27 January 2021

News Flash

गाडय़ा खरेदीने प्रवाशांना फायदा होणार का?

सातशे गाडय़ा कर्जाच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणार आहेत. उर्वरित पाचशे गाडय़ा खासगी वाहतूक व्यावसायिकांकडून भाडे तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत.

पुणे आणि पिंपरीतील प्रवाशांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात आणखी बाराशे गाडय़ा आणण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी हा निर्णय प्रवाशांची दिशाभूल करणारा असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. या निर्णयाने वाहतुकीचा प्रश्न सुटणार का आणि या निर्णयाचा नक्की फायदा कोणाला होणार आहे, असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत बाराशे गाडय़ा घेण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला. त्यातील सातशे गाडय़ा कर्जाच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणार आहेत. त्या संबंधीचा अहवाल लवकरच संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. उर्वरित पाचशे गाडय़ा खासगी वाहतूक व्यावसायिकांकडून भाडे तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. हा निर्णय प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी घेण्यात आला असल्याचे सांगितले जात असले, तरी या निर्णयाला स्वयंसेवी संस्थांनी हरकत घेतली आहे. तसे पत्रही परिवहनमंत्री, महापौर, आयुक्त आणि पीएमपीच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे. सध्या जे मार्ग पीएमपीकडून चालवले जातात, त्यांचा कोणताही अभ्यास प्रशासनाने केलेला नाही. या मार्गावरील प्रवासी संख्येचाही अभ्यास झालेला नाही. या प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ किती आणि ती कशी करता येईल याबाबतही ठोस कार्यवाही होत नाही. कोणत्या मार्गावर किती गाडय़ांची आवशक्यता आहे, याचेही नियोजन पीएमपीने केलेले नाही. केवळ संदर्भरहित आकडे मांडले जातात आणि ताफा वाढवला जातो. आतापर्यंतच्या ताफा वाढीतून ठेकेदार, पीएमपीचे अधिकारी, सेवक, राजकीय नेते यांचेच हित जपले गेले आहे, असे पत्र पीएमपी प्रवासी मंचतर्फे देण्यात आले आहे.
कोणत्या मार्गावर किती गाडय़ांची आणि कोणत्या वेळेला गरज आहे याचा अभ्यास करून नंतरच गाडय़ांची किती आवश्यकता आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात गाडय़ा वाढवूनही ठिकठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत, असेही संघटनेचे म्हणणे आहे. कार्यक्षम सेवा देण्याऐवजी ढिसाळ नियोजनामुळे पीएमपी सेवा प्रवाशांसाठी चांगली सेवा देणारी नसल्याचाच अनुभव येत असून आणखी बाराशे गाडय़ा आणूनही नियोजन योग्य नसेल, तर त्यांचा फायदा प्रवाशांना कसा होणार, अशीही विचारणा करण्यात आली आहे.
पीएमपीच्या ताफा वाढीचा विचार केला, तर गेल्या काही वर्षांत ताफ्यात दीडपट वाढ झाली आहे. मात्र प्रवासी संख्या वाढलेली नाही. प्रतिगाडीचा विचार केला, तर तीस टक्के प्रवासीघट झाली असून ठेकेदारांच्या गाडय़ांमध्ये अडीचपटीने वाढ झाली आहे. मार्गावर बंद पडणाऱ्या गाडय़ांच्या संख्येचा विचार केला, तर त्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. प्रवाशांसाठी गेल्या काही वर्षांत भाडेही वाढवले गेले आहे. याचा विचार गरजेचा होता, याकडे पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी लक्ष वेधले आहे.

प्रतिगाडी अकराशे प्रवासी हे उद्दिष्ट ठेवणे आवश्यक आहे, तसेच गर्दीच्या पन्नास मार्गावर पाच ते वीस मिनिटे वारंवारितेच्या (फ्रिक्वेन्सी) फेऱ्या देणेही आवश्यक आहे. दहा किलोमीटपर्यंतच्या शहर वाहतूक सेवेसाठी एक रुपया प्रतिकिलोमीटर दर असावा, तसेच ठेकेदारांना प्रतिकिलोमीटर उत्पन्नाएवढेच भाडे दिले जावे अशा मागण्या आम्ही सातत्याने करत आहोत.
जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2016 3:30 am

Web Title: 1200 new buses for pmp and pcmc
Next Stories
1 पुणे-मुंबई द्रुतगतीच्या टोलमधून नागरिकांच्या बाराशे कोटींवर डल्ला?
2 आंबडवे येथे बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व शिल्पसृष्टी
3 वास्तुविशारद हफीझ कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी शनिवारी चित्ररूप संवाद
Just Now!
X