तब्बल बारा वर्षांनंतर २२४ घरांचे वाटप मार्गी

पिंपरी : जवळपास १२ वर्षांपासून रडतखडत प्रवास सुरू असलेल्या मिलिंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील घरेवाटपाचा कार्यक्रम काही प्रमाणात का होईना, आता मार्गी लागला आहे. येथील दोन इमारतींमधील २२४ घरांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महापालिकेने २००७-०८ या वर्षांत मोठा गाजावाजा करून या प्रकल्पाचे काम सुरू केले. तत्कालीन परिस्थितीत या प्रकल्पाअंतर्गत ११ इमारतींचे बांधकाम करण्याचे नियोजन होते. एका इमारतीत जवळपास ११२ सदनिका बांधण्यात येणार होत्या. त्यानुसार, कामही सुरू झाले. मात्र, विविध प्रकारच्या अडचणीसमोर उभ्या ठाकल्याने पुर्नवसनाचे काम बारा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. काही इमारती पूर्ण झाल्या असल्या, तरी त्यातील दोनच इमारतींमधील घरांचे वाटप होणार आहे.

महापौर माई ढोरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक लाभार्थ्यांना नुकतेच चाव्यांचे वाटप करण्यात आले. उपमहापौर हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, स्थानिक नगरसेवक उषा वाघेरे, संदीप वाघेरे, निकिता कदम, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी उपस्थित होते. बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या घरांच्या

वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तूर्त २२४ कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यामध्ये बहुतांश गरीब, कष्टकरी, झोपडपट्टीत राहणारे, धुणी-भांडी करणारे आदींचा समावेश आहे. उर्वरित इमारतींचे काम कधी पूर्ण होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

गरिबांच्या पुनर्वसनासाठी आवास उपलब्ध करून देण्याकरिता जेएनयूआरएम अंतर्गत २००७-०८ मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली होती. दोन इमारतींचे लाभार्थी निश्चित झाले आहेत. लॉटरी पद्धतीने घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

– अण्णा बोदडे, सहायक आयुक्त व झोपडपट्टी विभाग प्रमुख