पिंपरी- चिंचवड शहरातील १२ वर्षांच्या मुलीचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी नऊ तासांमध्ये मुलीची सुटका केली असून मोबाईल ट्रेस झाल्याने मुलीची सुटका करण्यात यश आले आहे.

चिंचवडमधील क्विन्स टाऊन येथे राहणाऱ्या माही जैन (वय १२) या मुलीचे आई- वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास माही जैन शाळेतून घरी परतली. इमारतीत आल्यावर तिने सुरक्षा रक्षकाकडे स्कूल बॅग दिली आणि ती पेन आणायला दुकानात गेली. यादरम्यान सोसायटीपासून काही अंतरावर एक कार थांबली होती. या कारमध्ये दोन जण होते. या दोघांनी मुलीचे अपहरण केले. मुलीने आरडाओरडा केल्याने दुकानदार तिच्या मदतीसाठी बाहेर आला. मात्र, तोवर अपहरणकर्ते कारमधून मुलीसोबत पसार झाले होते. माही जैनच्या अपहरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. मुलीची सुखरुप सुटका करणे हे पोलिसांसाठी महत्त्वाचे होते. पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. लॉजमध्ये पाहणी केली, मात्र माहीची माहिती मिळत नव्हती.

चार तासांनी अपहरणकर्त्यांनी माहीच्या कुटुंबीयांना फोन करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. शेवटी तिच्या आई वडिलांनी १५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. पोलिसांनी माहीच्या वडिलांना ज्या मोबाईल क्रमांकावरुन फोन आला तो ट्रेस केला. पोलिसांना आरोपी कुठे लपले आहेत, हे समजले होते. काही वेळातच पोलिसांचे एक पथक त्या परिसरात पोहोचले. हिंजवडीतील नेरे येथे एका सोसायटीबाहेर पोलिसांना एक कार दिसली. याच कारमधून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी रात्री दोन वाजता सापळा रचून शिताफीने माहीची सुटका करत दोन्ही अपहरणकर्त्यांना अटक केली.

नितीन सत्यवान गजरमळ (वय २५) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा अशी या आरोपींची नावे आहेत. लहान मुलांचे अपहरण करुन पैसे कमवायचे, असा त्यांचा कट होता. यासाठी ते उच्चभ्रू वस्तीत फिरत होते. गेल्या १० दिवसांपासून त्यांनी क्विन्स टाऊन या सोसायटी बाहेर पाळत ठेवली होती.

इमारतीतील लहान मुलांकडे त्यांचे लक्ष होते. अखेर गुरुवारी त्यांना माही एकटीच दिसली आणि त्यांनी तिचे अपहरण केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. अपहरणासाठी ज्या कारचा वापर करण्यात आला ती कार आरोपींनी काही महिन्यांपूर्वी आकुर्डी येथून ऑनलाइन घेतली होती. यातील एक आरोपी हा औंध येथील चित्रपट गृहात काम करत असल्याचे समोर आले आहे.