ब्रेथ अ‍ॅनलायजरची कमतरता असूनही कारवाईत वाढ; अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मोहीम
मद्यपी वाहनचालकांकडून होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून पूर्वी नववर्षांच्या पूर्वसंध्येला किंवा गटारी अमावस्येला धडक कारवाई केली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांत मद्यपी वाहनचालकांकडून होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही परिस्थिती ओळखून वाहतूक पोलिसांकडून मद्यपींना पकडण्यासाठी वर्षभर मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालक पकडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांत २,३८६ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाहतूक शाखेकडून मद्यपींना पकडण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर यंत्रणेचा वापर केला जातो. शहराचा विस्तार पाहता पोलिसांकडे असलेल्या ब्रेथ अ‍ॅनलायजरची संख्या अपुरी आहे. मात्र, यंदा पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविल्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणारे चालक मोठय़ा प्रमाणात पकडले जात आहेत.
पुणे शहरात मोठय़ा संख्येने परप्रांतीय विद्यार्थी वास्तव्यास आहेत, तसेच माहिती-तंत्रज्ञान कंपनीत रोजगाराच्या संधी वाढल्याने परप्रांतातून येऊन पुण्यात स्थायिक होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी सुटी असल्याने शहर व उपनगरातील विविध उपाहारगृहांत मोठी गर्दी असते. मद्यप्राशन करून वाहने चालविल्यामुळे किरकोळ तसेच गंभीर स्वरूपांचे अपघात होतात. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांना पकडण्यासाठी विशिष्ट दिवशी राबविण्यात येणारी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम वर्षभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यपी वाहनचालकांकडून होणारे अपघात रोखणे तसेच त्यांच्यावर जरब बसविण्यासााठी करण्यात येणाऱ्या कारवाईचा वेग वाढवणे अशा स्वरूपाची ही मोहीम आहे. सातत्याने कारवाई होत असल्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर मोठय़ा संख्येने कारवाई होत आहे. त्यामुळे चालू वर्षांत सहा महिन्यांत कारवाईचा आकडा दोन हजारांवर गेला आहे.
मद्यपी वाहनचालकांना पकडण्यासाठी पोलिस ब्रेथ अ‍ॅनलायजर यंत्रणेचा वापर करतात. पूर्वी मद्यपी वाहनचालकांवर ब्रेथ अ‍ॅनलायजरच्या साहाय्याने कारवाई केल्यानंतर त्याच्या रक्तातील मद्याचा अंश शोधण्यासाठी वाहनचालकाची वैद्यकीय तपासणी केली जायची. मात्र पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अत्याधुनिक ब्रेथ अ‍ॅनलायजरची खरेदी करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे मद्यपी वाहनचालकांच्या रक्तातील मद्याचे प्रमाण लगेचच कळते. मद्यपी वाहनचालकावर खटला दाखल करून त्याला अटक केली जाते. मद्यपी वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याची तरतूद क रण्यात आली आहे, तसेच मद्यपी वाहनचालकांचा परवाना जप्त करून तो निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात येतो.