पुण्यात पावसाच्या दृष्टीने अगदी आठवडय़ापूर्वीच विपरीत स्थिती होती. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांत पडलेल्या पावसाने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. १ जून ते २५ जून या काळात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत या वेळी तब्बल दुप्पट पाऊस पडला आहे. पुणे वेधशाळेत या पावसाची नोंद २०९.४ मिलिमीटर इतकी झाली आहे.
लोहगाव येथे १९८.३ मिलिमीटर, तर पाषाण येथे आतापर्यंत २६७.१ मिलिमीटर इतका पाऊस नोंदवला गेला आहे. पुण्यात या वेळी पावसाला उशिराने सुरूवात झाली. त्यामुळे निम्मा जून महिना उलटला तरी फारसा पाऊस पडला नव्हता. मात्र, त्यानंतर गेल्या शनिवारपासून पावसाने जोर धरला आणि सलग चार-पाच दिवस संततधार पावसाने रोजच हजेरी लावली. या काळात सुमारे सव्वाशे मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे १ ते २५ जून या काळात तब्बल २०९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही नोंद या काळातील सरासरी पावसाच्या तुलनेत सुमारे शंभर मिलिमीटरने जास्त आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांचा विचार करता पुण्यात सुमारे ५४६ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंतच्या तीन आठवडय़ांत जवळजवळ ३५ ते ४० टक्के पाऊस पडला आहे.
याबाबत पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले की, पुण्यात पावसाला उशिराने सुरूवात झाली असली तरी त्याने गेल्या आठवडय़ाभरात सरासरी भरून काढली आहे. आता पुण्यातील पावसाचा जोर कमी होईल. पुढील तीन-चार दिवसांत पावसाच्या हलक्या सरी पडतील. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यातील इतर भागांप्रमाणेच पुण्यातील पावसामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यात १ ते २५ जून या काळात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये):
पुणे वेधशाळा (शिवाजीनगर)        २०९.४
लोहगाव (विमानतळ)            १९८.३
पाषाण (आयआयटीएम संस्थेजवळ)२६७.१
सरासरी पाऊस (पुणे वेधशाळा)     ११०.२