अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालय मिळूनही तात्पुरता प्रवेशही न घेण्याची चूक तिसऱ्या फेरीत साधारण १० हजार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पाचव्या फेरीवरील ताण वाढण्याचीच शक्यता आहे.
अकरावीच्या तिसऱ्या प्रवेश १८ हजार ७६ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी १० हजार ७०३ विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी अवघ्या ४ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. या फेरीला ७ हजार ३७३ विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळाली होती. त्यापैकी ३ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी पूर्वी मिळालेले महाविद्यालय किंवा बेटरमेंटमध्ये मिळालेले महाविद्यालय यांपैकी एकात प्रवेश निश्चित केला आहे. या फेरीला एकूण ८ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत.
चौथी प्रवेश यादी सोमवारी (१८ जुलै) सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना तीन फेऱ्यांमध्ये प्रवेशच मिळाला नाही त्यांचा या फेरीत समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आधीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळालेल्या आणि बेटरमेंटची एकही संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीतही बेटरमेंटची संधी मिळणार आहे.
जे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत, ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी राहिलेल्या रिक्त जागांवर पाचवी प्रवेश फेरी घेण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.