‘थर्टी फर्स्ट’ला ‘झिंग झिंग झिंगाट’; नववर्षांरंभी देवदर्शनाला गर्दी

‘हवशे’, ‘नवसे’ आणि ‘गवशां’नी मोठय़ा जल्लोषात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. मात्र, अतिउत्साहात हुल्लडबाजी करत दारू पिऊन बेफाम वाहन चालणाऱ्या तब्बल १७८ तळीरामांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत ‘झिंग झिंग झिंगाट’ करत उतमात करणारे दिसून आले. त्याचप्रमाणे, नववर्षांच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून देवदेवतांच्या दर्शनासाठी जाणारे भक्तही दिसून आले.

[jwplayer itkTOSml]

‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली मस्ती करणाऱ्या हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी सायंकाळी मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी करून पोलिसांनी वाहनस्वारांची ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ मशीनच्या माध्यमातून तपासणी सुरू केली. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मागदर्शनाखाली उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या मोहिमेत १७८ जणांवर कारवाई करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ६६ जणांवर कारवाई झाली.

याशिवाय, निगडी-१६, पिंपरी-३७, चिंचवड-११, भोसरी-१४, चतु:शृंगी-१४, सांगवी-२० आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय, वाहन परवाना न बाळगणाऱ्या १० जणांवरही कारवाई करण्यात आली. काल ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री उशिरापर्यंत मद्यालये हाऊसफुल्ल होती. रस्त्यावरील चायनीजच्या गाडय़ा आणि वाइन शॉपमध्ये झुंबड उडाली होती.

जागोजागी स्पिकरच्या भिंती उभारून उडत्या चालींची गाणी लावून ‘झगाट डान्स’ सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते. त्याचप्रमाणे, रविवारी भल्या पहाटेपासून नागरिकांनी परिसरातील मंदिरांमध्ये रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.

[jwplayer CJ5r9OHQ]