जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना आदेश

शहर आणि जिल्ह्य़ातील प्रत्येक बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार केंद्र सुरू करावे, असे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्य़ातील बँकांनी आपापल्या शाखेत आधार यंत्रे कार्यान्वित करावीत, १२९ यंत्रे येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू करून आधारची कामे होणाऱ्या संबंधित बँकेच्या शाखेबाहेर ठळकपणे आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्याबाबतचा फलक लावावा आणि त्याचा अहवाल पुढील आठवडय़ात सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बँकांना गुरुवारी दिले.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार मोबाइल सीमकार्ड, बँक खाते, बँकांच्या माध्यमातून होणारे विविध व्यवहार, प्राप्तिकर विवरण, शाळा आणि महाविद्यालय, रुग्णालये अशा सर्वच ठिकाणी आधार कार्डची जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर बँकांनीही त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याकरिता देशातील प्रत्येक जिल्ह्य़ासाठी केंद्र शासनाकडून १२९ आधार यंत्रे पुरविण्यात आली आहेत. मात्र, केंद्राच्या या निर्णयाला बँकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

भारत सरकारने हा उपक्रम सुरू केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्य़ासाठी १२९ आधार यंत्रे पुरविली आहेत. ही यंत्रे जिल्ह्य़ातील १२९ विविध बँकांच्या शाखांमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले असून जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी बँकांची बैठक घेऊन याबाबतचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्य़ातील १२९ यंत्रांपैकी केवळ ५७ बँकांमध्ये आधार यंत्रे बँकांकडून कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच या ५७ बँकांमध्ये सुरू असलेल्या आधार यंत्रांवर केवळ संबंधित बँकांच्या खातेदारांची आधार नोंदणी आणि दुरुस्तीची कामे बँकांकडून केली जातात, असे निदर्शनास आले आहे. याबरोबरच सुरू असलेल्या ५७ यंत्रांपैकी गेल्या एक महिन्यात दहापेक्षा कमी आधार नोंदणी किंवा दुरुस्तीची कामे केलेली वीस यंत्रे आहेत आणि अनेक बँका स्वत:च्या खातेदारांचीच आधारची कामे करतात, असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही यंत्रे सर्व नागरिकांसाठी असून सार्वजनिक आधार केंद्रांप्रमाणेच या ठिकाणी नागरिकांची आधारची कामे करण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.

येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व बँकांच्या शाखांमध्ये शंभर टक्के (१२९) आधार यंत्रे कार्यान्वित करावीत, २८ फेब्रुवारीला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली असून त्यामध्ये आधार यंत्रे कार्यान्वित केल्याबाबतचा अहवाल सादर करावा, स्वत:च्या खातेदारांबरोबरच इतर सर्वसामान्य नागरिकांची आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करावीत, प्रत्येक आधार यंत्र असलेल्या बँकेच्या शाखेच्या बाहेर ‘सर्व नागरिकांची मोफत आधार नोंदणीची कामे केली जातील,’ असे फलक लावावेत असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.