रासायनिक कंपनीत आग : मृतांमध्ये १५ महिलांचा समावेश

पुणे : पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये १५ महिला कामगारांचा समावेश आहे.

मुळशी तालुक्यातील उरवडे- पिरंगुट औद्योगिक वसाहतीत एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी ही कंपनी आहे. या कंपनीत जंतुनाशकांची निर्मिती केली जाते. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. त्या वेळी कंपनीत ४१ कामगार होते. त्यापैकी १८ कामगार वातानुकूलन यंत्रणा असलेल्या विभागात पॅकिंगचे काम करत होते. त्यांच्या विभागाचे दार बंद असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, रसायनांनी पेट घेतल्यामुळे आग आटोक्यात आणताना अडचणी येत होत्या. आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. तासानंतर काही प्रमाणात आग आटोक्यात आली. मात्र, कंपनीतील अंतर्गत भागात अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अडथळे येत होते. जेसीबी यंत्रे आणून काही भाग पाडण्यात आला आणि धुराला वाट करून देण्यात आली. जिवावर उदार होऊन जवानांनी अंतर्गत भागात प्रवेश करत रात्री नऊ वाजेपर्यंत अठरा मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीचे महानगर आयुक्त सुहास दिवसे, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.

आगीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला येत्या दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणात कंपनीच्या संचालकांना पुण्यातील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे.

मंगल नागू आखाडे (रा. खारावडे, ता. मुळशी), सीमा बोराटे (रा. बीड), संगीता गोंदे (रा. मंचर), सुमन ढेबे (रा. खारावडे), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (रा. सोलापूर), सारिका कुदळे, सुरेखा तुपे (रा. करमोळी) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. उर्वरित मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आक्रोश अन् हुंदके..

कंपनीतील दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाइकांनी ससून रुग्णालयात गर्दी केली होती. नातेवाइकांचे हुंदके आणि आक्रोशामुळे रुग्णालयाच्या आवारात शोकग्रस्त वातावरण होते. दुर्घटना घडल्यानंतर या भागातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दोन जेसीबी यंत्रे आणून कंपनीचा काही भाग तोडण्यात आला. तसेच अंतर्गत भागात अडकलेल्या काही जणांची सुटका करण्यात आली.

केंद्र, राज्य सरकारकडून मदत : पिरंगुट येथील भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजारांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. याप्रकरणात जिल्हा प्रशासनाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.