्या विजयासाठी ही भाउबंदकी कारणीभूत ठरली होती. साखर कारखाना निवडणुकीत दोन्ही गट एकमेकासमोर उभे ठाकले होते. तर विधानसभेसाठी एकवेळ प्रकाश बापू पाटील आणि मदन पाटील यांच्यात लढत झाली होती. दोघामध्ये झालेल्या मतविभाजनात दिनकर पाटील यांना आमदारकीची लॉटरी लागली होती. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मदन पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उतरून विशाल पाटील यांनी विजय संपादन केला होता. यामुळे दादा घराण्यात राजकीय सख्य सोयीनुसार होते हे सर्वानाच ज्ञात आहे.
खासदार पाटील यांनी भाजप विरोधात निवडणुक लढवून घराण्यापासून दूर गेलेली खासदारकी परत मिळवली. मात्र, यासाठी त्यांना बंडखोरी करावी लागली. दादा घराण्यातील दोन घरे एकत्र आल्याने सांगलीत लोकसभेला २० हजाराचे मताधिक्य मिळाले. मात्र, ही स्थिती विधानसभेला का उरली नाही याचे शोध घेतला तर केवळ व्यासपीठावरून मते मागून मते मिळत नाहीत, तर त्याला मनापासून कृतीची जोड दिली तरच मतदारामध्ये विश्वास निर्माण होउन मतांत परिवर्तन होते. आता श्रीमती पाटील या भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या आहेत. यासाठी भाजपचे शेखर इनामदार व जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांचे प्रयत्न यशस्वी ठरले असले तरी मनापासून श्रीमती पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला हे अजूनही पटत नाही. केवळ वसंतदादा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी आणि वसुली थोपवण्याचा हेतू तर यामागे नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मदन पाटील गटात असलेले अल्पसंख्याक समाजाचे नेते जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये नेतृत्व केलेल्या प्रा. सिकंदर जमादार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपण काँग्रेसमध्येच सक्रिय राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत युनुस महात, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार अशी काही मंडळी भाजपमध्ये जाण्यास नकार देत काँग्रेसमध्येच सक्रिय राहणार आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपने पाटील यांना खुलेपणा दिला तर मुळचे भाजपमध्ये प्रवेश केलेले गप्प बसतील अशीही स्थिती दिसत नाही. तर मदन पाटील गटाच्या अल्पसंख्याक समाजात नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी खासदार पाटील यांनाच पुढे यावे लागणार आहे. आता ते अपक्ष असल्याने काँग्रेस म्हणून पुढे येणार की वसंतदादा आघाडी म्हणून आपले नेतृत्व उभे करणार हे महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही पक्षाबाबत फारसे समाधानी दिसत नसले तरी त्यांना दुसरा पर्याय काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे आणि खासदार गटाचे फारसे सख्य सध्या तरी दिसत नाही. त्यांची भूमिकाही काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.