पुण्यातील विमानतळ परिसरातील एक खोली भरून तब्बल दहा ते बारा कोटींच्या बनावट नोटा आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे  या प्रकरणी एका जवानांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

विमाननगर परिसरात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. तसेच त्यामध्ये अमेरिकन बनावट डॉलरही जप्त करण्यात आले आहेत. या बनावट नोटामध्ये विशेषत : नोटा बंदीमध्ये हजारच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या असताना, त्या देखील आढळून आल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, विमानतळ भागात बनावट नोटा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता व तपासणी केली एका खोलीत दहा ते बारा कोटींच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  या सहा आरोपींमध्ये लष्करातील एका जवानाचा सहभाग असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.